दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेल्या सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या ‘विविध आजारांवर करावयाचे नामजप’ या चौकटीनुसार नामजप केल्याने आजार बरे होणे
डिसेंबर २०२० मध्ये दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘विकार दूर होण्यासाठी आवश्यक असलेल्या देवतांच्या तत्त्वानुसार दिलेले काही विकारांवरील नामजप’ अशी चौकट प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यात सांगितल्याप्रमाणे जप केल्यानंतर साधिकेला आलेली अनुभूती येथे देत आहोत.
१. उष्णतेचा त्रास होऊन अंगावर फोड येणे
‘सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ (सद्गुरु गाडगीळकाका) यांची दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘विविध आजारांवर करावयाचे नामजप’, ही चौकट आली होती. त्यात त्यांनी ‘हे नामजप एक मास करावे’, असे लिहिले होते. यातील बरेच आजार मलाही होते. त्यातही प्राधान्याने मला जे आजार होते, ते चौकटीत सांगितलेला नामजप केल्यावर २ – ३ दिवसांतच बरे झाले. मागील वर्षी मला उष्णतेचा पुष्कळ त्रास झाला होता आणि फोडही आले होते. मला तो त्रास जवळजवळ एक मास झाला होता. या वर्षी चौकटीत दिल्याप्रमाणे नामजप केल्यावर २ दिवसांत सर्व फोड गेले.
२. पायाला सूज येणे
मार्च २०२१ मध्ये माझ्या पायाला एक मास सूज होती. आधुनिक वैद्यांनी क्ष-किरण (एक्सरे) तपासणी केली. त्यात माझे कोणतेही हाड मोडलेले दिसत नव्हते. तेव्हा त्यांनी मला गोळ्या दिल्या; पण माझ्या पायाची सूज न्यून होत नव्हती; म्हणून मी आयुर्वेदीय वैद्या साधिका कु. कल्याणी गोंधळेकर यांच्याकडे गेले. त्यांनी मला पहाताच सांगितले, ‘‘रक्तातील दोषांमुळे असे होते. ‘युरिक ॲसिड’चे प्रमाण वाढल्यामुळे तुमच्या पायाला सूज आहे.’’ त्यांनी मला गोळ्या दिल्या. मला चालताही येत नव्हते. तेव्हा मी सद्गुरु गाडगीळकाकांनी यासाठी दिलेले सर्व नामजप मनापासून केले. नामजपामुळे माझ्या पायांची सूज पूर्ण गेली. आता मी व्यवस्थित चालू शकत आहे.
श्री गुरुकृपेने सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाकांकडून आम्हाला व्याधींसाठीचे सर्व नामजप मिळाले आणि मला त्यांतील शक्ती अन् सामर्थ्य अनुभवता आले. त्यासाठी श्री गुरुदेव आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! ’
– सौ. शारदा हुमनाबादकर, पुणे (१५.६.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |