सनातनच्या ४५ व्या संत पू. (कै.) सौ. सूरजकांता भगवंतकुमार मेनराय यांची दुसरी पुण्यतिथी माघ शुक्ल पक्ष सप्तमी (रथसप्तमी, ७.२.२०२२) या दिवशी झाली. त्यानिमित्त त्यांची कन्या सुश्री (कु.) संगीता मेनराय यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये, पू. मेनराय आजींनी रुग्णालयात असतांना वापरलेल्या कपड्यांची यू.ए.एस् उपकरणाद्वारे केलेली चाचणी, तसेच आधुनिक वैद्या डॉ. (सौ.) कस्तुरी भोसले यांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. शेवटच्या क्षणापर्यंत आनंदावस्थेत असणार्या सनातनच्या ४५ व्या संत पू. (कै.) सौ. सूरजकांता मेनराय यांच्या वस्तूंतून चैतन्य आणि आनंद यांची अनुभूती येणे
१ अ. पू. (सौ.) सूरजकांता मेनराय यांनी त्यांच्या अंतिम समयी परिधान केलेली वस्त्रे हातांत घेतल्यावर ‘या वस्त्रांमध्ये अफाट आनंद आहे’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगणे : ‘आम्ही फरीदाबादहून रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात परत आल्यानंतर पू. आईने (सनातनच्या ४५ व्या संत पू. (सौ.) सूरजकांता मेनराय यांनी) तिच्या अंतिम समयी जी वस्त्रे परिधान केली होती, ती गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) दाखवली. त्यांनी ती वस्त्रे आपल्या हातात घेतली. नंतर त्यांनी ‘ती वस्त्रे हातात घेतल्यानंतर काय जाणवते ?’, याचा आम्हाला प्रयोग करायला सांगितला. ती वस्त्रे हातात घेतल्यानंतर ‘चैतन्याचा प्रवाह माझ्या देहात जात आहे आणि मला आनंद मिळत आहे’, असे मी अनुभवले. त्यावर गुरुदेव म्हणाले, ‘‘या वस्त्रांमध्ये अफाट आनंद आहे. त्यांत एवढा आनंद आहे की, तो आनंद मलाही सहन होत नाही.’’ हे गुरुदेवांनी ३ – ४ वेळा मला सांगितले. त्यांनी लगेचच त्या कपड्यांची वैज्ञानिक उपकरणांद्वारे चाचणी (रीडिंग) घ्यायला एका साधकाला बोलावले आणि त्याला ती वस्त्रे दिली. त्या वेळी गुरुदेवांच्या तोंडवळ्यावर पुष्कळ आनंद दिसत होता. त्यावरून ‘पू. आईची आनंदावस्था किती उच्च प्रतीची होती !’, हे लक्षात येते.
१ अ १. पू. (कै.) सौ. सूरजकांता मेनरायआजी यांनी रुग्णालयात असतांना वापरलेल्या कपड्यांतून पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित होणे
‘संत म्हणजे ईश्वराचे सगुण रूप ! संत देहाने जरी रुग्णाईत असले, तरी ते सतत ईश्वरी अनुसंधानात असल्याने आनंदी असतात. सनातनच्या संत पू. (सौ.) सूरजकांता मेनरायआजी यांनी १.२.२०२० या दिवशी देहत्याग केला.
१७.१.२०२० या दिवशी पू. मेनरायआजींना श्वास घ्यायला त्रास होत होता. तेव्हा त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. २१.१.२०२० या दिवशी त्यांची स्थिती गंभीर झाल्यामुळे त्यांना दुसर्या रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आले. पू. मेनरायआजी यांनी रुग्णालयात असतांना वापरलेल्या कपड्यांतून पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित होत असल्याचे लक्षात आले. पू. आजींनी वापरलेल्या कपड्यांची यू.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली.
१ अ २. पू. मेनरायआजी यांच्याकडून प्रक्षेपित झालेल्या चैतन्याचा सकारात्मक परिणाम त्यांनी रुग्णालयात असतांना वापरलेल्या घरच्या कपड्यांवर होणे : सर्वसामान्य व्यक्तीने रुग्णालयात वापरलेल्या तिच्या कपड्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असेलच असे नाही; पण नकारात्मक ऊर्जा मात्र आढळते. याचे कारण हे की, सर्वसामान्य व्यक्तीमध्ये रज-तमाचे प्रमाण अधिक असते. तसेच ती रुग्णाईत असतांना त्रासलेली असल्याने तिच्यातील रज-तमामध्ये वाढ होते. याचा परिणाम तिच्या कपड्यांवरही होतो. त्यामुळे तिचे कपडे रज-तमाने भारित होतात. याउलट पू. आजींनी रुग्णालयात असतांना वापरलेल्या कपड्यांमध्ये नकारात्मक ऊर्जा मुळीच नसून पुष्कळ सकारात्मक ऊर्जा आहे. पू. आजींकडून प्रक्षेपित झालेल्या चैतन्याचा सकारात्मक परिणाम त्यांनी वापरलेल्या कपड्यांवर झाल्याने त्या कपड्यांमध्ये पुष्कळ चैतन्य निर्माण झाले.
पू. मेनरायआजी यांनी काहीच दिवस वापरलेल्या कपड्यांमध्ये एवढे चैतन्य निर्माण झाले आहे, तर प्रत्यक्ष पू. आजींमध्ये किती अधिक प्रमाणात चैतन्य असेल !’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२.२.२०२२)
१ आ. शिकायला मिळालेली सूत्रे
अ. ‘संतांच्या वस्तू त्यांच्या देहत्यागानंतरही का सांभाळून ठेवल्या जातात ?’, हे माझ्या लक्षात आले.
आ. संतांचे चैतन्य आणि आनंद त्यांच्या देहत्यागानंतरही त्यांच्या वस्तूंच्या माध्यमातून कार्यरत असतो.
इ. संतांच्या वस्तूंमधून प्रक्षेपित होणारे चैतन्य आणि आनंदाच्या लहरी यांमुळे वातावरणाची सतत शुद्धी होते. त्या वस्तूंच्या प्रभावळीत रहाणार्या जिवांना सात्त्विकता मिळते आणि आध्यात्मिक स्तरावर त्याचा लाभ होतो.
१ इ. पू. (कै.) सूरजकांता मेनराय यांची कोणतीही वस्तू जवळ ठेवून सेवा केल्यावर ती सेवा सहजतेने होणे : मी पू. आईची कोणतीही वस्तू माझ्याजवळ ठेवून कोणतीही सेवा करत असेन, तर माझ्याकडून ती सेवा अत्यंत सहजपणे होऊन जाते. त्यामध्ये कोणत्याही अडचणी येत नाहीत. तेव्हा ‘ती सेवा मी करत नसून आपोआप होत आहे’, असे वाटते.
१ ई. पू. (कै.) सौ. सूरजकांता मेनराय यांच्या वस्तू नीट ठेवतांना सनातनच्या सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधिकेने ‘तुमच्या खोलीत सुगंध येत असून त्यातून उपाय होत आहेत’, असे सांगणे : एकदा रामनाथी आश्रमात मी पू. आईच्या वस्तू जतन करून ठेवण्यासाठी व्यवस्थित ठेवत होते. तेव्हा माझ्या खोलीत सनातनची सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ती साधिका कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) आली. ती मला म्हणाली, ‘‘तुमच्या खोलीत पुष्कळ सुगंध येत आहे आणि मला पुष्कळ चैतन्य मिळत आहे’, असे मला जाणवत आहे.’’ काही वेळानंतर तो सुगंध खोलीच्या जवळ सेवेसाठी असलेल्या खोलीपर्यंत येत होता. यातून ‘संतांचे कार्य सूक्ष्म रूपाने कसे सतत कार्यरत रहाते ?’, हे लक्षात माझ्या आले. आमच्यासारख्या सामान्य साधकांना हे समजणे कठीणच आहे.
१ ई १. ‘हा परिच्छेद वाचतांना मलाही सुगंध आला.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (६.२.२०२२)
१ उ. सामान्य लोक आणि संत यांच्या वस्तूंच्या संदर्भात जाणवलेला भेद : सामान्य लोकांच्या मृत्यूनंतर त्यांनी वापरलेल्या वस्तूंवर रज-तमाचे आवरण येते; कारण त्या जिवांची त्या वस्तूंप्रती आसक्ती असते. त्यामुळे त्या वस्तू कुणी आपल्याजवळ ठेवत नाही.
संत सतत ईश्वराच्या अनुसंधानात रहातात आणि त्यांना आपल्या वस्तूंप्रती आसक्ती नसते. देहत्याग केल्यानंतर त्यांना आपल्या साधनेच्या अनुरूप मुक्ती मिळते. त्यामुळे त्यांच्या वस्तूंमध्ये मोठ्या प्रमाणात ईश्वरी चैतन्य असते.’
२. पू. भगवंतकुमार आणि पू. (सौ.) सूरजकांता मेनराय यांच्या खोलीत सेवा करतांना जाणवलेली सूत्रे
२ अ. पू. भगवंतकुमार आणि पू. (सौ.) सूरजकांता मेनराय यांच्या खोलीत सेवा करतांना सेवा लवकर अन् सहजतेने होणे : पू. आई-बाबा (पू. (सौ.) सूरजकांता मेनराय आणि सनातनचे ४६ वे संत पू. भगवंतकुमार मेनराय (वय ८३ वर्षे)) यांच्या खोलीत सेवा करतांना ती लवकर अन् सहजतेने होते. तेथे कोणतीही सेवा केली, तर कर्तेपणाची जाणीव न्यून होते; कारण ‘सर्वकाही सहजच होऊन जाते’, अशी अनुभूती येते. माझे मन शांत रहाते. एखाद्या सेवेत शारीरिक श्रम झाल्यावरही त्या श्रमांची जाणीव होत नाही. कितीही सेवा केली, तरी थकवा जाणवत नाही. मनाला हलकेपणा जाणवून सेवेची गती वाढते. ‘काय आणि कसे करायचे ?’, हेही तिथे आपोआपच सुचते. त्यांची सेवा करतांना मला आश्रम आणि घर या दोन्ही ठिकाणी हीच अनुभूती येते.
२ आ. कृतज्ञताभाव असल्यास संतांच्या सेवेतून चैतन्य आणि आनंद अधिक प्रमाणात मिळणे अन् अशीच अनुभूती आश्रमात सेवा करतांनाही येणे : आपल्यामध्ये कृतज्ञताभाव असला, तर ‘आपण संतांची सेवा करत आहोत’, या भावाचा अधिक चांगला परिणाम होतो. ‘सेवेतून चैतन्य आणि आनंद अधिक प्रमाणात मिळतो’, असे शिकायला मिळाले. अशीच अनुभूती आश्रमात सेवा करतांना येते. आश्रमात आपल्या क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक पटींनी सेवा होते; परंतु आपल्याला त्याची जाणीव होत नाही. ‘संतांचे अस्तित्व आणि साधकांचा भाव यांमुळे इतर ठिकाणच्या तुलनेत आश्रमात सर्वकाही पुष्कळ सहजतेने अन् आपोआप होते’, असे अनुभवता आले.’
– सुश्री (कु.) संगीता भगवंतकुमार मेनराय (मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.१.२०२२)
३. पू. (सौ.) सूरजकांता मेनरायकाकू यांनी भेट दिलेली साडी नेसल्यावर साधिकेला आलेल्या अनुभूती
३ अ. पू. (सौ.) मेनरायकाकू यांनी भेट दिलेली साडी नेसल्यावर दिवसभर हलकेपणा आणि आनंद जाणवणे अन् ती स्थिती २ दिवस टिकणे : ‘सनातनच्या ४५ व्या संत पू. (सौ.) सूरजकांता मेनरायकाकू यांची माझ्याशी विशेष जवळीक होती. त्यांनी मला त्यांची एक साडी भेट म्हणून दिली होती. मी ती साडी ‘संतांची साडी आहे’, या भावाने अत्यंत भावपूर्णपणे जपून ठेवली आहे. या वर्षी १४.१.२०२२ या दिवशी मकरसंक्रातीनिमित्त मी त्यांनी दिलेली ती साडी नेसले होते. त्या दिवशी मला दिवसभर पुष्कळ आनंद आणि हलकेपणा जाणवत होता. ती आनंदाची स्थिती पुढे २ दिवसांपर्यंत टिकून होती. अशा प्रकारे माझा आनंद द्विगुणित झाला होता.
३ आ. आश्रमातील साधिकांना साडीकडे पाहून चांगले वाटत असल्याचे सांगणे : त्या दिवशी मला काही साधिकांनी विचारले, ‘‘ही साडी कुठून घेतली ? तिच्याकडे पाहून चांगले वाटते.’’ तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘‘मला पू. मेनरायकाकूंनी ही साडी भेट दिली होती. या साडीतून त्यांचे चैतन्य आणि प्रीती यांचा वर्षाव मी अजूनही अनुभवत आहे.’’
‘मला संतांची साडी नेसल्यावर आनंद आणि चैतन्य यांची अनुभूती आली’, याबद्दल मी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि पू. (कै.) सौ. सूरजकांता मेनरायकाकू यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. ‘त्यांची कृपादृष्टी माझ्यावर सदैव रहावी’, हीच प्रार्थना आहे.’
– आधुनिक वैद्या (सौ.) कस्तुरी भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.१.२०२२)
|