वेरूळ येथे हिंदु धर्म आणि बौद्ध अन् जैन पंथांच्या लेण्या असल्याने तेथील केवळ जैन पंथाचा उल्लेख असलेला स्तंभ काढून ‘जागतिक वारसा’ हा फलक लावणार !

पुरातत्व विभागाचा निर्णय

डाव्या बाजूला ‘वर्ल्ड हेरिटेज स्टोन’ आणि उजव्या बाजूला ‘जैन कीर्ती स्तंभ’

संभाजीनगर – भगवान महावीर यांच्या २ सहस्र ५०० व्या निर्वाण महोत्सवानिमित्त ४८ वर्षांपूर्वी वेरूळ लेण्यांच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वारासमोर उभारलेला ‘जैन कीर्ती स्तंभ’ आता येथून हटवण्यात येणार आहे. येथे येथे हिंदु धर्म आणि बौद्ध अन् जैन पंथांच्या लेण्या असतांना केवळ एकाच धर्माचे प्रतीक असणे अयोग्य आहे. त्यामुळे तो स्थलांतरित करून त्या जागी ‘वर्ल्ड हेरिटेज स्टोन’ हा नामफलक बसवण्यात येणार आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाने हा निर्णय घेतला आहे. राज्याच्या पर्यटनमंत्र्यांशीही याविषयी चर्चा झाली आहे, अशी माहिती पुरातत्त्व खात्याचे अधीक्षक डॉ. मिलनकुमार चावले यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, या जागेचे सुशोभीकरण केले जाईल. या स्तंभाच्या जागेवर ‘विश्‍व धरोहर एलोरा गुफाएं’ असे देवनागरीत आणि इंग्रजीत लिहिलेला नामफलक बसवला जाईल. याचे संकल्पचित्रही (डिझाइन) सिद्ध आहे.

स्तंभ स्थलांतरित करण्यास जैन संघटनांचा विरोध

१. भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थसंरक्षणी महासभेच्या महाराष्ट्र राज्याचे महामंत्री महावीर ठोले म्हणाले, ‘‘वेरूळ लेणी समूहात १६ वैदिक हिंदु, १३ बौद्ध, तर ५ जैन लेण्या आहेत. एकाच ठिकाणी हिंदु धर्म आणि बौद्ध अन् जैन पंथांच्या लेण्या असणारे हे देशातील एकमेव ठिकाण आहे. येथील कीर्तीस्तंभ ४८ वर्षांपासून आहे. यातून एका विशिष्ट धर्माचा प्रसार होत नाही. ते येथून स्थलांतरित करण्यास आम्ही विरोध करू.’’

२. श्री पार्श्‍वनाथ ब्रह्मचर्याश्रम जैन गुरुकुलाचे अध्यक्ष वर्धमान पांडे म्हणाले, ‘‘वेरूळचा कीर्तीस्तंभ भारत सरकारच्या योजनेअंतर्गत बसवण्यात आला आहे. त्याच्या देखरेखीचे दायित्व आमच्याकडे आहे. जैन धर्म हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. आजपर्यंत कुणी यास विरोध केलेला नाही. तो पुरातत्त्व खात्याच्या नव्हे, तर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत आहे. तो येथून हालवू देणार नाही.’’
येथील कीर्तीस्तंभावर ‘अंतर्मना प्रसन्न दृष्टी’ असे लिहिलेले आहे. २ वर्षांपूर्वी वेरूळच्या श्री पार्श्‍वनाथ ब्रह्मचर्याश्रम जैन गुरुकुलच्या वतीने ८ लाख रुपये व्यय करून या स्तंभाचे सुशोभिकरण करण्यात आले.