रामनाथी (गोवा) येथील आध्यात्मिक संशोधन केंद्राच्या वास्तूत झालेले सात्त्विक (दैवी) पालट आणि त्यांमागील अध्यात्मशास्त्र !

पारदर्शक झाल्यामुळे खिडकीचे प्रतिबिंब अत्यंत स्पष्ट दिसत असलेल्या मार्गिकेतील लाद्या

१. आध्यात्मिक संशोधन केंद्राच्या जिन्याच्या पायरीवर ‘ॐ’ उमटणे

सौ. रिशिता गडोया

‘२८.४.२०२० या दिवशी आध्यात्मिक संशोधन केंद्राच्या वास्तूतील पहिल्या माळ्याकडे जाणार्‍या जिन्याच्या पायरीवर ‘ॐ’ उमटला असल्याचे आमच्या लक्षात आले. सूक्ष्मातील जाणणार्‍या साधकांनी त्याचे सूक्ष्म परीक्षण करून त्याला अनुमोदन दिले. आध्यात्मिक संशोधन केंद्रात सेवा करणार्‍या साधकांसाठी ही दैवी भेटच आहे.

२. आध्यात्मिक संशोधन केंद्राच्या तिन्ही माळ्यांवरील मार्गिकांतील लाद्या पाण्यासारख्या पारदर्शक दिसणे

आध्यात्मिक संशोधन केंद्राच्या वास्तूतील पहिल्या माळ्याकडे जाणार्‍या पायरीवर ‘ॐ’ उमटला असल्याचे लक्षात आल्यानंतर २ दिवसांनी ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’चे संत पू. देयान ग्लेश्चिच यांच्या लक्षात आले, ‘वास्तूतील तिन्ही माळ्यांवरील मार्गिकेतील लाद्या पाण्यासारख्या पारदर्शक दिसत आहेत.’ वास्तूतील पहिल्या माळ्यावरील मार्गिकेतील लाद्यांचे छायाचित्र पाहून सूक्ष्मातील जाणणार्‍या साधकांनी हे पालट सात्त्विक (दैवी) असल्याचे सांगितले.

या अनुभूतींसाठी श्रीकृष्णाच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. रिशिता गडोया, आध्यात्मिक संशोधन केंद्र, गोवा. (२५.६.२०२०)

वास्तूतील सात्त्विक पालटांमागील अध्यात्मशास्त्र

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

१. लादीवर ‘ॐ’ उमटणे आणि लाद्या पाण्यासारख्या पारदर्शक दिसणे, हे पालट काय दर्शवतात ?

१ अ. ‘ॐ’ उमटणे : ‘ॐकार हा शिवस्वरूप आहे. तो परिपूर्णत्वाचे लक्षण आहे. त्यामुळे जेथे ‘ॐ’ उमटतो, ती भूमी ‘सात्त्विकतेचा कळस असणारी आणि तीर्थक्षेत्रासारखी पवित्र आहे’, हे दर्शवते. एखाद्या वास्तूत रहाणार्‍या व्यक्ती, तसेच त्यांचे कार्य सात्त्विक असल्यास ती वास्तू आणि तिची भूमी यांत सात्त्विकता निर्माण होते. अशा वास्तूच्या भूमीत ‘ॐ’सारखी शुभचिन्हे उमटतात. त्यांतून वास्तूत सत्कार्यासाठी आवश्यक असलेले चैतन्य (तेजतत्त्व) प्रक्षेपित होत असते, तसेच त्या शुभचिन्हांमुळे वास्तूतील लोकांना देवतांचे आशीर्वाद मिळतात. ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्रित असतात’, या अध्यात्मातील सिद्धांतानुसार उमटलेल्या ‘ॐ’मधून सूक्ष्मातून ओमकार नाद येत असल्याने त्यातून ‘आकाशतत्त्व’ हे सर्वाेच्च तत्त्वही मिळते.

१ आ. लाद्या पाण्यासारख्या पारदर्शक दिसणे : हे लादीमधील पंचतत्त्वांपैकी आपतत्त्व वाढल्याचे दर्शक आहे. हा लादीमधील निर्मळतेच्या स्तरावर झालेला पालट आहे. भूमीवर अधिक प्रमाणात आपतत्त्वरूपी चैतन्य प्रक्षेपित होऊ लागले की, भूमी एखाद्या जलाप्रमाणे भासू लागते. वास्तूमध्ये रहाणार्‍या व्यक्तींच्या देवतांप्रती असणार्‍या उत्कट भावामुळे असा पालट घडून येतो. पाण्यासारख्या पारदर्शक झालेल्या लादीमुळे थंडावा जाणवणे, मनाला आल्हाददायक वाटणे, वातावरणात प्रसन्नता जाणवणे, भाव जागृत होणे, अशा अनुभूती येतात.

२. आध्यात्मिक संशोधन केंद्राच्या भूमीत सात्त्विक पालट होण्याची कारणे

२ अ. गोव्यातील रामनाथी येथील ‘आध्यात्मिक संशोधन केंद्रा’ची वास्तू वर्ष २०१९ मध्ये निर्माण झाली आहे. तिच्यामध्ये साधक वास्तव्यास येऊन केवळ वर्ष झाल्यावरच इतक्या अल्प कालावधीत त्या वास्तूमध्ये ‘पायरीच्या लादीवर ‘ॐ’ हे शुभचिन्ह उमटणे आणि तिन्ही मजल्यांवरील मार्गिकांतील लाद्या पाण्यासारख्या पारदर्शक दिसणे’, हे दैवी पालट झाले आहेत. यावरून त्या वास्तूमध्ये रहाणार्‍या साधकांची साधना ईश्वर आणि गुरु यांच्या कृपेस पात्र अशीच होत असल्याचे लक्षात येते; म्हणूनच ईश्वराने अशा अनुभूती दिल्या.

२ आ. ईश्वराने साधक ये-जा करत असलेल्या पायरीवर आणि तिन्ही मजल्यांच्या मार्गिकांमध्ये हे दैवी पालट घडवून आणले. साधकांचे सेवा करण्याचे विभाग आणि त्यांच्या वास्तव्याच्या खोल्या या मार्गिकांना लागूनच आहेत. ‘साधकांना या दैवी पालटांमधून चैतन्य आणि कृपाशीर्वाद सहजासहजी मिळावा’, अशी स्थाने ईश्वराने हे पालट घडवून आणण्यासाठी निवडली आहेत.

२ इ. सनातनचे साधक ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ करतात. गुरूंना जशी साधना अपेक्षित आहे, तशी साधना केल्यास त्यांचा कृपाशीर्वाद प्राप्त होतो आणि आध्यात्मिक उन्नती होते. सनातनचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी जगभर ‘ईश्वरी राज्य’ आणण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली साधना करणार्‍या साधकांचे समष्टी ध्येय ‘ईश्वरी राज्याची स्थापना करणे’, हेच आहे. या महान ध्येयामुळे ईश्वराची त्यांच्यावर सहजतेने कृपा होत आहे.

२ ई. या महान समष्टी ध्येयामध्ये भारतातील, तसेच जगभरातील साधक तळमळीने, भावपूर्णपणे, तसेच शरणागतभावाने साधना करत सहभागी झाले आहेत. ईश्वर त्यांना असे दैवी पालट झालेले दाखवून साधनेत प्रोत्साहन देतो. त्यामुळे साधक आणखी जोमाने साधना करू लागतात.

ईश्वर आणि गुरु यांनी या दैवी पालटांच्या अनुभूती देऊन त्या लक्षात आणून दिल्याबद्दल त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (६.१.२०२२)


तज्ञ, अभ्यासू आणि वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणारे यांना विनंती !

‘आध्यात्मिक संशोधन केंद्रातील बुद्धीअगम्य पालटांविषयी संशोधन करून त्यांचा कार्यकारणभाव शोधून काढण्यासाठी साधक प्रयत्न करत आहेत. त्यासाठी
१. कोटा लादीवर ‘ॐ’सारखा आकार का उमटला ?

२. लाद्यांवर पाण्यातील प्रतिबिंबाप्रमाणे खिडकीचे प्रतिबिंब दिसते. लाद्या इतक्या पारदर्शक का झाल्या ?

या संदर्भात तज्ञ, अभ्यासू, या विषयाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणारे यांचे साहाय्य आम्हाला लाभल्यास आम्ही कृतज्ञ असू.’

– व्यवस्थापक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

संपर्क : श्री. रूपेश रेडकर,

ई-मेल : [email protected]

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक