‘हिंदु राष्ट्रा’ची राज्यघटना बनवण्यात येणार !

प्रयागराज येथील संत संमेलन

  • काशी असेल हिंदु राष्ट्राची राजधानी !

  • काशीमध्ये असेल संसद भवन !

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – येथे आयोजित करण्यात आलेल्या संत संमेलनामध्ये हिंदु राष्ट्राची राज्यघटना बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याला ‘हिंदु राष्ट्र राज्यघटना’ असे नाव देण्यात येणार आहे. ही राज्यघटना पुढील वर्षीच्या माघ मेळ्यामध्ये संत आणि भाविक यांच्यासमोर सादर करण्यात येणार आहे. अखिल भारतीय विद्वत परिषदेचे सरचिटणीस डॉ. कामेश्‍वर उपाध्याय यांना राज्यघटनेच्या निर्मितीचे संयोजक बनवण्यात आले आहे. त्यांच्या अंतर्गत कायदेतज्ञ आणि सुरक्षातज्ञ यांचा समावेश असणार्‍या तीन समित्या बनवण्यात येणार आहेत. प्रत्येक समितीमध्ये २५ जणांचा समावेश असणार आहे. यांत शीख, बौद्ध, जैन यांच्यासहित १२७ पंथांच्या प्रतिनिधींचा सहभाग असणार आहे. श्रावण मासापर्यंत राज्यघटनेचे प्रारूप सिद्ध करण्याचे लक्ष्य आहे.

प्रयागराज येथील संत संमेलन

१६ व्या वर्षापासून असेल मतदानाचा अधिकार !

संत संमेलन संचालन समितीचे संयोजक स्वामी आनंद स्वरूप यांनी सांगितले की, भारताला ‘हिंदु राष्ट्र’ बनवण्याच्या दिशेने काम करण्यास प्रारंभ झाला आहे. देशात लोकसभेचे ५४३ मतदारसंघ आहेत. प्रत्येक मतदारसंघात ‘धर्म खासदारा’ची निवड केली जाईल. या मतदारसंघातील उमेदवारांचे वय २५ वर्षांहून अधिक असेल, तसेच १६ व्या वर्षांपासून मतदानाचा अधिकार असेल. नवी देहली येथील संसद भवनाप्रमाणेच काशी येथे संसद भवन बनवण्यात येईल. यासाठी काशीमधील शलूकंटेश्‍वरजवळ ४८ एकर जागा निवडण्यात आली आहे. हिंदु राष्ट्रात काशी हीच देशाची राजधानी बनवली जाईल.

मुसलमानांना नसणार मतदानाचा अधिकार !

मुसलमानांना सन्मान आणि संरक्षण देण्यात येईल; मात्र मतदानाचा अधिकार असणार नाही, असे स्वामी आनंद स्वरूप यांनी स्पष्ट केले.

हिंदु राष्ट्राची राज्यघटना धर्मग्रंथांवर आधारित असणार !

हिंदु राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये श्रीमद्भगवद्गीता, श्रीरामचरितमानस, मनुस्मृति यांसहित वेद आणि पुराणे यांतील सूत्रांचा समावेश असेल. हिंदु राष्ट्रात गुरुकुल शिक्षण बंधनकारक असणार आहे. यात ३ ते ८ वर्षे वयाची मुले आणि मुली यांना शिक्षण घेणे बंधनकारक असणार आहे. त्यानंतर त्यांना अन्य शाळांमध्ये जाण्यास अनुमती असणार आहे.

अखिल भारतीय विद्वत परिषदेचे सरचिटणीस डॉ. कामेश्‍वर उपाध्याय

 

चंद्रगुप्त मौर्य यांच्या मंत्रीमंडळाप्रमाणे असेल हिंदु राष्ट्रातील मंत्रीमंडळ

स्वामी आनंद स्वरूप पुढे म्हणाले की, हिंदु राष्ट्रातील मंत्रीमंडळ चंद्रगुप्त मौर्य यांच्या मंत्रीमंडळाप्रमाणे असणार आहे. यात संरक्षण, शिक्षण, राजकीय, आरोग्य आदी व्यवस्था असणार आहे.

भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यापासून रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर षड्यंत्र रचले जात आहे ! – महामंडलेश्‍वर अन्नपूर्णा भारती

महामंडलेश्‍वर अन्नपूर्णा भारती

महामंडलेश्‍वर अन्नपूर्णा भारती यांनी सांगितले की, आम्हाला रोखण्यासाठी देशातून आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरून षड्यंत्र रचले जात आहे; मात्र भारताला हिंदु राष्ट्र करण्याचे अभियान थांबणार नाही. हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी आणि जिहाद नष्ट करण्यासाठी अंतिम श्‍वासापर्यंत लढू. धर्मांतरित मुसलमानांना सन्मानपूर्वक हिंदु धर्मामध्ये आणले जाईल, तसेच मठ आणि मंदिरे यांना सरकारीकरणातून मुक्त करण्यात येईल.