मालदीवमध्ये भारतविरोधी घोषणा दिल्यास ६ मास कारावास अन् दंडही होणार !

मालदीव चे राष्ट्रपति इब्राहिम मोहम्मद सोलिह भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत (डावीकडे) मालदीवचे माजी राष्ट्रपती अब्दुल्ला यामिन (उजवीकडे)

नवी देहली – मालदीवचे माजी राष्ट्रपती अब्दुल्ला यामिन हे चीनच्या धोरणांना पाठिंबा देत असून त्यांनी सध्या भारताच्या विरोधात उघड भूमिका घेतली आहे. त्यांच्या नेतृत्वाखालीच देशात ‘इंडिया आऊट’ नावाची मोहीम चालवली जात आहे. या मोहिमेमुळे भारतासमवेतचे मालदीवचे संबंध विकोपाला जातील, अशी शक्यता असल्याने मालदीव सरकार भारताला पाठिंबा दर्शवणारे नवीन विधेयक घेऊन येत आहे. नव्या विधेयकानुसार भारतविरोधी घोषणा देणार्‍याला २० सहस्र मालदीवियन रुफिया दंड आणि ६ मास कारावास किंवा १ वर्षासाठी नजरकैद केले जाईल.


माजी राष्ट्रपती अब्दुल्ला यामिन यांचे समर्थक मालदीवमधील भारतीय सैनिक आणि उपकरणे यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत. याचा आरंभ वर्ष २०१८ मध्ये झाला होता. भारताने मालदिवमध्ये तैनात करण्यात आलेले त्याचे हेलिकॉप्टर आणि विमान मायदेशी न्यावे, यासाठी यामिन यांनी मोहीम चालू केली असून त्याला ‘इंडिया आऊट’ असे नाव देण्यात आले.