पाकमधील मौलाना खादिम रिझवी याच्या भाषणाने प्रभावित होऊन हिंदु तरुणाची हत्या केल्याची धर्मांधांची स्वीकृती !

  • गुजरातमधील किशन बोलिया या हिंदु तरुणाच्या हत्येचे प्रकरण

  • खादिम रिझवी हा पाकिस्तानातील जिहादी संघटना ‘तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान’चा संस्थापक

(मौलाना म्हणजे इस्लामी विद्वान)

पाकमधील कुख्यात मौलाना खादिम रिझवी

कर्णावती (गुजरात) – गुजरातमधील धुंधका शहरामध्ये किशन बोलिया या तरुणाच्या हत्येच्या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत एक मौलवी आणि अन्य दोघांना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीत पाकमधील कुख्यात मौलाना खादिम रिझवी याच्या भाषणांमुळे ते प्रभावित झाले होते आणि त्यातूनच त्यांनी किशन बोलिया यांची हत्या केली. हे आरोपी रिझवी याच्या भाषणांचे व्हिडिओ पहात असत. जेव्हा किशोर याने महंमद पैगंबर यांच्याविषयीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित केला, तेव्हा तो पाहून हे आरोपी संतप्त झाले आणि त्यांनी किशन याची हत्या करण्याचे ठरवले, अशी माहिती त्यांनी दिली.

१. या तिघांविषयी आतंकवादविरोधी पथकाने सांगितले की, प्रत्यक्ष हत्या करणार्‍या दोघा युवकांना एकट्याने आक्रमण करण्यासाठी सिद्ध करण्यात आले होते. त्यांना सातत्याने कट्टरतावादी विचार ऐकवले जात होते. मौलाना रिझवी याचे व्हिडिओ दाखवले जात होते. या मौलाना रिझवीची पाकमध्ये हत्या करण्यात आलेली आहे.

२. रिझवी यानेच पाकमधील जिहादी संघटना ‘तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान’ची स्थापना केली होती. या संघटनेमुळेच पाकचे पंतप्रधान इम्रान खान त्रस्त झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच या संघटनेने रावळपिंडी आणि इस्लामाबाद येथे आंदोलन केले होते.