मीरा-भाईंदर महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी यांचा १ कोटीहून अधिक रकमेचा भ्रष्टाचार उघड !
|
भाईंदर – महानगरपालिकेतील कर्मचारी आणि अधिकारी यांना वेळोवेळी अचानक उद्भवणार्या खर्चासाठी आगाऊ रकमा दिल्या जातात. त्याला ‘तसलमात’ असे म्हटले जाते. मीरा-भाईंदर महानगरपालिकेतील आगाऊ रकमा घेणारे कर्मचारी आणि अधिकारी यांच्याकडून गैरव्यवहार झाला असून १ कोटी २४ लाखांहून अधिक रक्कम (तसलमात) पालिकेकडे जमा न झाल्याचे माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीतून उघड झाले आहे.
भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी यांनी सर्वसामान्य जनतेने कष्टाने कमावलेल्या पैशांचा दुरुपयोग केला आहे. या प्रकरणी महापालिका आयुक्तांनी त्यांची भूमिका जनतेसमोर स्पष्ट करावी, तसेच या प्रकरणात गैरव्यवहार करणारे कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी. ‘महानगरपालिकेतील भ्रष्ट कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर कारवाई न झाल्यास फौजदारी कारवाई करण्यासह आम्ही जनआंदोलनही उभारू’, अशी चेतावणी हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’चे समन्वयक वैद्य उदय धुरी यांनी दिली. भाईंदर (प.) येथील कै. ह.ना. गोखले सभागृह येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी ‘हिंदु टास्क फोर्स’चे संस्थापक अधिवक्ता खुश खंडेलवाल आणि ‘लोकजागृती सामाजिक प्रतिष्ठान’च्या अध्यक्षा सौ. स्वाती पाटील उपस्थित होत्या.
‘सुराज्य अभियान’चे समन्वयक वैद्य उदय धुरी पुढे म्हणाले की,
१. ‘महानगरपालिकेतील आगाऊ रकमा घेतल्यानंतर रकमेचा विनियोग कसा झाला ?, त्याचा तपशील आणि पुरावे, उदा. देयके जमा करणे आणि शेष रक्कम वेळच्या वेळी जमा करणे कायद्याने बंधनकारक असते. आधीच्या ‘तसलमात’चा हिशोब जमा केल्याविना नवीन आगाऊ रक्कम उचलता येत नाही. असा कायदा असूनही मीरा-भाईंदर महानगरपालिकेतील आगाऊ रकमा घेणारे काही कर्मचारी आणि अधिकारी यांनी कित्येक वर्षे ना हिशोब दिला आहे, ना रकमा जमा केल्या आहेत.
२. ‘तसलमात’च्या अंतर्गत पालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजासाठी वर्ष १९९३ पासूनच्या सहस्रो रुपयांच्या रकमा यात प्रलंबित आहेत. साधारणत: वर्ष २०२० पासूनच विविध व्यक्तींना दिलेल्या रकमांची वसुली करणे चालू झाले आहे, असे निर्दशनास आले आहे.
३. एकूण १ कोटी ५० लाख रुपयांहून अधिक रक्कम विविध कर्मचार्यांना आतापर्यंत दिली गेली; मात्र आतापर्यंत केवळ जेमतेम २५ लाख ३८ सहस्र ६०० रुपये एवढीच वसुली संबंधित कर्मचार्यांकडून केली केली. ही वसुली अत्यंत किरकोळ आहे. तसेच आधीच्या वसुलीविषयी काहीही करण्यात आलेले नाही. या संदर्भात ३१ मार्च २०२१ पर्यंत ही रक्कम १ कोटी २४ लाख ८५ सहस्र ८०८ रुपये इतकी प्रचंड असल्याचे माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीतून समोर आले आहे.
आयुक्तांनी दोषी कर्मचार्यांकडून व्याजासहित वसुली करवून घ्यावी ! – अधिवक्ता खुश खंडेलवाल, संस्थापक, ‘हिंदु टास्क फोर्स’
मीरा-भाईंदर महानगरपालिका अनेक गोष्टींसाठी लोकांकडून कर वसूल करते; मात्र त्याच्याच कर्मचार्यांकडून आगाऊ दिलेल्या रकमांची वसुली करण्यात उदासीनता दाखवते, ही गंभीर गोष्ट आहे. माहिती अधिकारातून प्राप्त माहितीतून आम्हाला असे आढळून आले की, काही अधिकारी आणि कर्मचारी यांनी कार्यालयीन कामासाठी घेतलेली रक्कम अनेक मास, अनेक वर्षे त्यांच्याकडेच ठेवून त्याचा काहीही विनियोग न करता मग ती परत केली. यावरून त्यांनी या कालावधीत ही रक्कम स्वत:साठी वापरली हे म्हणण्यास पुरेसा वाव आहे. मीरा-भाईंदर महानगरपालिकेतील तत्कालीन आणि विद्यमान आयुक्तांनी वर्ष १९९३ पासून विविध कर्मचार्यांकडून वसुली केलेली नाही. यावरून आयुक्तांची कार्यशैलीही संशयास्पद असल्याचे स्पष्ट होत आहे. आयुक्तांनी या दोषी कर्मचार्यांकडून व्याजासहित ही रक्कम वसुली करवून घ्यावी, अशी आमची मागणी आहे.
भ्रष्टाचारविरोधी लढ्यात आता जनतेनेच पुढाकार घ्यावा ! – सौ. स्वाती पाटील, अध्यक्षा, ‘लोकजागृती सामाजिक प्रतिष्ठान’
गेली २ वर्षे कोरोनाच्या काळात लोकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागले. अशा स्थितीत आता मीरा-भाईंदर महानगरपालिकेतील कर्मचार्यांचे भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर आले आहे. राज्यात इतर अनेक महानगरपालिकांमध्ये अशा प्रकारचा भ्रष्टाचार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता जनतेनेच या भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढ्यात पुढाकार घ्यावा.
मिरा-भाईंदर महापालिकेतील एक कोटींहून अधिक रकमेचा भ्रष्टाचार उघडhttps://t.co/kHKoMEa2XP#MiraBhayander #MunicipalCorporation #Corruption #Mumbai @Mirabhytweets @DGPMaharashtra @CMOMaharashtra @Dwalsepatil
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) January 27, 2022
विशेष सहकार्य
१. कै. ह.ना. गोखले सभागृहाचे मालक श्री. प्रसाद गोखले यांनी पत्रकार परिषदेसाठी सभागृह विनामूल्य उपलब्ध करून दिले.
२.‘कृष्णा साऊंड सर्व्हिस’चे मालक श्री. देवेंद्र खत्री यांनी पत्रकार परिषदेसाठी ध्वनीक्षेपक यंत्रणा विनामूल्य उपलब्ध करून दिली.
भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढ्याला आध्यात्मिक बळ मिळावे, यासाठी भाईंदर येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिरात करण्यात आली सामूहिक प्रार्थना !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मीरा-भाईंदर महानगरपालिकेतील कर्मचार्यांचे भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर आणण्यात आले. भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढ्याला आध्यात्मिक बळ मिळावे, यासाठी भाईंदर येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिरात देवीला ‘लोकजागृती सामाजिक प्रतिष्ठान’च्या अध्यक्षा सौ. स्वाती पाटील यांच्या वतीने ओटी भरण्यात आली. या वेळी ‘हिंदु टास्क फोर्स’चे संस्थापक अधिवक्ता खुश खंडेलवाल, ‘सुराज्य अभियान’चे समन्वयक वैद्य उदय धुरी, हिंदु जनजागृती समितीचे मुंबई समन्वयक श्री. बळवंत पाठक यांच्यासह स्थानिक पत्रकार आणि धर्मप्रेमी उपस्थित होते. देवीला ओटी भरल्यावर ‘सुराज्य निर्माण व्हावे’, यासाठी सामूहिक प्रार्थनाही करण्यात आली.