‘नथुराम’ आणि पुरोगाम्यांचे अजीर्ण !

संपादकीय

हिंदुविरोधी विचारसरणीला निष्ठा वाहिलेले कोल्हे यांचे उदात्तीकरण किती काळ करायचे ?

‘भारताचे राष्ट्रपिता’ म्हणून काँग्रेसकडून प्रचारित करण्यात आलेल्या म. गांधी यांचा वध करणार्‍या नथुराम गोडसे यांच्यावरून पुन्हा एकदा रणकंदन माजले आहे. एकीकडे नथुराम गोडसे यांचे उदात्तीकरण करून म. गांधी यांना विरोध करणारे कालीचरण महाराज यांना छत्तीसगड पोलिसांनी अटक केली, तर दुसरीकडे महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी ‘व्हाय आय किल्ड गांधी ?’ (मी गांधी यांचा वध का केला ?) या आगामी चित्रपटात नथुराम गोडसे यांनी भूमिका वठवल्यावरून त्यांना विरोध केला जात आहे. तसे पाहिले, तर या चित्रपटाचे चित्रीकरण वर्ष २०१७ मध्ये करण्यात आले. तेव्हा कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नव्हे, तर शिवसेनेचे नेते होते. आता कोल्हे यांना त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी विरोध करण्यास आरंभ केल्यावर त्यांनी स्पष्टीकरण देतांना म्हटले आहे, ‘‘मी केवळ एक कलाकार म्हणून नथुराम यांची भूमिका केली आहे. त्याचा आणि माझ्या राजकीय विचारसरणीचा संबंध लावण्यात येऊ नये.’’ अमोल कोल्हे यांची पाठराखण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष स्वतः शरद पवारही पुढे आले आहेत. ‘कोणत्याही चित्रपटात कलाकार एखादी भूमिका करत असेल, तर कलाकार म्हणूनच त्याच्याकडे पहावे लागेल’, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. शरद पवार यांनी कोल्हे यांची कला पहाण्याचे आवाहन केले असले, तरी कोल्हे हे त्यांच्या भूमिकेशी, कलेशी एकरूप झालेले नाहीत, असे त्यांनीच म्हटले आहे. अमोल कोल्हे यांच्या वक्तव्यांतून अनेक प्रश्न उपस्थित होतात. अमोल कोल्हे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजे गांधींच्या नावावर मते मागणार्‍यांच्या गोटात आले असले, तरीही पूर्वी त्यांनी शिवसेनेत काम केले आहे. तेव्हाही त्यांच्यात नथुराम यांच्या राष्ट्रवादी विचारांचे अवलोकन करण्याचा विवेक नव्हता का ? तसे असेल, तर तेव्हाही केवळ अर्थार्जनासाठी नथुराम यांची भूमिका स्वीकारली आणि आता अर्थार्जनासाठीच राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे काय ? तत्त्वे, विचार आदी संकल्पनांपासून दूर दूर असलेला हा बहुरूप्याचा खेळ करून ते कुणाची फसवणूक करत आहेत ? एकीकडे व्यक्तीस्वातंत्र्य, अभिव्यक्तीस्वातंत्र्य, विचारांची लढाई, शाहू-फुले-आंबेडकर यांचा वारसा आदी मोठे मोठे शब्द वापरायचे आणि दुसरीकडे पैशासाठी असे बहुरूप्याचे सोंग घ्यायचे ? यांच्यापेक्षा बहुरूपी बरा; कारण त्याला खरेच काही विचार नसतो आणि तो केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी अशी सोंगे घेत असतो, तो स्वतःच्या पुरोगामी विचारांचे भांडवल करून पुन्हा मते मागत फिरत नसतो !

भूमिकांशी प्रत्येक वेळी प्रतारणा !

रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेत रावणाची भूमिका करणारे अरविंद त्रिवेदी हे चित्रीकरणाच्या कालावधीत दिवसभर उपवास करत. त्यांना अतिशय दुःख होत असे की, त्यांचे आराध्यदैवत असलेल्या प्रभु श्रीरामाविषयी त्यांना असे अद्वातद्वा बोलावे लागत असे ! येथे अरविंद त्रिवेदी हेही रावणाच्या भूमिकेशी सहमत नव्हते, तरीही त्यांची निष्ठा त्यांनी लपवलेली नव्हती. रावणाची भूमिका जिवंत करण्यासाठी त्यांनी स्वतःची श्रद्धा जपूनही प्रयत्न केले होते. माझे विचार वेगळे आणि भूमिका वेगळी म्हणणार्‍यांनी काय केले आहे ? यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित ‘राजा शिवछत्रपती’ या अमोल कोल्हे यांनी अभिनय केलेल्या मालिकेतील काही महत्त्वपूर्ण प्रसंग धर्मांधांच्या दबावामुळे वगळण्यात आले होते. ‘झी मराठी’ या वृत्तवाहिनीवरून प्रसारित करण्यात आलेल्या ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित मालिकेत खासदार कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका वठवली होती. त्या मालिकेतही छत्रपती संभाजी महाराज यांना क्रूर औरंगजेबाने कशा प्रकारे हाल हाल करून मारले, हा विषय राजकीय हस्तक्षेपामुळे वगळण्यात आला. त्या विरोधात कोल्हे यांनी काही भूमिका घेतली नव्हती. आता नथुराम गोडसे यांची भूमिका साकारली आहे, तर त्यांच्याही विचारांशी ते सहमत नाहीत. ‘प्रखर राष्ट्रवादी व्यक्तीमत्त्वांच्या भूमिका साकारून त्यातून मिळणारा पैसा अक्षरशः खोर्‍याने ओढण्यासाठी एका पायावर सज्ज आहे; मात्र त्यातील कडवे सत्य जगासमोर आणतांना मी मूग गिळून गप्प बसणार आहे’, हे धोरण कोल्हे यांनी स्वीकारले आहे का ?

‘खासदार अमोल कोल्हे यांच्या ऐतिहासिक मालिकांनीच त्यांना राजकीय यश दिले आहे’, असे म्हणले, तर ते चुकीचे ठरणार नाही. कोल्हे यांच्या निष्ठा अशा प्रकारे हिंदुविरोधी विचारसरणीला वाहिलेल्या असतांना त्यांचे अजून किती उदात्तीकरण करायचे आहे, हे खरेतर हिंदू समाजाने ठरवायला हवे. देशभक्त नथुराम गोडसे यांच्या चित्रपटाला प्रतिसाद मिळून त्यांचे झाकोळले गेलेले राष्ट्रवादी विचार आजच्या पिढीला कळावे, असेच प्रत्येक राष्ट्रप्रेमी व्यक्तीला वाटते. असे असले, तरी आज खासदार कोल्हे यांच्या रंगबदलूपणाचे समर्थन करता येत नाही; कारण त्यांचा उद्देश शुद्ध नाही !

दुटप्पी पुरोगामी

नथुराम गोडसे यांच्यावरील या चित्रपटाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या पठडीतील पुरोगामी यांचेही पितळ उघडे पडले आहे. शरद पोंक्षे यांनी साकारलेल्या ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाला सर्वाधिक विरोध राष्ट्रवादी काँग्रेस आणि कथित पुरोगामी कंपूकडूनच झाला आहे. अनेक ठिकाणी इतिहासातील ब्राह्मणांचे योगदान नाकारण्यासाठी यांनीच तोडफोडीचे राजकारणही केले आहे. आज मात्र सर्वांना शेपूट घालून स्पष्टीकरणे देण्याची वेळ आली आहे. हिंदुत्वनिष्ठ जेव्हा नथुराम गोडसे साकारतात, तेव्हा ते ‘सांस्कृतिक आतंकवादी’ असतात आणि रंगबदलू पुरोगामी जेव्हा भूमिका साकारतात, तेव्हा त्यांच्यातील कला पहायची असते का ? मग कलेच्या क्षेत्रात शरद पोंक्षे अमोल कोल्हेंपेक्षा सरसच आहेत. त्यांची कला त्या वेळी का पाहिली गेली नव्हती ? आज खासदार कोल्हे आणि त्यांच्या पक्षातील पदाधिकार्‍यांना जी सारवासारव करावी लागत आहे, त्याला नियती म्हणतात ! ती आज नाही उद्या तुम्हाला लोळवतेच ! म्हणून नेहमी सत्याची आणि धर्माची कास धरावी !