वर्धा येथील कदम रुग्णालयात ११ अर्भकांच्या कवट्या आढळल्या !

आधुनिक वैद्या रेखा कदमसह तिघांना अटक !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

वर्धा – जिल्ह्यातील आर्वी येथील कदम रुग्णालयाच्या परिसरात अर्भकांच्या ११ कवट्या आणि ५२ हाडे आढळली आहेत. पोलिसांनी एका खड्ड्यात सापडलेली ही अर्भकांची हाडे आणि कवट्या पुढील पडताळणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठवली आहेत. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर सखोल चौकशी करण्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आधुनिक वैद्या रेखा कदम यांना अटक केली आहे, तसेच आधुनिक वैद्या कदम यांच्या सासूलाही कह्यात घेतले आहे.

४ दिवसांपूर्वी आधुनिक वैद्या कदम यांच्या रुग्णालयात एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा गर्भपात करण्यात आला. या प्रकरणी पोलीस तक्रार झाल्यावर ‘हा अनधिकृत गर्भपात ३० सहस्र रुपये देऊन करण्यात आला आहे’, असे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करत आधुनिक वैद्य रेखा कदम यांसह तिघांना अटक केली. १२ जानेवारी या दिवशी पोलिसांनी रुग्णालयाच्या परिसरात पडताळणी केली. या वेळी रुग्णालयाच्या परिसरात एका खड्डयात ११ कवट्या आणि ५२ हाडे आढळून आली.