रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात महामृत्युंजय होमाच्या वेळी लक्षात आलेली काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

‘महर्षींनी सांगितल्याप्रमाणे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महामृत्युंजय होम’ करण्यात आला. या वेळी लक्षात आलेली काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.

गोवा येथील सनातनचा रामनाथी आश्रम

१. अग्निस्थापना विधीमुळे वातावरणातील सत्त्वगुणामध्ये वाढ झाल्याचे जाणवून ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ एकच आहेत’, असे वाटणे

होमाच्या आरंभी अग्निस्थापना विधी झाला. अग्निस्थापना झाल्यावर वातावरणात पालट झाला आणि वातावरणातील सत्त्वगुणामधे वाढ झाल्याचे माझ्या लक्षात आले. अग्निस्थापना झाल्यावर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची भावमुद्रा पाहून माझा आतून ‘एकमेव न द्वितीयम् ।’, म्हणजे ‘त्या दोघी निराळ्या नसून एकच आहेत’, असा नामजप चालू झाला. त्या वेळी मला आतून वाटले, ‘भगवान श्रीमहाविष्णु म्हणत आहे की, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या उत्तराधिकारी असलेल्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या दोन नसून एकच आहेत. गुरुतत्त्व एकच आहे आणि हेच आता साधकांच्या मनावर बिंबवायचे आहे.’

यज्ञ (प्रतीकात्मक छायाचित्र)

२. महामृत्युंजय होमाच्या वेळी सूर्यनारायणाची कृपा असल्यामुळे सद्गुरुद्वयींना उन्हाचा त्रास न झाल्याचे जाणवणे

महामृत्युंजय होम चालू असतांना तीन दिवस सद्गुरुद्वयींना उन्हाचा त्रास झाला नाही. त्या वेळी ‘सूर्यनारायणाची कृपा होती’, असे मला जाणवले. होमाच्या तिसर्‍या दिवशी सकाळी पाऊस आला. पाऊस आणि ढग यांमुळे वातावरणातील शीतलता वाढली.

३. होमाच्या वेळी बुलबुल पक्षी जवळ येऊन सुंदर नाद करत होता.

४. होमाच्या वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना ‘औदुंबराचे झाड आनंदाने डोलत आहे आणि झाडातून शीतल लहरी त्यांच्याकडे येत आहेत’, असे जाणवत होते.

५. सगुण-निर्गुणाशी संबंधित अनुभूती येणे

होमाच्या वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे सारखे ध्यान लागत होते. त्यांची दृष्टी निर्गुणाची चाहूल देणारी होती. होमाच्या वेळी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ अधिक वेळ डोळे उघडे ठेवून अग्नीकडे बघायच्या. ‘त्यांची दृष्टी सगुणाशी संबंधित आहे’, असे जाणवले. ‘सद्गुरुद्वयींच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सगुण-निर्गुण अशा दोन्ही स्तरांवर हा होम करवून घेतला’, असे जाणवले.

श्री. विनायक शानभाग

६. श्रीमहाविष्णु सृष्टीच्या पालन-पोषणातील अडथळे होम-हवन यांच्या माध्यमातून दूर करत असल्याचे जाणवणे

होमाच्या वेळी ‘प्रत्येक क्षण सूक्ष्म युद्धच आहे. हे युद्ध सप्तलोक आणि सप्तपाताळ यांच्या स्तरावर असून त्यात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सूक्ष्म युद्धाचा स्तर उंचावला आहे’, असे जाणवले. भगवान श्रीविष्णुनिर्मित सृष्टीचक्राचे संतुलन नष्ट करण्यासाठी पाताळातील अनिष्ट शक्ती प्रयत्नरत आहेत. सृष्टीचा पालनकर्ता भगवान श्री महाविष्णु सृष्टीच्या पालन-पोषणातील अडथळे होम-हवन यांच्या माध्यमातून दूर करत आहे’, असे जाणवले.

७. अग्निनारायणाला सतत प्रार्थना होणे

होमाच्या वेळी अग्निनारायणाविषयी विशेष आपुलकी वाटत होती. त्याला सारखी प्रार्थना होत होती, ‘हे अग्निनारायणा, तूच आमची प्रार्थना ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांच्यापर्यंत पोचव अन् सृष्टीचक्रातील अडथळे दूर कर.’

– श्री. विनायक शानभाग, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक