संगीतासाठी संपूर्ण जीवन समर्पित करणारे नाशिक येथील शास्त्रीय गायक पं. गोविंदराव चिंतामणराव पलुस्कर !

संगीतासाठी संपूर्ण जीवन समर्पित करणारे नाशिक येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे शास्त्रीय गायक पं. गोविंदराव चिंतामणराव पलुस्कर (वय ९० वर्षे) !

साधना म्हणून ‘संगीत’ जगणारे काही संगीत कलाकार !

‘गायन, वादन आणि नृत्य या ईश्वरप्राप्तीसाठी देवाने निर्मिलेल्या प्राचीन कला आहेत. कलेच्या माध्यमातून साधना करणारे स्वामी हरिदास, त्यांचे शिष्य तानसेन, पं. विष्णु दिगंबर पलुस्कर, असे अनेक ऋषितुल्य कलाकार आजपावेतो होऊन गेले आणि त्यांच्यासारखेच अनेक चांगले कलाकार आजही समाजात आहेत. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक सुश्री (कुमारी) तेजल पात्रीकर यांच्या समवेत साधकांनी वर्ष २०१९ मध्ये अशा अनेक कलाकारांच्या भेटी घेतल्या.

गायन, वादन आणि नृत्य या क्षेत्रांतील मान्यवर कलाकारांच्या भेटींतून ‘त्यांनी कठीण परिस्थितीत केलेला संगीत साधनेचा प्रवास, त्यांची संगीत साधना करण्याची तळमळ, प्रसिद्धीकडे न धावता साधना म्हणून अंगिकारलेले जीवन आणि या कलाकारांना संगीत साधना करत असतांना आलेल्या विविध अनुभूती’, यांविषयी माहिती मिळाली, तसेच त्यांचे संगीत साधनेविषयी अमूल्य मार्गदर्शनही लाभले.

‘संगीत क्षेत्रातील सर्वांना संगीत साधनेसाठी या मार्गदर्शनाचा लाभ व्हावा आणि त्यांनीसुद्धा संगीतकला ‘साधना’ म्हणून अंगिकारावी’, यांसाठी या गायन, वादन अन् नृत्य या क्षेत्रांतील कलाकारांची घेतलेली मुलाखत लेखमालेच्या स्वरूपात येथे प्रसिद्ध करत आहोत. ‘यातून सर्वच कलाकारांना साधनेसाठी प्रेरणा मिळो’, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !’

– सुश्री (कुमारी) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, संगीत विशारद), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.

(भाग १)

डावीकडून ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. शालिनी गोविंदराव पलुस्कर, संगीताविषयी मार्गदर्शन करतांना पं. गोविंदराव पलुस्कर आणि सुश्री (कु.) तेजल पात्रीकर

१ . पं. गोविंदराव पलुस्कर यांच्या संगीत साधनेचा प्रवास

१ अ. लहानपणापासून संगीत शिकण्याची पुष्कळ आवड असणे आणि राग ठाऊक नसूनही त्या रागांचे स्वर अचूक गाता येणे : ‘मला (पं. गोविंदराव पलुस्कर यांना) स्वतःहून गायन करण्यात एक वेगळाच आनंद मिळत असे. त्यामुळे मला लहानपणापासून संगीत शिकण्याची पुष्कळ आवड होती. ‘मला कुठला राग आहे ?’, हे कळत नसे; पण मी त्या रागाचे स्वर मनानेच गुणगुणायचो आणि मनानेच काही आलाप-ताना घ्यायचो. मी ज्या रागाच्या आलाप-ताना म्हणायचो, त्या अचूक असायच्या.

१ आ. घरातील वातावरण संगीताचे असल्याने केवळ संगीत कानावर पडल्यामुळे त्यातून अनेक गोष्टी शिकणे : अशा प्रकारे मला रागांची नावे ठाऊक नसायची; परंतु माझ्याकडून गायन आतून आपोआप होत असे. ते ऐकून मला माझ्या काकांनी (पं. दत्तात्रेय विष्णु पलुस्कर यांनी) विविध रागांची ओळख करून दिली. आमच्या घरातील वातावरण संगीताचे असल्याने केवळ संगीत कानावर पडल्यामुळे त्यातून मी अनेक गोष्टी शिकलो. ‘गायकांच्या मुलांना शिकवावे लागत नाही. ती आपोआपच शिकतात’, असे म्हटले जाते.

१ इ. वयाच्या अवघ्या ५ व्या वर्षी तबलाही आपोआप वाजवायला शिकणे : मी साधारण ४ – ५ वर्षांचा असल्यापासूनच तबला वाजवायला शिकलो. मला ताल, लय इत्यादी आपोआप वाजवता येऊ लागले; मात्र त्या वयात फार समज नसल्याने ‘काय वाजवत आहेस ?’, असे कुणी विचारल्यावर त्या तालाचे नाव मला ठाऊक नसायचे. मी गाणे ऐकून त्याला अनुरूप ताल ओळखून तो वाजवायचो.

१ ई. आरंभी वडील बंधू आणि त्यानंतर वडील यांच्याकडून गायनाचे धडे मिळणे अन् त्याच समवेत विविध महान गायकांच्या मैफिली ऐकून रागांचा विस्तार शिकणे : माझे वडील बंधू, म्हणजे स्व. गोपाल चिंतामणराव पलुस्कर यांनी मला माझ्या वयाच्या अवघ्या ४ थ्या वर्षापासून गायन शिकवण्यास प्रारंभ केला. काही कालावधीने ते मुंबईला गेल्यानंतर माझ्या वडिलांनी मला गायन शिकवणे चालू केले. त्या वेळी नाशिकमध्ये अनेक गायकांच्या मैफिली व्हायच्या. त्यांत पं. विनायकराव पटवर्धन, पं. नारायण व्यास, पं. ओंकारनाथ ठाकूर, अशा अनेक दिग्गजांचे संगीत ऐकून मी एकेक राग आणि रागाचा विस्तार शिकत गेलो.

१ उ. संगीताच्या विविध परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर कटक (ओडिशा) येथील संगीत महाविद्यालयात मुख्याध्यापकाचा कार्यभार सांभाळणे, तसेच आकाशवाणीवर आणि लोकांसमोर गाण्याचे कार्यक्रम सादर करणे : ओळखीच्या एका व्यक्तीने मला ‘संगीत विशारद’ या पदवीपर्यंत संगीताचे शिक्षण घेण्यास सांगितले. तेव्हा मी तिला ‘माझी ‘विशारद’ची सिद्धता असल्याने तुम्ही माझी थेट ‘विशारद’ची परीक्षा घ्या’, असे म्हटले; परंतु ‘तसे करता येत नाही’, असे तिने सांगितले. त्यानंतर मी संगीताची प्रवेशिका पूर्ण (तिसरी) ही परीक्षा देऊन ‘विशारद’ या परीक्षेला बसलो आणि तिच्यात उत्तीर्ण झालो.

नंतर मी आकाशवाणीवर गायनासाठीची परीक्षाही दिली. तिच्यात उत्तीर्ण झाल्यानंतर माझे आकाशवाणीवर कार्यक्रम होऊ लागले. ‘विशारद’नंतर मी ‘अलंकार’ या परीक्षेतही उत्तीर्ण झालो. एका ओळखीच्या व्यक्तीकडे कामाविषयी विचारणा केल्यानंतर तिने ‘कटक (ओडिशा) येथील ‘उत्कल कॉलेज ऑफ म्युझिक अँड डान्स’ या महाविद्यालयात मुख्याध्यापकाची जागा रिकामी आहे’, असे सांगितल्यावर मी तेथे गेलो आणि तेथील कार्यभार सांभाळला. तेथे ४ वर्षे नोकरी केल्यानंतर ती नोकरी सोडून मी लखनौ (लक्ष्मणपुरी, उत्तरप्रदेश) येथेही काही काळ नोकरी केली. मी तेथे आकाशवाणीवरही गायलो, तसेच लोकांसमोर कार्यक्रमही सादर केले.

पं. गोविंदराव चिंतामणराव पलुस्कर यांचा थोडक्यात परिचय

पं. गोविंदराव पलुस्कर

पं. विष्णु दिगंबर पलुस्कर म्हणजे संगीतातील एक ऋषितुल्य व्यक्तीमत्त्व ! पं. गोविंदराव चिंतामणराव पलुस्कर हे पं. विष्णु दिगंबर पलुस्कर यांचे नातू आहेत. पं. विष्णु दिगंबर पलुस्कर हे श्री. चिंतामणराव पलुस्कर यांचे काका आहेत. पं. गोविंदरावांचे वडील श्री. चिंतामणराव हे लहानपणापासून त्यांचे चुलत भाऊ पं. दत्तात्रेय विष्णु पलुस्कर यांच्याकडे रहायचे. ते पं. दत्तात्रेय पलुस्कर यांच्याकडेच संगीत शिकले आहेत. पं. गोविंदराव पलुस्कर यांना लहानपणापासूनच गायनाची आवड होती. त्यांचे वडील श्री. चिंतामणराव पलुस्कर हेच त्यांचे संगीतातील गुरु आहेत. वडिलांप्रमाणेच पं. गोविंदराव पलुस्कर यांनीही सगळे जीवन संगीतासाठी समर्पित केले आहे.

पं. गोविंदराव पलुस्कर यांनी वयाची ९० वर्षे पूर्ण केली असूनही त्यांच्यात तरुणांना लाजवेल, असा उत्साह आहे. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागाच्या वतीने संगीत समन्वयक सुश्री (कुमारी) तेजल पात्रीकर यांनी त्यांची भेट घेतली. त्या वेळी ‘पं. पलुस्करांनी सांगितलेली संगीताविषयीची काही मौलिक सूत्रे, त्यांचा संगीत साधनेचा प्रवास आणि त्यांची गुणवैशिष्ट्ये’ त्यांच्याच शब्दांत या लेखात दिली आहेत.

२. पं. गोविंदराव पलुस्कर यांनी संगीताविषयी सांगितलेली मौलिक सूत्रे

२ अ. प्रकृती आणि संगीतातील स्वर यांचा अभ्यास करून ऋषिमुनींनी दिवसाच्या २४ घंट्यांचे ८ प्रहरांनुसार विविध राग निश्चित केलेले आहेत. (३ घंट्यांचा १ प्रहर होतो.)

२ आ. सुलतानी आक्रमणांमुळे हिंदुस्थानी संगीत शृंगारिकतेकडे वळले, तर कर्नाटकी संगीताची भक्ती परंपरा शुद्ध आणि अबाधित आहे.

२ इ. गायक मैफिलीत इतरांसाठी, तर घरी स्वतःच्या आनंदासाठी गात असल्यामुळे मैफिलीपेक्षा घरी संगीताचा सराव करतांना एकाग्रता अधिक असणे : संगीताच्या मैफिलीत गात असतांना एक क्षण असा येतो की, त्या क्षणी गायक गायनाशी पूर्णपणे एकरूप होऊन जातो. त्या वेळी तो स्वतःला विसरून जातो. त्याला ‘आपण मैफिलीत बसून गात आहोत’, याचेही भान रहात नाही. मैफिलीपेक्षा घरी सराव करतांना मनाची एकाग्रता अधिक असते; कारण गायक मैफिलीत इतरांसाठी गात असतो, तर घरी स्वतःच्या आनंदासाठी गात असतो.

२ ई. संतांच्या रचना ऐकल्याने दुर्गुण आणि अहंकार न्यून होऊन मन भक्तीभावाकडे वळणे : भारतीय संगीताला ‘गानयोग’ किंवा ‘नादोपासना’, असे म्हणले जाते. दुर्गुण आणि अहंकार जाण्यासाठी संतांच्या रचना ऐकाव्यात. संत तुलसीदासांच्या रचना भक्तीभावयुक्त आहेत. त्या ऐकल्यावर मन हळूहळू भक्तीभावाकडे वळायला लागते, तसेच मोह दूर व्हायला लागतो. त्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही; कारण मनात भक्ती असेल, तर संगीत साधना आपोआप होते.

२ उ. गायनाने भावानुभूती येण्यासाठी गाण्यातील शब्दांचे अर्थ कळणे आवश्यक असणे : गातांना शब्दांचे अर्थ लक्षात घेतले, तर त्यातील भाव कळून तशी भावानुभूती येते. उदाहरण सांगायचे झाले, तर ‘ठुमक चलत रामचंद्र…’ या संत तुलसीदासरचित भजनात बाल श्रीरामाचे वर्णन केले आहे. हे गातांना त्या शब्दांचे अर्थ समजून घेणे महत्त्वाचे आहे, उदा. रामाच्या पायांतील पैंजण हळूवार वाजत आहेत, बाल श्रीराम चालतांना पडत असतांना माता कौसल्या त्याला धरत आहे. अशा प्रकारे तो प्रसंग आठवून शब्दांचे अर्थ समजून घेतले, तर भावजागृती होऊन तशा अनुभूतीही येतील.

सुश्री (कुमारी) तेजल पात्रीकर

३. पं. गोविंद पलुस्कर यांनी आताच्या कलाकारांविषयी व्यक्त केलेली खंत !

३ अ. पूर्वीच्या काळी पैशांपेक्षा भक्तीला अधिक महत्त्व असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गुरूंकडून संगीत शिकण्याची तळमळ आताच्या तुलनेत अधिक असणे : पूर्वीच्या काळी विद्यार्थ्यांमध्ये संगीत शिकण्याची जी तळमळ होती, तसेच त्यांचा संगीताकडे बघण्याचा जो भाव होता, तो काही अपवाद वगळता आधुनिक (आताच्या) पिढीत बघायला मिळत नाही. प्राचीन काळी ४ – ५ शिष्य शिकायला एकत्र बसायचे. संगीत भक्तीमार्गी असल्याने त्या काळी पैशांपेक्षा भक्तीला अधिक महत्त्व होते.

३ आ. काही अपवाद वगळता अनेक संगीतकार व्यसनाधीन असल्याने त्यांचे शिष्यही त्यांचे अनुकरण करत व्यसनाधीन होणे : काही अपवाद वगळता अनेक संगीतकार व्यसनाधीन असल्याचे लक्षात येते. त्यामुळे गुरूंचे बघून शिष्यही व्यसनांच्या आहारी जातात. ‘गुरु करतात, तर आपणही केले पाहिजे’, असे त्यांना वाटल्याने ते गायनाच्या समवेत हेही शिकतात. अनेक अन्य पंथीय कलाकारांचे अनुकरण करून त्यांचे शिष्यही व्यसनाधीन होतात. ‘समाजाच्या दृष्टीने हे योग्य नाही’, हे त्यांच्या लक्षात येत नाही. पं. विष्णु दिगंबर पलुस्कर यांना कोणत्याही प्रकारचे व्यसन नव्हते. त्यामुळे त्यांचे शिष्यही निर्व्यसनी होते.

३ इ. भारतीय संगीत महान असूनही आजची पिढी पाश्चात्त्य संगीताकडे आकर्षित होत असणे : पाश्चात्त्य संगीतात वाद्यांना अधिक महत्त्व दिले असून भारतीय संगीतात गळ्यातून निघणार्‍या स्वरांना महत्त्व दिले आहे. त्यामुळे पाश्चात्त्य संगीतात स्वरविस्तार करता येत नाही, तर भारतीय शास्त्रीय संगीतात स्वरविस्तार करता येतो. असे असूनही आजची पिढी पाश्चात्त्य संगीताकडे आकर्षित होतांना दिसते.

(क्रमशः पुढच्या रविवारी)

संकलक : सुश्री (कुमारी) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, संगीत विशारद), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (वर्ष २०१९)

पं. गोविंदराव पलुस्कर यांना संगीत साधनेच्या संदर्भात आलेली अनुभूती

संगीतामुळे रक्तदाबाचा त्रास उणावल्यावर आधुनिक वैद्यांनी गोळ्यांची आवश्यकता नसल्याने सांगणे आणि संगीतामुळे प्रकृती नेहमी चांगली असणे : काही दिवसांपूर्वी मला रक्तदाबाच्या त्रासासाठी आधुनिक वैद्यांनी काही औषधे दिली होती. त्या औषधांच्या समवेत माझे संगीतही चालू होते. काही कालावधीनंतर मी पुन्हा आधुनिक वैद्यांकडे जाऊन तपासणी केल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘आता तुम्हाला गोळ्यांची आवश्यकता नाही !’’ संगीतामुळे आता या वयातही मला केवळ तीन गोळ्या चालू आहेत. माझी प्रकृती ठणठणीत आहे. सूर माझ्या रोमारोमांत भरले आहेत. त्यामुळे मला ताप येत नाही. पहिल्यापेक्षा माझ्यात शक्ती जरी अल्प असली, तरी माझ्या मनातून संगीत जात नाही.’’

– पं. गोविंदराव चिंतामणराव पलुस्कर, नाशिक (वर्ष २०१९)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक