पित्याप्रमाणे आधार देऊन साधकांना घडवणारे सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे !

‘ऑगस्ट २०२० मध्ये मी देहली सेवाकेंद्रात सेवेसाठी गेले. तेथे मला सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचे दैवी सान्निध्य लाभले. सद्गुरु पिंगळेकाकांनी ‘आम्हा साधकांना जे शिकवले, ज्या प्रकारे घडवले आणि घडवत आहेत’, ते मी कधी विसरू शकणार नाही. या कालावधीत मला अनेक वेळा त्यांच्यातील ‘परात्पर गुरुदेवांप्रती भाव, समष्टी कल्याणाची तळमळ आणि अन्य दैवी गुण’ यांचे दर्शन घडले. ‘आम्ही घडावे’, अशी अखंड तळमळ असणार्‍या सद्गुरु काकांच्या चरणी ही कृतज्ञतापुष्पे अर्पण करत आहे.

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

१. अन्नपूर्णाकक्षात सेवा करतांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी शिकवलेली सूत्रे

१ अ. अन्नपूर्णाकक्षात सेवा करतांना चुका झाल्यानंतर सद्गुरु पिंगळेकाकांनी ‘सेवा कशी करायला हवी ?’, हे शिकवणे : मी रामनाथी आश्रमात असतांना आठवड्यातून एकदा अल्पाहार बनवण्याची सेवा करण्याव्यतिरिक्त स्वयंपाकघरात कधीच सेवा केली नव्हती. देहली येथे जाण्यापूर्वी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवतांना रामनाथी आश्रमातील अन्नपूर्णाकक्षात दीड ते दोन मास केलेली सेवा, एवढाच काय तो मला अनुभव होता. देहली सेवाकेंद्रात मला अन्नपूर्णाकक्षात सेवा करण्याची संधी मिळाली. तेव्हा प्रथम माझ्या मनात ‘मला स्वयंपाक येतो’, हा अहंयुक्त विचार होता. प्रत्यक्ष सेवा करू लागल्यानंतर माझ्याकडून अनेक चुका झाल्या. त्या वेळी सद्गुरु पिंगळेकाकांनी ‘सेवा कशी करायला हवी ?’, हे मला शिकवले.

सौ. प्रीती आनंद जाखोटिया

१ आ. रामनाथी आश्रमातील साधकांप्रमाणे सेवा करण्यासाठी प्रयत्न करायला सांगणे : सेवाकेंद्रात दुपारचा महाप्रसाद वेळेत होत नसे. सद्गुरु काकांनी अनेक वेळा स्वयंपाकघरात सेवा करणार्‍या साधिकांना त्यासाठी प्रयत्न करायला सांगितले; मात्र तरीही महाप्रसाद वेळेत बनत नसे. तेव्हा त्यांनी साधिकांना ‘रामनाथी आश्रमातील साधकांप्रमाणे आदर्श सेवा करायला हवी’, याची जाणीव करून दिली. ‘रामनाथी आश्रमात निवासाला असणारे साधक पुष्कळ आहेत, तसेच अनेकांची विविध पथ्येही आहेत, तरीही प्रसाद-महाप्रसाद वेळेत पूर्ण होतो, तर आपल्याकडे साधकसंख्या अल्प असूनही सेवा वेळेत का होत नाही ?’, याचे त्यांनी साधिकांना चिंतन करायला सांगितले.

१ इ. स्वयंपाकघरात कधी सेवा केली नसूनही सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी नियोजनाचे अचूक वेळापत्रक बनवून देणे आणि त्यानुसार साधकांनी सेवा केल्याने महाप्रसाद वेळेत बनू लागणे : सद्गुरु काकांनी आम्हाला स्वयंपाकघरातील सेवांचे, तसेच भाजी बनवायच्या कृतींचे, उदा. भाजी चिरणे, फोडणी देणे, शिजवणे आणि भांड्यात भरून पटलावर ठेवणे, यांचे वेळापत्रक करून दिले. त्यांनी भाजी शिजेपर्यंत लागणार्‍या वेळेत करू शकणार्‍या अन्य सेवांचेही वेळापत्रक करून दिले. सद्गुरु काकांनी स्वयंपाकघरात कधीही सेवा केली नाही, तरीही ‘स्वयंपाकघरातील कुठल्या सेवेसाठी किती वेळ लागतो ?’, याविषयी त्यांनी अचूक सांगितले. त्यांनी बनवून दिलेल्या नियोजनाप्रमाणे कृती केल्याने आमच्या सेवेची घडी बसून महाप्रसाद वेळेत बनू लागला. आता प्रतिदिन स्वयंपाकघरात असणार्‍या सेवांविषयी सत्संग होऊन दुसर्‍या दिवशीचे नियोजन साधकांना सांगितले जाते.

२. स्वयंपाकाच्या सेवेसह अनेक सेवांतीलही बारकावे सांगणे

सद्गुरु काकांनी ‘स्वयंपाकघरातील सेवा कशी करायला हवी ?’, हे आम्हाला बारकाव्यानिशी शिकवले. केवळ स्वयंपाकघरातीलच नव्हे, तर ते साधकांना ‘वाहन दुरुस्त करणे, वाहनाची ‘बॅटरी’ खराब होऊ नये, याची काळजी घेणे, बागकाम’, अशा सर्वच सेवांतील बारकावे सांगतात. प्रत्येक वेळी त्यांच्या सर्वज्ञतेची प्रचीती येते.\

३. सहज बोलण्यातून साधिकेला आधार देणे

३ अ. सेवेत चुका झाल्याने निराशा आल्यावर सकारात्मक चिंतन करण्यास शिकवणे : सेवा करतांना माझ्याकडून पुष्कळ चुका होत असत. त्यामुळे ‘मला स्वयंपाकघरातील सेवा जमत नाही’, असा विचार माझ्या मनात यायचा. एकदा मी त्यांना याविषयी सांगितल्यावर त्यांनी मला मार्गदर्शन करून आधार दिला आणि चिंतनाची दिशा दिली. ते मला म्हणाले, ‘‘सर्वांकडून चुका होतात. देव होणार्‍या चुकांकडे कधीच बघत नाही. चूक झाल्यानंतर ‘समष्टीत चुका सांगणे, क्षमायाचना करणे, प्रायश्चित घेणे आणि पुन्हा ती चूक न करणे’, हे आपण करतो ना ?’, हे देव पहातो. तुम्ही तुमच्याकडून ज्या चुका झाल्या, त्याकडे बघू नका, तर ‘ती सेवा चांगली होण्यासाठी आणि तिची कार्यपद्धत बसवण्यासाठी काय करायचे ?’, असे उपायात्मक चिंतन करा.’’ सद्गुरु काकांच्या या मार्गदर्शनामुळे मला चुकांचा ताण न येता सकारात्मक रहाता येऊ लागले.

३ आ. साधकांनी सांगितलेली सूत्रे आणि चुका स्वीकारता न आल्याने मनाचा संघर्ष होणे : स्वयंपाकघराची घडी बसवण्यासाठी साधक मला साहाय्य म्हणून त्यांना जे सुचेल, ते सांगायचे, तसेच माझ्या चुकाही सांगायचे. अनेक वेळा साधकांनी सांगितलेली सूत्रे आणि चुका मला स्वीकारता येत नसत. त्यामुळे माझ्याकडून साधकांनी ‘चुका सांगू नयेत’, यासाठी कृती होत असे. कालांतराने चुकांचे प्रमाण अल्प होऊ लागले, तरीही काही वेळा साधकांनी सांगितल्यावर मला त्यांचे बोलणे स्वीकारता येत नसल्याने माझ्या मनाचा पुष्कळ संघर्ष होत असे. मी साधक आणि प्रसंग यांत अडकल्याने माझा साधनेतील पुष्कळ वेळ वाया जात असे.

३ इ. प्रसंगांमुळे मनात संघर्ष होत असतांना सद्गुरु काकांनी ध्येयाची आठवण करून देणे आणि त्यासाठी साधकांचे साहाय्य घ्यायला सांगणे : एकदा मनात चालू असलेल्या संघर्षाविषयी मी सद्गुरु काकांना सांगितल्यावर त्यांनी मला सांगितले, ‘‘तुम्ही चारचाकी वाहन चालवत असाल आणि शेजारी बसलेल्या व्यक्तीने तुम्हाला काही सांगितले, तर तुम्ही त्याकडे लक्ष द्याल कि गाडी चालवण्याकडे लक्ष द्याल ? कुणी कितीही काही बोलत असले, तरी आपले लक्ष गाडी चालवण्याकडेच असते, तसेच सेवा करतांना साधकांनी आपल्याला काही सुचवले, तर त्याचा साधनेच्या दृष्टीने लाभ करून घेऊन पुढे जायचे. आपले लक्ष केवळ ध्येयाकडे ठेवून जे आपल्याला सुचवतात, त्यांचेच साहाय्य घेऊन सेवा चांगली करण्याचा प्रयत्न करत रहायचा.’’

४. साधक निराश झाल्यास विविध महापुरुषांची उदाहरणे देऊन त्यांना उभारी देणे

सेवाकेंद्रात रहाणारे सर्वच साधक प्रसारात सेवा करणारे आहेत. सर्व जण त्यांच्या सेवांमध्ये व्यस्त असतात. सेवा आणि साधना करतांना होणार्‍या चुका किंवा आध्यात्मिक त्रास यांमुळे साधकांना निराशा आल्यास सद्गुरु काका तोटकाचार्य (श्री आद्य शंकराचार्य यांचे शिष्य) यांनी केलेल्या सेवेविषयी सांगून साधकांना प्रोत्साहन देतात. ते साधकांना राजपूत सैनिक गोरा-बादल यांनी मरेपर्यंत राजाच्या रक्षणासाठी केलेले प्रयत्न सांगून ध्येयासाठी प्रेरणा देतात. यामुळे साधकांमध्ये उत्साह वाढून त्यांच्या प्रयत्नांनाही गती मिळते.

५. साधकांकडून गुण वाढवण्यासाठी प्रयत्न होण्यावर भर देणे

‘साधकांमध्ये गुणसंवर्धन व्हावे’, यासाठी सद्गुरु काका सतत प्रयत्नरत असतात. एकदा श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सेवाकेंद्रातील साधकांसाठी आंबे दिले होते. सद्गुरु काकांनी प्रत्येक साधकाला आंबा प्रसाद म्हणून दिला. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी एक आंबा सद्गुरु काकांसाठीही दिला होता. त्यांनी मला तो आंबा चिरून द्यायला सांगितला. आंबा चिरल्यावर तो आंबट असल्याचे माझ्या लक्षात आले. त्यामुळे मी माझ्याकडील आंबा चिरून सद्गुरु काकांना दिला. सद्गुरु काकांना याविषयी नंतर समजल्यावर ते मला म्हणाले, ‘‘मला गोड आंबा देण्यातून तुमचा भाव व्यक्त झाला; पण तुम्ही विचारण्याचा गुण वाढवण्याची संधी गमावलीत.’’ या प्रसंगातून ‘गुण वाढवणे का महत्त्वाचे आहे ?’, हे मला शिकायला मिळाले.

६. नकारात्मक विचारांवर तपाससूचीद्वारे मात करण्यास शिकवून साधकांना स्वयंपूर्ण बनवणे

‘साधकांच्या मनात नकारात्मक विचार आल्यास साधकांचा संघर्ष करण्यात पुष्कळ वेळ जातो’, हे सद्गुरु काकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी ‘नकारात्मक विचार आल्यानंतर काय करायचे ?’, याविषयी तपाससूची करून त्यावर चिंतन करण्यास सांगितले.

अ. मनात येणारे विचार माझे आहेत कि अनिष्ट शक्तींचे ?
आ. ते साधनेला अनुकूल आहेत कि प्रतिकूल ?
इ. यातून माझी साधना होत आहे ना ?
ई. मनातील या विचारांवर मात करण्यासाठी इतरांना सांगितले का ?

मनात अयोग्य विचार आल्यास हे प्रश्न मनाला विचारल्यावर साधकांना लगेचच विचारांतून बाहेर पडण्यास साहाय्य होऊ लागले. त्यामुळे साधक स्वयंपूर्ण बनले, तसेच इतरांना सांगितल्यामुळे साधकांमध्ये प्रांजळपणाही वाढला.

७. अनुभूती

७ अ. ‘सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्यामध्ये आवश्यकतेप्रमाणे देवतांचे तत्त्व कार्यरत होते’, याची प्रचीती सद्गुरु काकांमधील ‘शिष्यभाव, दास्यभाव आणि शरणागतभाव, तसेच त्यांच्यातील तारक आणि मारक तत्त्व’ यांच्या माध्यमातून येणे : श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ देहली सेवाकेंद्रात आल्यावर सद्गुरु काका त्यांच्याशी शिष्यभावात राहून अत्यंत नम्रतेने बोलतात. परात्पर गुरुदेव, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याविषयी बोलतांना त्यांच्या तोंडवळ्यावर दास्यभाव अन् शरणागतभाव दिसतो.
साधकांना चुका सांगतांना त्यांच्यातील तत्त्वनिष्ठता अनुभवता येते, तर साधकांचे कौतुक करतांना आणि साधकांना आधार देतांना त्यांच्यातील तारक तत्त्व अनुभवता येते. सूक्ष्मज्ञान प्राप्तकर्त्या कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) यांनी ‘सद्गुरु काकांमध्ये आवश्यकतेप्रमाणे देवतांचे तत्त्व कार्यरत होते’, असे एका सूक्ष्म-परीक्षणात लिहिले असल्याचे दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झाले होते. कु. मधुराताईंचे हे परीक्षण अचूक असल्याची अनुभूती सेवाकेंद्रातील आम्ही साधक क्षणोक्षणी घेतो.

७ आ. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या ठिकाणी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन होणे : देहली सेवाकेंद्रात जाण्यापूर्वी मी रामनाथी आश्रमात राहिले असल्याने ‘मला सेवाकेंद्रात रहायला आणि सेवा करायला जमेल का ?’, असा विचार माझ्या मनात येत होता. मी याच विचारात देहली सेवाकेंद्रात पोचले. दारातून आत प्रवेश केल्यावर मला दिसले, ‘समोर सद्गुरु पिंगळेकाका एका साधकाशी बोलत पाठमोरे उभे आहेत.’ त्यांना पहाताक्षणी मला त्यांच्या ठिकाणी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन झाले. परात्पर गुरुदेवांप्रमाणेच सद्गुरु काका उंच दिसत होते. त्यांच्या ठिकाणी प.पू. गुरुदेवांचे दर्शन झाल्यामुळे माझ्या मनातील विचार न्यून झाले.’

– सौ. प्रीती आनंद जाखोटिया, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.११.२०२१)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक