मुंबई, २५ डिसेंबर (वार्ता.) – जत तालुक्यातील गावांना पाणी देण्यासाठी जलसंपदा विभागाकडून ६ ‘टी.एम्.सी.’ पाणीयोजना सिद्ध करण्यात आली आहे. लवकरच या योजनेची कार्यवाही करण्यात येणार आहे, अशी माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी विधानसभेत दिली. विधानसभेत सदस्य विक्रम सावंत यांनी जत तालुक्यातील कर्नाटक सीमेवर असलेल्या ४० गावांना महाराष्ट्रात सामावून घेणे आणि पाणी मिळण्यासाठी कर्नाटक सरकारशी करार करण्याच्या संदर्भात औचित्याचे सूत्र मांडले.
जलसंपदामंत्री जयंत पाटील म्हणाले, ‘‘या ६५ गावांना ६ ‘टी.एम्.सी.’ पाणी म्हैशाळ येथून देण्याची योजना करण्यात आली असून तांत्रिक गोष्टीही पूर्ण करण्यात आल्या आहेत. जलसंपादन विभागाच्या या योजनेचा प्रस्ताव मंत्रीमंडळात मांडण्यात येणार आहे. यानंतर लवकरच या योजनेची कार्यवाही करण्यात येईल.’’