वर्ष १९९५ मध्ये परात्पर गुरु डॉक्टरांनी लावलेल्या ग्रंथरूपी रोपट्याचे केवळ २६ वर्षांमध्ये ३५० ग्रंथरूपी वृक्षामध्ये रूपांतर झाले आहे. आणखी ५ सहस्रांहून अधिक ग्रंथ प्रकाशित होतील इतके लिखाण संगणकात आहे. सप्टेंबर २०२१ पासून सनातन संस्था राबवत असलेल्या ‘सनातन धर्माच्या ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या अंतर्गत सनातनच्या ग्रंथांचा भारतभर व्यापक प्रमाणावर प्रसार केला जात आहे. या अभियानाला सर्वत्रच उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद लाभत आहे. या अभियानाच्या अंतर्गत अवघ्या ३ मासांतच मराठी, हिंदी, कन्नड, गुजराती आणि इंग्रजी या ५ भाषांतील ३,५८,९८० ग्रंथांची विक्री झाली आहे ! हे अभियान चालू असतांनाच सनातनचा ३५० वा ग्रंथ प्रकाशित होणे, हा दुग्धशर्करायोगच आहे.
‘ईश्वरी नियोजनानुसार वर्ष २०२५ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना होईल आणि नंतर अनंत काळ सनातनचे ग्रंथ वेदांसारखे ‘धर्मग्रंथ’ म्हणून मान्यता पावतील’, असा आशीर्वाद ‘सप्तर्षी जीवनाडीपट्टी’द्वारे महर्षींनी दिला आहे. परात्पर गुरु डॉक्टरांच्या या दैदीप्यमान ग्रंथकार्याचा संपूर्ण भारतवर्षालाच अभिमान वाटला पाहिजे.
‘अखिल मानवजातीला या ज्ञानगंगेत न्हाऊन निघून मनुष्यजन्माचे सार्थक करून घेता यावे’, ही श्री गुरुचरणी प्रार्थना !’
– (पू.) संदीप आळशी, सनातनच्या ग्रंथांचे संकलक (१५.१२.२०२१)
५. परात्पर गुरु डॉक्टर लिखित ग्रंथांतील ज्ञानाची ठळक वैशिष्ट्ये
५ अ. ग्रंथांसाठीचे ५० टक्के लिखाण परात्पर गुरु डॉक्टरांना आतून स्फुरणे : ‘सनातनच्या ग्रंथांचे वैशिष्ट्य म्हणजे यांतील ५० टक्के लिखाण हे इतरांचे लेख, साधकांना मिळालेले ईश्वरी ज्ञान इत्यादींच्या माध्यमातून गोळा झालेले आहे, तर उरलेले ५० टक्के लिखाण मला प.पू. बाबांच्या (प.पू. भक्तराज महाराज यांच्या) आशीर्वादामुळे आतून स्फुरलेले आहे !’– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (४.९.२०२१)
५ आ. आधुनिक विज्ञानयुगातील मानवालाही साधनेकडे वळवणारे नाविन्यपूर्ण ईश्वरी ज्ञानाचे ग्रंथ ! : ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने सनातनच्या काही साधकांना विविध विषयांसंबंधी सूक्ष्मातून शास्त्रीय परिभाषेत सखोल आणि नाविन्यपूर्ण ईश्वरी ज्ञान मिळते. ‘या ज्ञानाचे एवढे महत्त्व का आहे ?’, हे पुढे दिलेल्या केवळ एका दाखल्यावरूनही लक्षात येते.
सध्याच्या आधुनिक विज्ञानयुगातील पिढीला ‘का ? कसे ?’, असे प्रश्न विचारायची सवय असते. त्या प्रश्नांची वैज्ञानिक परिभाषेत उत्तरे मिळाली की, तिचे समाधान होऊन ती अध्यात्माकडे लवकर वळते. स्त्रीने कपाळावर कुंकू लावणे, स्त्रीने केसांची वेणी किंवा अंबाडा घालणे यांसारख्या अनेक सात्त्विक कृती हिंदु धर्मात सांगितल्या आहेत. कालौघात धर्मशिक्षणाच्या अभावामुळे अशा कृतींचे महत्त्व हिंदु समाजाला न राहिल्याने आजकाल अशा कृती हिंदूंकडून तेवढ्या केल्या जात नाहीत. याउलट ‘शर्ट-पँट’ घालणे, ‘पिझ्झा-बर्गर’ आदी पदार्थ खाणे यांसारख्या हिंदु धर्मात न सांगितलेल्या तामसिक कृती पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे आज हिंदूंकडून सहजपणे केल्या जातात. परात्पर गुरु डॉक्टरांनी लिहिलेल्या ग्रंथांत ‘सात्त्विक कृती का कराव्यात ? आणि तामसिक कृती का टाळाव्यात ?’, यांमागील अध्यात्मशास्त्र सांगितले असल्यामुळे ते कलियुगातील मानवाला पटते आणि तो अध्यात्माकडे लवकर वळतो.
५ इ. अध्यात्मातील प्रत्येक विषयामागील मूलभूत सिद्धांत किंवा तत्त्व शोधून त्या आधारे विषय प्रतिपादन करणे : अध्यात्मातील प्रत्येक विषयामागे काही ना काहीतरी मूलभूत सिद्धांत किंवा तत्त्व असतेच. परात्पर गुरु डॉक्टर प्रत्येक विषयामागील मूलभूत सिद्धांत किंवा तत्त्व शोधून त्या आधारे विषयाचे प्रतिपादन करतात. यामुळे वाचकांना अध्यात्मशास्त्राची परिपूर्णता कळते आणि त्यामुळे त्यांची अध्यात्मशास्त्रावरील श्रद्धा आणखी वाढण्यास साहाय्य होते. याचे एक उदाहरण पुढे दिले आहे.
शारीरिक आणि मानसिक विकारांच्या निर्मूलनासाठी जसे देवतांचे नामजप उपयोगी ठरतात, तसेच काही अंकजपही उपयोगी ठरतात. विशिष्ट अंकजप हा विशिष्ट देवतेच्या तत्त्वाशी साधर्म्य असणारा असतो. अंकजप केल्यामुळे त्याच्याशी निगडित असलेल्या देवतेचे तत्त्व आकर्षिले जाते. ‘विकार-निर्मूलनासाठी नामजप’ या ग्रंथामध्ये परात्पर गुरु डॉक्टरांनी ० ते ९ यांतील प्रत्येक अंकाची विविध विकारांवरील उपयुक्तता दिली आहे. प्रत्येक अंकाचा आपण नेहमी करतो, तसा उच्चार केल्याने आध्यात्मिक स्तरावरील उपाय होतात.
५ ई. प्रगत वैज्ञानिक उपकरणांद्वारे केलेले संशोधनात्मक प्रयोग : सध्याच्या काळात व्यक्तीच्या किंवा ऋषिमुनींच्या अनुभवसिद्ध शब्दांपेक्षा प्रगत वैज्ञानिक कसोट्यांवर सिद्ध झालेले ज्ञानच अनेकांना विश्वासार्ह वाटते. त्यामुळे सनातनच्या ग्रंथांत प्रगत वैज्ञानिक उपकरणांद्वारे केलेले संशोधनात्मक प्रयोग समाविष्ट केले जातात.
फळाचा रस आणि मद्य यांपैकी फळाचा रस सेवन करण्याने, तसेच पाश्चात्त्य अन् भारतीय शास्त्रीय संगीत यांपैकी भारतीय शास्त्रीय संगीत ऐकण्याने व्यक्तीवर होणारा आध्यात्मिक स्तरावरील सकारात्मक परिणाम अभ्यासणे; नामजप, मुद्रा आणि न्यास यांचा गर्भवती स्त्री अन् गर्भ यांवर होणारा आध्यात्मिक स्तरावरील सकारात्मक परिणाम अभ्यासणे; देशी गायीपासून प्रक्षेपित होणार्या सकारात्मक ऊर्जेचे प्रमाण अभ्यासणे, यांसारखे ५ सहस्रांहून अधिक संशोधनात्मक प्रयोग नोव्हेंबर २०२१ पर्यंत करण्यात आले आहेत.’
५ उ. सूक्ष्म-ज्ञानाविषयीची परीक्षणे आणि चित्रे
५ उ १. सूक्ष्म म्हणजे काय ? : पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील, ते म्हणजे ‘सूक्ष्म’.
५ उ २. सूक्ष्म-ज्ञानाविषयीची परीक्षणे : एखादी वस्तू किंवा घटना यांच्याविषयी सूक्ष्मातून ज्ञान जाणवणे, याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे परीक्षण’ असे म्हणतात. सनातनचे साधक गुरुकृपा आणि त्यांच्यातील सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता यांमुळे ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे परीक्षण’ करू शकतात. विविध धार्मिक कृती, यज्ञयाग आदींच्या वेळी होणारी सूक्ष्मातील प्रक्रिया दर्शवणारी अनेक परीक्षणे सनातनच्या ग्रंथांत समाविष्ट केली आहेत.
५ उ ३. सूक्ष्म-ज्ञानाविषयीची चित्रे : चित्रांच्या स्वरूपात मांडले जाणारे ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे परीक्षण’ म्हणजे ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र’. सात्त्विक वेशभूषा, सात्त्विक आहार, सात्त्विक अलंकार, धार्मिक कृती आदींच्या संदर्भातील सूक्ष्म-स्तरावरील प्रक्रिया या चित्रांतून दर्शवली जाते.
५ उ ४. ग्रंथांत ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीची परीक्षणे’ आणि ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीची चित्रे’ प्रसिद्ध करण्यामागील उद्देश : आपण स्थुलातून एखादी कृती केल्यावर त्या कृतीचा सूक्ष्मातून काय परिणाम होतो, हे कळण्याची क्षमता बहुतांश व्यक्तींमध्ये नसते. सूक्ष्मातील परिणाम कळल्यावर स्थुलातील कृतीविषयी श्रद्धा निर्माण होते, तसेच तात्त्विक ज्ञानातील कठीण भाग समजायलाही सोपा होतो. यासाठी सनातनच्या ग्रंथांत ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीची परीक्षणे’ आणि ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीची चित्रे’ प्रसिद्ध केली जातात.
५ ऊ. सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे प्रयोग : एखाद्या गोष्टीकडे पाहून चांगले किंवा त्रासदायक वाटते का ? हे सूक्ष्मातून पहाणे किंवा त्या गोष्टीच्या संदर्भात एखादी अनुभूती येते का ? ते पहाणे म्हणजेच ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे प्रयोग’ करणे होय. व्यक्तीला एखाद्या गोष्टीचे महत्त्व पटवून सांगितले, तर ते पटते; परंतु त्या गोष्टीचा त्या व्यक्तीने स्वतः अनुभव घेतल्यावर किंवा त्या गोष्टीच्या संदर्भात तिला अनुभूती आल्यावर त्या गोष्टीचे महत्त्व तिला अधिक पटते. वाचकांकडून ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ करवून घेतल्यानेही हाच उद्देश साध्य होतो. वाचकांनी हे प्रयोग करण्याचा अधिकाधिक सराव केल्यावर त्यांच्यामध्येही सूक्ष्मातील स्पंदनांचा अभ्यास करण्याची क्षमता वृद्धींगत होण्यास साहाय्य होते. यासाठीच ग्रंथांत विविध सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे प्रयोग देण्यात येतात.
६. ग्रंथ चैतन्यमय बनवण्याविषयी परात्पर गुरु डॉक्टरांचे नाविन्यपूर्ण दृष्टीकोन !
६ अ. परात्पर गुरु डॉक्टरांनी ग्रंथांची अधिकाधिक सेवा साधकांकडूनच करवून घेणे : ‘१९९५ या वर्षी ‘संत भक्तराज महाराज यांचे चरित्र’ आणि ‘संत भक्तराज महाराज यांची शिकवण’ हे दोन ग्रंथ प्रसिद्ध झाल्यावर प.पू. बाबा डॉ. आठवले यांना म्हणाले होते, ‘‘पैशांनी ही कामे होणार नाहीत.’’ साधक ग्रंथांची सेवा करत असल्याने ग्रंथ अधिक चैतन्यमय होण्यास साहाय्य होते, तसेच ग्रंथसेवेच्या माध्यमातून साधकांची साधनाही होते. यासाठीच परात्पर गुरु डॉक्टरांनी ग्रंथलिखाणाच्या सेवेपासून ग्रंथवितरणाच्या सेवेपर्यंतच्या सर्व सेवांमध्ये साधकांनाच सहभागी करून घेतले आहे. याच दृष्टीने त्यांनी वर्ष १९९७ मध्ये मडगाव, गोवा येथे सनातन संस्थेचे मुद्रणालयही चालू केले होते. काही अडचणींमुळे ते वर्ष २०१२ पासून बंद करण्यात आले असून आता ग्रंथांची छपाई बाहेरून केली जाते.
६ आ. परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘ग्रंथ सात्त्विक बनवण्या’चा संस्कार साधकांवर करणे : अध्यात्माविषयीचे लिखाण मुळातच सात्त्विक असते. ग्रंथाचे संकलन आणि व्याकरण अचूक असले की, लिखाणातील सात्त्विकता घटत नाही; म्हणून परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना या दोन्ही गोष्टी परिपूर्ण करण्यास शिकवले. याचप्रमाणे त्यांनी ग्रंथांची मुखपृष्ठे, ग्रंथांमध्ये वापरली जाणारी चित्रे आणि आकृत्या इत्यादीही सात्त्विक करण्यास शिकवले.’
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/540332.html
– (पू.) संदीप आळशी (सनातनच्या ग्रंथांचे संकलक)