चीनची साम्यवादी धोरणे आणि भारताची भूमिका

चीनमधील कम्युनिस्ट पक्षाने जुलै २०२१ मध्ये १०० वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्ताने चीनचे अध्यक्ष शी-जिनपिंग यांच्या नेतृत्वाखाली एक मोठा कार्यक्रम करण्यात आला. विशेष म्हणजे याच चौकात ४ जून १९८९ या दिवशी चीनच्या सैन्याने लोकशाहीला समर्थन देणार्‍या १० सहस्र चिनी विद्यार्थ्यांचा संहार केला होता. साम्यवादाच्या नावाखाली केलेले क्रौर्य आणि विस्तारवाद पोसणार्‍या चीनची धोरणे या लेखात पहात आहोत. या लेखातील पहिल्या भागात चीनमधील साम्यवादचा थोडक्यात इतिहास पाहिला आणि आता दुसर्‍या भागात चीनचा भारताला असलेला धोका अन् भारताची अपेक्षित भूमिका याविषयी पाहू.

श्री. अनिल साखरे

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा :  https://sanatanprabhat.org/marathi/537204.html

भारत-चीन ताण

प्रातिनिधिक छायाचित्र

भारताच्या दृष्टीने बघितले, तर जवळपास साडेतीन सहस्र किलोमीटरची सीमा चीनसमवेत लागून आहे आणि दोघांचे संबंध नेहमीच ताणाचे राहिले आहेत. आता तर चीनने गलवान आणि लडाख येथे हातपाय पसरून त्यावर काय प्रतिक्रिया उमटते ? याचा अंदाज घेतलेला आहे. आता युद्धाचे तंत्र पालटले असून विमाने, क्षेपणास्त्र, रणगाडे यांचा वापर न करताही कोरोनासारखा एखादा विषाणू निर्माण करून जगभरामध्ये काय उन्माद माजवता येतो, याचा प्रयोग चीनने जगाला दाखवला. कोरोनानामक विषाणूची निर्मिती करून सगळ्या जगालाच जे काही जायबंदी केले आहे, ते बघितल्यानंतर चीन कुठल्या दृष्टीने विचार करतो आणि कोणत्या योजना आखतो ? याचा अंदाज येतो.

चीनची अन्य देशांविषयीची धोरणे

सध्याची चीनची अन्य देशांविषयीची धोरणे सर्वसाधारणप्रमाणे खालील पाच सूत्रांमध्ये विभागता येतील.

१. आशिया, आफ्रिका आणि युरोप खंडातील अविकसित अन् विकसनशील देशांमध्ये चीनने मोठे रस्ते, धरणे, वीजनिर्मिती, बंदरांचा विकास, विमानतळ बांधणे अशा पायाभूत सोयीसुविधा निर्माण करण्याच्या नावाखाली या राष्ट्रांना त्यांच्या क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त असे कोट्यवधी रुपयांचे कर्ज देऊन त्या राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था पुढे मोडीत निघतील, अशी व्यवस्था केली आहे.

२. जवळपास १९ राष्ट्रांना चीनची सीमा लागून आहे. एक रशियाचा अपवाद सोडला, तरी इतर सर्व राष्ट्रांसमवेत चीनचा सीमावाद तंटा आहे. सीमांवर नियमित तणाव ठेवणे, तसेच सीमेवर युद्धसदृश परिस्थिती निर्माण करून आजूबाजूच्या प्रदेशांमध्ये हातपाय पसरणे, हे चीनचे जुने धोरण आहे. तिबेटचा घास चीनने अशाच रितीने घेतला.

३. वेगवेगळे नवीन ‘ॲप्स’ निर्माण करून त्याद्वारे आणि सायबर गुन्हेगारी यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या राष्ट्रांच्या संरक्षण, अर्थ, व्यापार आणि उद्योग इत्यादी खात्यांमध्ये हेरगिरी करणे.

४. आपल्या देशात उत्पादित झालेला हलक्या प्रतीचा स्वस्त माल देशोदेशींच्या बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर ओतून स्थानिक बाजारपेठांना भिकेला लावणे.

५. विसाव्या शतकामध्ये अमेरिकेने सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि संरक्षण या क्षेत्रांमध्ये जी जगाच्या नेतृत्वाची आणि जगाच्या पोलिसाची भूमिका निभावली, त्याला समर्थ स्पर्धक बनून अमेरिकेसमोर आव्हानात्मक परिस्थिती निर्माण करणे.

भारतासमोरील आव्हाने आणि त्याने परंपरेचा आदर्श ठेवून कृती करणे आवश्यक

भारताच्या सीमेवर पाकिस्तान आणि चीन सारखे मोठे प्रबळ शत्रू, म्हणजे एक आत्मघातकी, जिहादी आतंकवादी कारवाया करणारा, तर दुसरा सुसंस्कृत जगताचे कुठलेही नीतीनियम न पाळता आपले हातपाय पसरवणारा ‘ड्रॅगन’ हे आहेत. दोन दोन शत्रूदेश दरवाजा ठोठावत असतांना आणि त्यांच्या कुकृत्याने बेजार झालेला असतांना त्यांना तोंड देण्याचे आव्हान भारतापुढे आहे. भारताने त्याच्या गौरवशाली महान परंपरेचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून पुढील पन्नास-शंभर वर्षांसाठी निश्चित असा कृती आराखडा सिद्ध करून त्यावर पक्षनिरपेक्ष योग्य ती कारवाई करणे आता आवश्यक आहे.

सामर्थ्य हेच दरारा निर्माण करण्याचे साधन !

महाभारतकार महर्षि व्यासांनी त्यांच्या महाभारत ग्रंथात लिहूनच ठेवले आहे –

 

लभ्या धरित्री तव विक्रमेण ज्यायांश्च वीर्यास्त्रबलैर्विपक्षः ।
अतः प्रकर्षाय विधिर्विधेयः प्रकर्षतन्त्रा
हि रणे जयश्रीः ॥ – किरातार्जुनीय, सर्ग ३, श्लोक १७

अर्थ : पराक्रमानेच तुम्ही पृथ्वी प्राप्त करून घेऊ शकता. तुमचा शत्रू पराक्रम आणि अस्त्रबलामध्ये तुमच्या वरचढ आहे. त्यामुळे तुम्हाला ही स्वतःच्या उत्कर्षासाठी प्रयत्न केले पाहिजेत; कारण युद्धात विजयश्री उत्कर्षाच्याच अधीन रहाते.

सामर्थ्य हेच आंतरराष्ट्रीय राजकारणात आपला दरारा निर्माण करण्याचे साधन आहे.

भगवान योगेश्वर यांनीही अर्जुनाला गीता उपदेश करतांना सांगितले, ‘तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः । – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्लोक ३७’ (अर्थ : हे कुंतीपुत्र अर्जुना, तू युद्धाचा निश्चय करून उभा रहा); पण या सिद्धांताकडे आम्ही कधी लक्षच दिले नाही आणि त्याची शिक्षा आमच्या राष्ट्राला पुरेपूर भोगावी लागली.

काँग्रेसच्या काळात भारताला घातक ठरलेले अहिंसेचे आणि क्षमेचे धोरण !

भारत स्वतंत्र झाल्यानंतर नको, त्या महात्म्यांच्या उपदेशाने आम्ही शांती आणि अहिंसा यांचे तत्त्वज्ञान अंगिकारले आणि त्यामुळे हानी अशी झाली की, वर्ष १९४८ मध्ये पाकिस्तानने आणि वर्ष १९६५ मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले, तेव्हा त्यांचे सैनिक अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी लढाई करत होते, तर आमच्या सैन्यदलाला लाकडाच्या लाठ्या-काठ्या अन् नळ्याच्या बंदुका घेऊन लढाई करावी लागली आणि त्यामध्ये सहस्रोंच्या संख्येने सैनिकांना नाहक आपले बलीदान करावे लागले. वर्ष १९७१ च्या बांगलादेश युद्धात एक लाखापेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक आमच्या कह्यात असतांना आम्ही त्यांना क्षमा केली. आज तोच पाकिस्तान आमच्या डोक्यावर बसला आहे. त्यामुळे शत्रूच्या संदर्भात अहिंसा आणि क्षमा ही धोरणे भारताने अवलंबणे कदापिही योग्य नाही.

भारताने दक्षिण आशियाई देशांशी सामरिक भागीदारी करावी !

यापुढे भारताने काळाच्याही पुढचा विचार करून दक्षिण चीन समुद्रामधील तैवान, सिंगापूर, मलेशिया, फिलिपाईन्स, दक्षिण कोरिया, जपान, ऑस्ट्रेलिया या देशांची सामरिक भागीदारी केल्याने दक्षिण चीन समुद्रातील चीनच्या वाढत्या हालचालींवर लक्ष ठेवणे सोपे जाईल. त्यासमवेत आधुनिक शस्त्रे, अस्त्रे, अण्वस्त्रे, रासायनिक जैविक अस्त्रे यांनी सुसज्ज असणे महत्त्वाचे आहे; कारण यापुढची लढाई केवळ बंदुका, तोफा, रणगाडे, विमाने, युद्धनौका, पाणबुड्या यांच्यापुरती मर्यादित नसेल.

भारताने आता आव्हानाला प्रतिआव्हान द्यावे !

पुढील युद्ध हे ‘स्पेस’मध्ये (म्हणजे अवकाशात) एकमेकांचे अवकाशातील उपग्रह नेस्तनाबूत करणे, रासायनिक अस्त्रे वापरणे किंवा कोरोनासारख्या जैविक अस्त्राने होणार आहे. तेव्हा भारतानेही अशी सगळी शस्त्रे, अस्त्रे निर्माण करतांना कुठलाही पाप-पुण्याचा विचार किंवा कुठलेही विधीनिषेध बाळगू नये. तसे नसते, तर श्रीकृष्णाने अर्जुनाला त्यांचे भाऊ, चुलते, काका, मामा, आजोबा, पणजोबा, मित्रमंडळी, नातेवाईक यांना मारण्यासाठी प्रवृत्त केले नसते ! भारताने आता आव्हानाला प्रतिआव्हान द्यावे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराप्रमाणे डावाला प्रतिडाव, आव्हानाला प्रतिआव्हान आणि शहला काटशह, बंदुकीच्या गोळीला तोफेच्या गोळ्यानेच उत्तर देऊन शत्रूला नामोहरम करता येते; कारण संवाद, चर्चा, वाटाघाटी, मुत्सद्देगिरी या सगळ्या गोष्टी चीन आणि पाकिस्तान यांच्यापासून कोसो मैल दूर आहेत. त्यांना ही भाषा समजत नाही. तेव्हा त्यांना समजेल, अशा भाषेत आम्हाला उत्तर द्यावे लागेल !’

– श्री. अनिल दत्तात्रेय साखरे, कोपरी, ठाणे पूर्व.