विविध सेवांचे दायित्व घेऊन तळमळीने सेवा करणारे सनातनचे साधक श्री. सुरेश कांबळे यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

विविध सेवांचे दायित्व घेऊन तळमळीने सेवा करणारे सोलापूर येथील सनातनचे साधक श्री. सुरेश कांबळे (वय ६३ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

श्री. सुरेश कांबळे यांचा सत्कार करतांना सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

सोलापूर, २१ डिसेंबर (वार्ता.) – विविध सेवांचे दायित्व घेऊन तळमळीने सेवा करणारे, तसेच इतरांना निरपेक्षपणे साहाय्य करणारे येथील श्री. सुरेश कांबळे (वय ६३ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली असून ते जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाले आहेत, अशी आनंदवार्ता सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी दिली. येथील साधकांच्या एका अनौपचारिक सत्संगात ही आनंदवार्ता देण्यात आली. या वेळी सनातनच्या संत पू. (कु.) दीपाली मतकर, सौ. उल्का जठार (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) आणि सोलापूर येथील साधक यांनी श्री. कांबळे यांची गुणवैशिष्ट्ये सांगितली. या वेळी श्री. सुरेश कांबळे यांच्या पत्नी सौ. जयश्री कांबळे याही उपस्थित होत्या.

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांचे साधकांसाठी ‘साधनेचे प्रयत्न तळमळीने आणि सातत्याने होण्यासाठी कोणते प्रयत्न करायचे’ याविषयी मार्गदर्शन चालू होते. हे मार्गदर्शन चालू असतांनाच ‘श्री. सुरेश कांबळे यांनी कशा प्रकारे तळमळीने सेवा करून श्रीगुरूंचे मन जिंकले’, याविषयी सांगून ‘कांबळेकाका जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाले आहेत’, असे सद्गुरु (कु.) स्वातीताई यांनी सांगितले. या वेळी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी श्री. कांबळे यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र भेट देऊन त्यांचा सत्कार केला.

श्री. कांबळे यांनी समष्टी साधनेला व्यष्टी साधनेची उत्तम जोड दिली ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

श्री. कांबळेकाका यांनी समष्टी साधनेला व्यष्टी साधनेची उत्तम जोड दिली. त्यांचे व्यष्टी साधनेचे प्रयत्न चांगले असल्याने त्यांना कितीही त्रास झाला, तरी त्यांची तळमळ न्यून झाली नाही. श्री. कांबळे यांच्याप्रमाणे साधकांनी चिकाटीने व्यष्टी आणि समष्टी साधनेसाठी प्रयत्न करावेत.

श्री. सुरेश कांबळे

‘गुरुदेव माझ्याकडून करवून घेत आहेत’, याची जाणीव वाढली ! – श्री. सुरेश कांबळे

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या संदर्भातील जिल्हास्तरीय सेवा मिळाल्यावर पू. (कु.) दीपालीताई म्हणाल्या होत्या की, ‘काका तुम्हाला ही सेवा चांगल्या पद्धतीने करता येणार !’ तोच संकल्प माझ्यासाठी कार्यरत झाला. मागील काही दिवसांपासून ‘मी करतो’ ही जाणीव न्यून होऊन ‘गुरुदेव माझ्याकडून करवून घेत आहेत’, याची जाणीव वाढली. मागील वर्षी मला पुष्कळ शारीरिक त्रास झाले, त्यातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेनेच मी बाहेर पडलो. अन्य साधकांचा व्यष्टी आढावा घेत असतांना मला माझ्या साधनेची घडी बसवण्यासाठी आढाव्याच्या माध्यमातून साहाय्य झाले.

श्री गुरूंना अपेक्षित अशी सेवा होण्यासाठी तळमळीने प्रयत्न करणारे श्री. सुरेश कांबळे !

लेखिका : पू. (कु.) दीपाली मतकर, सोलापूर

पू. (कु.) दीपाली मतकर

१. ‘श्री. कांबळेकाका सर्वांशी पुष्कळ नम्रतेने बोलतात.

२. स्थिरता

काका नेहमी स्थिर आणि शांत असतात. ते स्थिर राहून त्यांना सेवेत आलेल्या अडचणी सांगतात.

३. त्यांना कधीच कुणाविषयी प्रतिक्रिया येत नाहीत.

४. स्वतःला पालटण्याची तळमळ

गुरुदेवांना अपेक्षित असे प्रयत्न करण्याची काकांची तळमळ असते. व्यष्टी साधनेच्या आढाव्यात ते पुष्कळ तळमळीने ‘मी स्वतःत पालट कसा करू ?’, असे आढावासेवकांना विचारतात.

५. जाणवलेला पालट

काकांचा इतरांना साहाय्य करण्याचा भाग वाढला आहे.’  (२६.१०.२०२१)

सौ. उल्का जठार

सौ. उल्का जठार (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), अकलूज, जिल्हा सोलापूर.

१. ‘श्री. कांबळेकाकांमध्ये ‘व्यवस्थितपणा, नम्रता, प्रेमभाव आणि चिकाटी’, हे गुण आहेत.

२. काका व्यष्टी साधनेच्या आढाव्यात नेमकेपणाने बोलतात, तसेच त्यांच्याकडून काही चुका झाल्यास मोकळेपणाने सांगतात.

३. ते सेवेच्या संदर्भातील सूत्रे साधकांना सहजतेने समजावून सांगतात. त्या वेळी त्यांच्या बोलण्यात अधिकारवाणी नसते.

४. सेवेची तळमळ 

अ. काकांना कोणतीही नवीन सेवा करण्याविषयी विचारल्यास ते सकारात्मकतेने ‘मी करतो’, असे सांगतात.

आ. ते स्थिर राहून सेवेतील पालट स्वीकारतात.

आ. सध्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ सेवा चालू आहे. काका त्यांच्या नियमितच्या सेवा सांभाळून ही सेवाही करतात.’

(२७.१०.२०२१)

श्री. कांबळे यांच्या कुटुंबियांनी कथन केलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये

श्री. कांबळे यांची समष्टी सेवा करण्याची तळमळ पुष्कळ वाढली आहे ! – सौ. जयश्री कांबळे (श्री. कांबळे यांची पत्नी)

आज सत्संगाला येतांनाच ‘श्री. कांबळे यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित होईल’, असे वाटत होते. त्यांची समष्टी सेवा करण्याची तळमळ पुष्कळ वाढली आहे. रात्री जागून सेवा करावी लागली, तरी ते न थकता सेवा करतात.

आनंदवार्ता ऐकून एक वेगळाच भावानंद अनुभवता आला ! – सौ. स्वाती भोसले, पुणे (श्री. कांबळे यांची मुलगी)

बाबांची आध्यात्मिक प्रगती झाल्याची आनंदवार्ता ऐकून एक वेगळाच भावानंद अनुभवता आला. ही वार्ता ऐकून बाबांनी साधनेसाठी केलेले प्रयत्न डोळ्यांसमोर उभे राहिले. परात्पर गुरुदेवांनी दिलेल्या या आनंदाप्रती अपार कृतज्ञताभाव दाटून आला. बाबांकडून साधनेचे प्रयत्न करून घेतल्याकरता सद्गुरु (कु.) स्वातीताई आणि पू. (कु.) दीपालीताई यांच्याप्रती कृतज्ञता वाटली.

आजोबा मला प्रत्येक गोष्ट परिपूर्ण करायला शिकवतात ! – कु. चिन्मयी भोसले, पुणे (श्री. कांबळे यांची नात, मुलीची मुलगी, वय ९ वर्षे)

आजोबा माझ्यासह सर्वांशीच प्रेमाने वागतात. मी त्यांना कधीच कुणाला रागावतांना किंवा ओरडून बोलतांना पाहिले नाही. सुटीला मी आजोबांकडे गेल्यावर ते प्रतिदिन पहाटे नामजप करतांना दिसतात. आजोबा मला प्रत्येक गोष्ट परिपूर्ण करायला शिकवतात.

मामांमध्ये (श्री. कांबळे यांच्यामध्ये) पूर्वीपासूनच साधकत्वाचे पुष्कळ गुण जाणवतात ! – श्री. संजय भोसले (श्री. कांबळे यांचे जावई)

मामांमध्ये (श्री. कांबळे यांच्यामध्ये) पूर्वीपासूनच साधकत्वाचे पुष्कळ गुण जाणवतात. गुरुदेवांच्या कृपेने त्यांची प्रगती झाली आणि त्याचा आनंद आम्हाला अनुभवता आला. गुरुदेवांच्या चरणी पुष्कळ कृतज्ञता वाटत आहे.

साधनेमुळे बाबा संघर्षाच्या प्रसंगांत स्थिर राहू शकले ! – श्री. सागर कांबळे (श्री. कांबळे यांचा मुलगा)

बाबांविषयी मला यापूर्वीही आदर होताच; पण आता त्यांच्याविषयी आध्यात्मिक आदरही वाटत आहे. बाबांच्या जीवनात अनेक संघर्षाचे प्रसंग आले; मात्र साधनेमुळे ते स्थिर राहू शकले.

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक