हिंदु धर्म सोडून गेलेल्यांची ‘घरवापसी’ करणार !- सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

हिंदु धर्माचा त्याग करू नये; म्हणून उपस्थित हिंदूंना दिली शपथ !

  • अशी शपथ देण्यासह हिंदूंना धर्मशिक्षण देऊन त्यांना धर्माचरणी बनवले, तर ते कधीही हिंदु धर्माचा त्याग करणार नाहीत !
  • गेल्या १ सहस्र वर्षांत मुसलमान आक्रमणकर्ते, तसेच ख्रिस्ती मिशनरी आणि पोर्तुगीज यांच्यामुळे हिंदु धर्म सोडून अन्य धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्यात आलेल्या हिंदूंना परत हिंदु धर्मात आणण्यासाठी केंद्र सरकारनेच योजना राबवली पाहिजे; कारण अशा प्रकारचे झालेले धर्मांतर हे अयोग्य होते आणि ते हिंदु म्हणजेच भारतीय संस्कृतीवर आक्रमण होते. ही धार्मिक गुलामी नष्ट करण्यासाठीच सरकारने प्रयत्न केला पाहिजे, असे हिंदूंना वाटते !

चित्रकूट (मध्यप्रदेश) – हिंदु धर्माचा त्याग करून अन्य धर्मांचा स्वीकार केलेल्यांना परत हिंदु धर्मात आणले जाईल. त्यांची ‘घरवापसी’ (हिंदु धर्मात पुनर्प्रवेश) केली जाईल, असे विधान सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे आयोजित ‘हिंदु एकता महाकुंभ’मध्ये केले. या ‘महाकुंभ’चे आयोजन जगद्गुरु स्वामी रामभद्राचार्य महाराज यांनी केले आहे.

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी या वेळी ‘महाकुंभ’मध्ये सहभागी झालेल्या हिंदूंना ‘हिंदु धर्माचा त्याग करून अन्य कोणत्याही धर्माचा स्वीकार करणार नाही’, अशी शपथ दिली. तसेच प्रत्येक स्त्रीचा आदर करण्याची शपथ दिली. शपथ देतांना सरसंघचालक म्हणाले की, मी हिंदु संस्कृतीचा धर्मयोद्धा, प्रभु श्रीरामांच्या संकल्पस्थळी, सर्वशक्तीमान देवाला साक्षी ठेवून, मी माझा पवित्र हिंदु धर्म, संस्कृती आणि हिंदु समाज यांचे आयुष्यभर संरक्षण अन् संवर्धन करण्याची शपथ घेतो. मी प्रतिज्ञा करतो की, मी कोणत्याही हिंदु बांधवाला हिंदु धर्मापासून विचलित होऊ देणार नाही.