पत्नी कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांची सेवा करून सर्वांसमोर आदर्श निर्माण करणारे अधिवक्ता रामदास केसरकर !

पत्नी कै. (सौ.) प्रमिला केसरकर (वय ६६ वर्षे) यांची सेवा करून सर्वांसमोर आदर्श निर्माण करणारे अधिवक्ता रामदास केसरकर (वय ६९ वर्षे) !

१८.१०.२०२१ या दिवशी कै. (सौ.) प्रमिला केसरकर (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) यांचे निधन झाले. १६.१२.२०२१ या दिवशी त्यांचे दुसरे मासिक श्राद्ध आहे. त्या निमित्त प.पू. दास महाराज आणि त्यांची पत्नी पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक यांनी अधिवक्ता रामदास केसरकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) लक्ष्मी नाईक

१. अधिवक्ता केसरकर यांनी त्यांची पत्नी कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांची कर्करोगासारख्या दुर्धर आजारपणात केलेली सेवा हा सर्वच साधकांसमोर एक आदर्श असणे

‘सनातनच्या साधकांनी जीवनातील विविध खडतर प्रसंगांतून निर्माण केलेले आदर्श येणार्‍या हिंदु राष्ट्रासाठी दीपस्तंभासारखे दिशादर्शक रहातील’, असेच आहेत. अधिवक्ता रामदास केसरकरकाका (वय ६९ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांनी त्यांची पत्नी कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांची कर्करोगासारख्या दुर्धर आजारपणात केलेली सेवा असाच एक आदर्श आहे. दोघेही पती-पत्नी गेल्या १५ वर्षांपासून रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना अन् सेवा करतात. वर्ष २०१६ मध्ये काकूंना कर्करोग असल्याचे निदान झाले. तेव्हापासून त्यांचे निधन होईपर्यंत सलग सहा वर्षे काकांनी काकूंची केलेली सेवा म्हणजे सर्वच साधकांसाठी मोठी शिकवण आहे.

अधिवक्ता रामदास केसरकर आणि कै. (सौ.) प्रमिला केसरकर

२. अधिवक्ता केसरकरकाकांनी केलेली ही सेवा म्हणजे त्यांची एक प्रकारे खडतर तपस्याच झाली !

‘सामान्यतः बायको नवर्‍याची सेवा करते; परंतु काकांनी स्वतःच्या पत्नीची (कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांची) उत्तम सेवा केली. या सेवेचे वर्णन करण्यास शब्दच नाहीत. ही काकांची एक प्रकारे खडतर तपस्याच झाली.

३. पत्नीची मनोभावे सेवा करणारे आणि दुःख असूनही कधीही तोंडवळ्यावर जाणवू न देणारे अधिवक्ता रामदास केसरकर !

दीर्घकाळ रुग्णाईत असणार्‍या पत्नीची सेवा करणे, हे सोपे नसून त्यांनी त्याचे दुःख कधी तोंडवळ्यावर जाणवू दिले नाही. दोघेही नेहमी आनंदी दिसायचे. साधकांनी त्यांच्या या कृतीचे अवलोकन करावे अन् त्यातून बोध घ्यावा. असे साधक घडवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

 ४. कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांच्या पार्थिवाचे प.पू. दास महाराज यांनी केलेले परीक्षण

४ अ. कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांच्या पार्थिवाभोवती प्रदक्षिणा घालतांना ‘त्यांना विष्णूचे दूत न्यायला आले आहेत’, असे प.पू. दास महाराज यांना दिसणे : देह सोडतांना कै. (सौ.) केसरकर यांची पातळी ६८ टक्के झाली. विशेष म्हणजे, सुवासिनी असतांना देह सोडण्याचे भाग्य त्यांना लाभले. देह सोडल्यानंतर परात्पर गुरुदेवांनी त्यांच्या पार्थिवाचे परीक्षण केले. मीही (प.पू. दास महाराज) त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गेलो होतो. त्यांच्या पार्थिवाभोवती प्रदक्षिणा घालतांना ‘त्यांना न्यायला साक्षात् विष्णूचे दूत आले आहेत’, असे मला दिसले. विष्णुदूतांचे मंडल त्यांच्या सूक्ष्म देहाभोवती दिसत होते. ‘मृत्यूनंतर त्या साधनेत प्रगती करून संतपदाला पोचतील’, यात शंका नाही.’

– प.पू. दास महाराज, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा आणि पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक, पानवळ, बांदा, जिल्हा सिंधुदुर्ग.  (५.१२.२०२१)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या / संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक