हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा प्रशासनास निवेदन
कोल्हापूर, १४ डिसेंबर (वार्ता.) – गेली २ वर्षे कोरोना महामारीने देशभरात कहर केला आहे. ‘ओमिक्रॉन’ नावाच्या कोरोनाच्या नवा ‘व्हेरीएंट’मुळे पुन्हा जगभरात कोरोनाची लाट येण्याची शक्यता आहे. फटाके फोडल्याने प्रदूषण होऊन मोठ्या प्रमाणात श्वसनाचे त्रास वाढतात. अशा वेळी २५ डिसेंबरपासून ३१ डिसेंबरपर्यंत मोठ्या प्रमाणात मेजवान्या होतात, याद्वारे कोरोनाचा संसर्ग पसरण्याची शक्यताही अधिक आहे. या काळात सार्वजनिक आरोग्य धोक्यात घालणे परवडणारे नाही. त्यामुळे नाताळनिमित्त २५ डिसेंबरला आणि ख्रिस्ती नववर्षाच्या निमित्ताने ३१ डिसेंबरच्या दिवशी होणार्या सर्व प्रकारच्या सार्वजनिक साजरीकरणावर (‘सेलिब्रेशन’वर) आणि फटाके फोडण्यावर बंदी घालावी. राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळे, गड-किल्ले, ऐतिहासिक स्थळे आदी सार्वजनिक ठिकाणांवर मद्यपान-धूम्रपान अन् मेजवान्या करण्यावर प्रतिबंध आणावा. पोलिसांची पहारापथके नेमून याचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी १४ डिसेंबर या दिवशी जिल्हाधिकारी यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. हे निवेदन महसूल तहसीलदार सुनीता नेर्लीकर-क्षीरसागर यांनी स्वीकारले.
या वेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, शिवसेना करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव, शिवसेनेचे श्री. किशोर घाटगे, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री शिवानंद स्वामी, दीपक कातवरे, अजिंक्य पाटील उपस्थित होते.