अचूक निदान करून शारीरिक त्रासांवर नामजपादी उपाय सुचवण्याची अद्भुत क्षमता असलेले सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ !

सूक्ष्मातील कारणांमुळे होत असलेला शारीरिक त्रास दूर व्हावा; म्हणून त्याचे अचूक निदान करून त्यावर नामजपादी उपाय सुचवण्याची अद्भुत क्षमता असलेले सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ !

‘नामजपादी उपाय केल्याने आध्यात्मिक त्रास कसे दूर होतात ?’, याविषयीची लेखमाला !

सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ

१. सद्गुरु गाडगीळकाकांनी सुचवलेल्या नामजपादी उपायांमुळे काही वेळात डोकेदुखीमुळे होत असलेला तीव्र त्रास उणावणे

‘काही मासांपूर्वी एकदा मला डोकेदुखीचा तीव्र त्रास झाला होता. सामान्यतः मला सूक्ष्मातून त्रास जाणवू लागल्यावर माझे डोके दुखू लागते आणि त्याची तीव्रता वाढत जाते. हे दुखणे ४ – ५ दिवस रहाते आणि ते कोणत्याही औषधांनी न्यून होत नाही. मी हा त्रास सद्गुरु गाडगीळकाकांना कळवल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘डोक्यावर गोलाकार आकाराचे आवरण आल्यामुळे डोकेदुखीचा त्रास होत आहे.’’ त्यांनी मला त्यासाठी करायचा नामजप आणि मुद्रा कळवली, तसेच त्यांनी स्वतः सूक्ष्मातून माझ्यावर नामजपादी उपाय केले. परिणामस्वरूप जीवनात प्रथमच माझी डोकेदुखी केवळ २० मिनिटांत थांबली.

पू. (सौ.) भावना शिंदे

२. सद्गुरु गाडगीळकाकांनी सांगितलेल्या नामजपादी उपायांमुळे मुतखड्यामुळे होणार्‍या असह्य वेदना न्यून होणे

मला पोटदुखीचा तीव्र त्रास होत होता. आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘हा त्रास मुतखड्यामुळे होत असावा.’’ त्यांनी मला ४ – ५ घंट्यांनी उपचारांसाठी बोलावले. त्या वेळी मी हा त्रास सद्गुरु काकांना कळवला. त्यावर त्यांनी मला पोटदुखी न्यून व्हावी; म्हणून करायचा नामजप कळवला आणि तो त्यांनी स्वतःही केला. त्यामुळे ७ ते ८ मिनिटांत माझे पोट दुखायचे थांबले. तसेच सद्गुरु काकांनी मुतखडा निघून जाण्यासाठी करावयाचे काही सोपे उपचारही कळवले. सामान्यतः अमेरिकेत मुतखड्यांमुळे होणार्‍या असह्य वेदना न्यून करण्यासाठी रुग्णालयातच भरती करून घेतले जाते.

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रमाणेच सद्गुरु गाडगीळकाकांना त्रास कळवल्यावर तो न्यून होण्यास आरंभ होणे

जसा कोणताही त्रास परात्पर गुरु डॉ. आठवले यांना साधकाच्या माध्यमातून कळवल्यावर तो न्यून होण्यास आरंभ होतो, तसेच सद्गुरु गाडगीळकाकांचेही आहे. ‘त्यांना त्रास कळवल्यावर तो न्यून होण्यास आरंभ होतो’, अशी अनुभूती मला अनेकदा आली आहे. सद्गुरु काका त्यांच्यातील दैवी गुणांमुळे जगभरातील साधकांचे आधारस्तंभ बनले आहेत. या विषयावर मी एक स्वतंत्र ग्रंथ लिहू शकते.

आम्हाला सद्गुरु गाडगीळकाकांसारखे संतरत्न देणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– पू. (सौ.) भावना शिंदे, अमेरिका (२.४.२०२१)


सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेल्या नामजपामुळे अनेक वर्षांपासून असलेला त्वचेचा विकार बरा होणे

श्रीमती सौदामिनी कैमल

१. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी त्वचेचा विकार दूर होण्यासाठी सांगितलेला नामजप वाचून त्याप्रमाणे तो करणे

‘मला गेली अनेक वर्षे त्वचेचा विकार आहे. अनेक वर्षांपासून मी त्यावर औषधोपचार घेत आहे. उन्हाळ्यात त्रास वाढतो. मागील १ मास माझा हा विकार वाढल्याने मला त्रास असह्य होत होता. २७.१२.२०२० या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी त्वचेचा विकार दूर होण्यासाठी सांगितलेला नामजप वाचला आणि त्याप्रमाणे नामजप चालू केला.

२. नामजप चालू केल्यावर आठवडाभरात त्वचा विकार ७५ टक्के न्यून होऊन दोन आठवड्यांनी पूर्णपणे बरे वाटणे

त्यानंतरही माझ्या शरिरात उष्णता होती आणि उष्णतेमुळे कमरेवर तीन ठिकाणी पुळ्या आल्या होत्या. वेदनेमुळे मला बसायलाही त्रास होत होता. तेव्हा सद्गुरु गाडगीळकाकांना यासंबंधी विचारल्यावर त्यांनी लगेच ‘ॐ ॐ श्री आकाशदेवाय नमः ॐ ॐ ।’ हा नामजप एक घंटा करायला सांगितला. आठवडाभरात त्वचा विकार ७५ टक्के न्यून होऊन दोन आठवड्यांनी मला पूर्णपणे बरे वाटले. सद्गुरु गाडगीळकाकांचे मार्गदर्शन आपत्काळातील संजीवनीसारखे आहे.

या कृपेसाठी मी परात्पर गुरु डॉक्टर आणि सद्गुरु गाडगीळकाका यांच्या चरणी अत्यंत कृतज्ञ आहे. वर्तमानकाळात नामजपादी उपायांच्या माध्यमातून तेच आम्हा साधकांचे मनोबल वाढवून देत आहेत.’

– श्रीमती सौदामिनी कैमल (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), केरळ (१९.१.२०२१)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या आणि संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक