‘सध्या संस्थेचे कार्य पुष्कळ गतीने चालू आहे. त्यामुळे साधकांकडे अनेक सेवा असतात. ‘साधकांच्या सेवांचे दायित्व असणार्यांचा कल अधिकतर साधकांकडून कार्य पूर्ण करवून घेण्याकडे असतो’, असे आढळले आहे. त्यामुळे ‘साधकांना सेवा आणि व्यष्टी साधना यांमध्ये कोणत्या अडचणी येतात ? त्यांचे व्यष्टी साधनेचे प्रयत्न नीट चालू आहेत का ? त्यांचे स्वभावदोष अल्प का होत नाहीत ?’ यांसारख्या गोष्टींना दायित्व असणारे साधक वेळ देत नाहीत. त्यामुळे साधकांना व्यष्टी साधनेच्या संदर्भात योग्य दिशा मिळत नाही आणि त्यांची व्यष्टी साधनेची घडीही नीट बसत नाही. यासंदर्भात दायित्व असलेल्या साधकांनी पुढील दृष्टीकोन लक्षात घ्यावेत.
१. साधकांची व्यष्टी साधना नीट न झाल्याने त्यांना साधनेतून आनंद मिळत नाही, तसेच त्यांच्या समष्टी सेवेची फलनिष्पत्तीही अल्प होते.
२. ‘गुरुकार्य वाढवणे’, हे समष्टी साधनेचे एक अंग आहे, तर ‘साधकांची साधना चांगली होण्यासाठी प्रयत्न करणे’, हे समष्टी साधनेचे दुसरे अंग आहे. दायित्व असलेल्या साधकांनी दोन्ही अंगांनी सेवा केली, तर त्यांची सेवा परिपूर्ण होईल.
३. सनातनचे समष्टी संत वरील दोन्ही अंगांनी सेवा करतात; म्हणूनच ते ‘संत’ बनले आहेत. त्यांच्याप्रमाणेच दायित्व असलेल्या साधकांनीही प्रयत्न केले, तर तेही लवकर संत बनतील.
४. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले नेहमी सांगतात, ‘कार्य मोक्षाला नेत नाही, तर साधना मोक्षाला नेते !’
५. दायित्व असलेल्या साधकांनी ‘गुरुकार्य सांभाळून साधकांच्या साधनेकडेही कसे लक्ष देता येईल ?’, हे त्यांच्यापेक्षाही अधिक दायित्व असणारे किंवा त्या त्या सेवेशी संबंधित संत यांना विचारावे. यामुळे दायित्व असलेल्या साधकांमध्ये ‘विचारण्याची वृत्ती’, हा गुण वाढेल आणि त्यांच्या साधनेची हानीही होणार नाही.’
– पू. संदीप आळशी (२७.११.२०२१)