सोलापूर जिल्हा परिषदेत ‘पार्कींग’ला शिस्त लावण्यासाठी नियम लागू !

मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी नियमांचे पालन करण्यास केला स्वत:पासून प्रारंभ !

सोलापूर जिल्हा परिषद

सोलापूर – येथील जिल्हा परिषदेच्या परिसरात कुठेही वाहने लावण्यात येत होती, त्यामुळे बेशिस्तीचे प्रमाण पुष्कळ वाढत होते. ‘पार्कींगला शिस्त लावण्यासाठी एकही वाहन पोर्चमध्ये येणार नाही’, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी प्रशासनाला दिल्या होत्या. त्याची कार्यवाही २९ नोव्हेंबरपासून करण्याचे प्रशासनाने निश्चित केले होते. त्याप्रमाणे दिलीप स्वामी यांनी स्वत:पासून सूचनांचे पालन करण्यास प्रारंभ केला. जिल्हापरिषदेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ वाहन थांबवून ते कार्यालयाकडे चालत गेले.

जिल्हा परिषदेच्या आवारात अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व पदाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच अन्य विभाग प्रमुख यांची वाहने लावण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असूनही प्रत्येकजण कुठेही वाहन लावत होते. काही ठराविक जिल्हा परिषद सदस्यांची वाहने लावण्यासाठी मुजोरी दिसून येते, स्वतःला पदाधिकारी समजून ते ठरलेल्या ठिकाणी वाहने उभी करतात, त्यांच्यामुळे प्रमुख पदाधिकारी आणि प्रमुख अधिकारी यांना वाहने लावता येत नाहीत, असे चित्र मागील अनेक दिवसांपासून पहायला मिळत होते.