कोल्हापूर येथील आधुनिक वैद्य (डॉ.) शशिकांत भूपाल शेंडे यांनी संधीवात आणि ‘कोरोना’ यांमुळे आजारी असतांना अनुभवलेली गुरुकृपा !

आधुनिक वैद्य (डॉ.) शशिकांत भूपाल शेंडे

१. रामनाथी आश्रमात गेल्यावर संधिवाताचे दुखणे न्यून होणे

१ अ. रुग्णालयाच्या व्यापामध्ये गुंतल्यामुळे साधना करण्यासाठी अल्प वेळ मिळू लागणे : ‘मध्यंतरी मी रुग्णालयाच्या व्यापामध्येच बराच गुंतत गेलो. व्याप इतका वाढत गेला की, मला व्यष्टी आणि समष्टी साधना करण्यासाठी अल्प वेळ मिळू लागला. माझ्यावर असलेल्या त्रासदायक शक्तीच्या आवरणामुळे मला स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रियाही समजेनाशी झाली.

१ आ. व्यष्टी साधनेची घडी बसवण्यासाठी रामनाथी आश्रमात जाण्याची इच्छा निर्माण झाल्यावर अकस्मात् संधीवाताचे दुखणे उद्भवणे : ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवावी आणि व्यष्टी साधनेची घडी बसावी’, यांसाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जाण्याची इच्छा माझ्या मनात निर्माण झाली. या नंतर अकस्मात् मला तीव्र संधिवाताने ग्रासले. माझे सर्व सांधे सुजले. मला पुष्कळ वेदना होऊ लागल्या. माझ्या सर्व वैद्यकीय चाचण्या केल्या; पण त्या नॉर्मल (सर्वसाधारण) आल्या. कोणत्याही औषधाने माझ्या वेदना न्यून होत नव्हत्या. त्यानंतर माझ्या पोटात दुखू लागले. औषधाचा लाभ होत नव्हता. मला झोप लागेनाशी झाली.

१ इ. ‘रामनाथी आश्रमात जाणे’, हे एकमेव औषध असल्याचे लक्षात आल्यावर तेथे जाण्याचे ठरवणे : त्यानंतर माझ्या लक्षात आले, ‘रामनाथी आश्रमात जाणे’, हे एकमेव औषध आता शेष राहिले आहे. माझे रामनाथी आश्रमात जाण्याचे निश्चित झाले. घरी सर्व जण काळजी करू लागले; पण माझा निर्णय पक्का होता.

१ ई. संधीवात असूनही आश्रमातील शारीरिक सेवा करता येणे आणि सांध्यांना आलेली सूज न्यून होणे : रामनाथी आश्रमात आल्यावर मला विद्युत् उपकरणांच्या संदर्भातील सेवा मिळाली. मी ‘एल्इडी’च्या १५० दिव्यांना पिना लावण्याची सेवा केली. माझी ही सेवा ३ दिवस चालू होती. सेवा संपल्यानंतर मला आश्चर्य वाटले, ‘ज्या हातांना संधिवातामुळे मला रुग्णांना इंजेक्शनही देतांना त्रास होत होता, त्या हातांनी मी स्क्रू ड्रायव्हरने बळ लावून ही सर्व सेवा कशी केली ?’ त्यानंतर माझ्या सांध्यांना आलेली सूज न्यून झाली.

२. ‘कोरोना’सारख्या आजारातून गुरुकृपेने बरे होणे 

२ अ. ‘कोरोना’ झाल्यावर कोणत्याही चांगल्या रुग्णालयात पलंग उपलब्ध नसणे : मला कोरोना झाला होता. तेव्हा कोणत्याही चांगल्या रुग्णालयात पलंग (बेड) उपलब्ध होत नव्हता. ‘मला ज्या ठिकाणी भरती केले जात होते, तेथील आधुनिक वैद्य रुग्णांची फसवणूक आणि लूट कशी करतात ?’, हे मी प्रत्यक्ष पाहिले होते.

२ आ. त्रास वाढल्यावर सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितल्याप्रमाणे नामजपादी उपाय करणे : दुर्दैवाने माझा त्रास वाढत गेला. आधुनिक वैद्या (डॉ.) श्रीमती शिल्पा कोठावळे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांनी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना विचारून मला नामजपादी उपाय सांगितले. त्याप्रमाणे मी उपाय चालू केले.

२ इ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची अनुभवलेली प्रीती ! : मला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा दूरभाष येत होता. स्वतःची आईसुद्धा काळजी घेणार नाही, इतक्या आपुलकीने त्या माझी विचारपूस करत होत्या.

२ ई. परात्पर गुरुदेवांची कृपा आणि सद्गुरूंचे उपाय यांमुळे आजार पूर्ण बरा होणे : माझा खोकला वाढत गेला. प्राणवायूची (ऑक्सिजनची) पातळी ८७ टक्क्यांपर्यंत आल्यानंतर घरी सर्व घाबरले. (‘सर्वसाधारणपणे प्राणवायूची पातळी न्यूनतम ९२ टक्के असावी लागते.’ – संकलक); पण माझा परात्पर गुरुदेव आणि सद्गुरूंचे उपाय यांवर दृढ विश्वास होता की, मी नामजपादी उपायांनीच पूर्ण बरा होणार अन् तसेच झाले.

परात्पर गुरुदेव, सर्व साधक आणि आधुनिक वैद्या (डॉ.) श्रीमती शिल्पा कोठावळे यांच्याप्रती भावपूर्ण कृतज्ञता !’

– आधुनिक वैद्य (डॉ.) शशिकांत भूपाल शेंडे, कोल्हापूर (२८.११.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक