संभाजीनगर येथे लस न घेतलेले कर्मचारी आढळल्यास संबंधित संस्थेला ५० सहस्र रुपयांचा दंड ! – सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी

मध्यभागी सुनील चव्हाण

संभाजीनगर – कोरोनाच्या नव्या विषाणूचा फैलाव जगभरात होऊ लागल्यावर मुख्यमंत्र्यांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर येथील जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी विविध कार्यालयांतील कर्मचार्‍यांना लसीचे दोन्ही डोस घेणे अनिवार्य केले आहे. ‘ज्या संस्थेत लस न घेतलेले कर्मचारी आढळून येतील, त्या संस्थेला ५० सहस्र रुपये दंड केला जाईल किंवा आवश्यकता भासल्यास संस्थेच्या कार्यालयाला कुलूपही लावावे’, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.

२० दिवसांपूर्वी परदेशातून आलेल्यांची माहिती कळवण्याचे आवाहन !

‘ओमिक्रॉन’ या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका ओळखून जिल्हाधिकार्‍यांनी काळजीच्या सूचना दिल्या आहेत, तसेच २० दिवसांपूर्वी परदेशातून आलेल्या नागरिकांची माहिती कळवण्यात यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. जिल्हाधिकार्‍यांनी २९ नोव्हेंबर या दिवशी या संदर्भात आढावा बैठक घेतली. त्यात विमान प्रवासासाठी २ डोस घेणे किंवा ७२ घंट्यांच्या आतील आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी करणे बंधनकारक आहे. विमान प्राधिकरणानेही लसीविषयी पडताळणी करावी. विमान आस्थापनांशी संपर्क साधून आंतरराष्ट्रीय प्रवाशांची माहिती जिल्हा प्रशासनास तात्काळ द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी या संदर्भातील माहिती (०२४०)-२३३१०७७ किंवा महापालिका कोरोना ‘वॉर रूम’ ८९४५३ ०६००७ या भ्रमणभाष क्रमांकावर द्यावी, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.