कोरोनाचा नवीन प्रकार ‘ओमिक्रॉन’च्या धोक्याला अनुसरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक

प्रतिकात्मक चित्र

पणजी, २९ नोव्हेंबर (वार्ता.) – कोरोनाचा नवीन प्रकार ‘ओमिक्रॉन’च्या धोक्याला अनुसरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य खाते आणि इतर शासकीय खात्यांचे अधिकारी यांची ३० नोव्हेंबर या दिवशी एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.

याविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘कोरोनाचा नवीन प्रकार ‘ओमिक्रॉन’ला अनुसरून केंद्राच्या नियमाचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. या प्रकरणी विमानतळ, रेल्वे स्थानक आदींना सतर्क करण्यात आले आहे. गोव्यात येणार्‍या विदेशी पर्यटकांचे निरीक्षण केले जात आहे. नागरिकांनी विशेषत: परराज्यांतून आलेल्या नागरिकांसमवेत विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे.’’

इयत्ता ७ वीपर्यंतचे वर्ग प्रत्यक्ष चालू करण्याविषयी अद्याप निर्णय नाही ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

इयत्ता ७ वीपर्यंतच्या मुलांची शाळा पुन्हा चालू करण्याविषयी अद्याप निर्णय झालेला नाही. आम्ही स्थितीवर लक्ष ठेवून आहोत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

दाबोळी विमानतळावरील व्यवस्थेत पालट

वास्को – कोरोनाचा नवीन प्रकार ‘ओमिक्रॉन’च्या धोक्याला अनुसरून केंद्राने प्रसिद्ध केलेल्या नियमावलीनुसार दाबोळी विमानतळावरील व्यवस्थेत पालट करण्यात आला आहे. विदेशातून विशेषत: इंग्लंडमधून येणार्‍या प्रवाशांची गोव्यात आल्यावर चाचणी केली जाणार आहे. गोव्यात डिसेंबर मासात ‘चार्टर्ड’ विमाने येणार आहेत; मात्र हा निर्णय सध्या केंद्राचा निर्णय येईपर्यंत स्थगित ठेवण्यात आला आहे, अशी माहिती विमानतळाच्या संचालकांनी दिला.

अल्पवयीन मुलांचे सुधारगृह ‘अपना घर’मधील सुमारे १२ मुले कोरोनाबाधित

पणजी मेरशी येथील ‘अपना घरा’तील (अल्पवयीन मुलांसाठीचे सुधारगृह) सुमारे १२ मुले कोरोनाबाधित झाली आहेत. प्राप्त माहितीनुसार ‘अपना घर’मध्ये वास्तव्यास असलेल्या मध्यप्रदेश येथील एका मुलाला त्याच्या घरी जाण्यापूर्वी नियमानुसार कोरोनाची चाचणी करण्यासाठी चाचणी केंद्रात नेले असता तो कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे ‘अपना घरा’तील इतर मुलांचीही चाचणी केली असता तीही कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले.