२ जणांना पैसे घेऊन नोकर्‍या देण्यात गोवा सचिवालयातील २ शासकीय अधिकार्‍यांचा सहभाग! – मुख्यमंत्री

पूजा सावंत यांनी सरकारी नोकरीचे आमीष दाखवून फसवल्याचे प्रकरण

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी, २८ ऑक्टोबर (वार्ता.) – पूजा नाईक यांनी शासकीय नोकरीचे आमीष दाखवून लोकांना फसवल्याच्या प्रकरणी सचिवालयातील २ शासकीय अधिकार्‍यांचे अन्वेषण केले जाणार आहे. संशयित पूजा नाईक हिच्या नावावर ‘ऑडी’पासून ‘फॉर्च्युनर’पर्यंत महागड्या आलीशान चारचाकी वाहनांसह ४ सदनिका असल्याची आणि तिने ८ ते १० वेळा विदेश दौरे केल्याची माहितीही अन्वेषणातून उघडकीस आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. दक्षता जागृती सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते.

ते पुढे म्हणाले, ‘‘पूजा नाईक यांच्या भ्रमणभाषच्या संपर्क क्रमांक सूचीत २ शासकीय अधिकार्‍यांचे संपर्क क्रमांक आढळून आले. पूजा नाईक यांनी या २ अधिकार्‍यांच्या सहाय्यानेच यापूर्वी २ जणांना शासकीय नोकर्‍या दिल्याचे अन्वेषणात मान्य केले आहे. या दोन्ही अधिकार्‍यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणी अटक करण्यास आलेल्या ९ जणांपैकी २ जण शासकीय कर्मचारी आहेत. भ्रष्टाचार लहान पातळीवरून चालू होतो आणि तो नंतर इतरांनाही त्रासात टाकतो. गेल्या ८ ते १० दिवसांत शासकीय नोकर्‍यांच्या संदर्भात फसवणुकीचे प्रकार उघडकीस आले आहेत आणि ते गंभीर स्वरूपाचे आहेत. एक महिला स्वतः शासकीय अधिकारी असल्याचे सांगून गेली १० ते १२ वर्षे लोकांना नोकर्‍यांचे आमीष दाखवून फसवत आहे, ही एक मोठी गंभीर गोष्ट आहे. राज्यातील भ्रष्टाचार आम्हाला पूर्णपणे निपटून काढायचा आहे. या दिवाळीत भ्रष्टाचाररूपी नरकासुराचे दहन करा आणि गोवा कायमचा भ्रष्टाचारपासून मुक्त करा. कुठलाही अधिकारी, राजकारणी किंवा इतर कुणी भ्रष्टाचारात आढळला, तर तो माझ्या हातून सुटणार नाही. मी स्वत: खाणार नाही आणि दुसर्‍याला खायला देणार नाही.’’

४ माहिन्यां पूर्वी पूजा यांना मीच पकडून दिले होते

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘४ माहिन्यां पूर्वी पूजा यांना मीच पकडून दिले होते. ती सांखळी येथे मला जनता दरबारमध्ये भेटण्यासाठी आली होती. तेव्हा ‘काही खासगी बोलायचे आहे’, असे ती सांगू लागली. तेव्हाच मला संशय आला आणि मी महिला पोलिसांना बोलावून तिला डिचोली पोलिसांच्या स्वाधीन केले. त्या वेळी तिने शासकीय नोकरीचे आमीष दाखवून ३ जणांकडून पैसे घेतले होते आणि ते पैसे तिने नंतर परत केले; मात्र तिचे कारनामे काही थांबले नाहीत.’’

कारकुनापासून खातेप्रमुखांपर्यंत सर्वांनी भ्रमणभाषवर बोलतांना सतर्कता बाळगावी !

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘प्रशासनातील प्रत्येक कर्मचारी आणि अधिकारी यांनी भ्रमणभाषवरून बोलतांना सावध राहिले पाहिजे. आज तंत्रज्ञानाचा गैरवापर करून कुणीही फसवू शकतो. भ्रमणभाषवरून बोलणार्‍याचा हेतू काय आहे, हे अगोदर तपासावे.’’

नोकरीचे आमीष दाखवून फसवणूक केल्याच्या प्रकरणी दीपश्री सावंत गावस यांच्या विरोधात ‘लूक आऊट’ नोटीस

फोंडा (गोवा) – शिक्षकाची नोकरी देण्याचे आमीष दाखवून फसवणूक केल्याच्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार दीपश्री सावंत गावस यांच्या विरोधात फोंडा पोलिसांनी ‘लूक आऊट’ (शोधण्याची) नोटीस काढली आहे. पोलिसांनी या प्रकरणी यापूर्वी सागर नाईक याला कह्यात घेतले आहे. संशयित सागर नाईक याचे अन्वेषण केल्यानंतर मुख्य सूत्रधाराविषयी माहिती उघडकीस आली.