बिहारमध्ये सर्व सार्वजनिक मंदिरांना ४ टक्के कर द्यावा लागणार !

राज्याच्या ‘धार्मिक न्यास मंडळा’चा निर्णय

  • मशीद, चर्च, गुरुद्वारा आदींना नाही, तर केवळ हिंदूंच्या मंदिरांनाच कर द्यावा लागतो, हे लक्षात घ्या ! – संपादक
  • पाकिस्तान, बांगलादेश आदी इस्लामी देशांतही जो नियम नाही, तो हिंदूंच्या  भारतात केला जात आहे, हे हिंदूंना लज्जास्पद ! – संपादक

पाटलीपुत्र (बिहार) – बिहार राज्याच्या ‘धार्मिक न्यास मंडळा’ने राज्यातील सर्व सार्वजनिक मंदिरांना ४ टक्के कर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या मंदिरांत जी मंदिरे खासगी आहेत; मात्र ती सर्वसामान्य लोकांसाठी खुली करण्यात आली आहेत, त्यांचाही समावेश आहे. या मंदिरांची नोंदणी करून त्यांनाही कर द्यावा लागणार आहे. १ डिसेंबरपासून सर्व मंदिरांचे नोंदणी अभियान चालू करण्यात येणार आहे. या मंडळाने राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांकडे नोंदणी नसलेल्या मंदिरांची माहिती मागवली आहे. बिहार राज्यात सध्या केवळ ४ सहस्र ६०० मंदिरांची नोंदणी करण्यात आली आहे. राज्यातील काही प्रमुख मंदिरांची नोंदणी करण्यात आलेली नाही.

या मंडळाचे सदस्य आणि महंत विजय शंकर गिरि यांचे म्हणणे आहे की, खासगी मंदिरांमध्ये बाहेरून लोक येऊन पूजा-अर्चा करतात, ती सर्व मंदिरे ‘सार्वजनिक मंदिरे’ म्हणून ओळखळी जातील. त्यांना नोंदणी करून कर द्यावा लागणार आहे.