१. पती-पत्नीच्या नात्यात वाद, रुसवे-फुगवे, भांडणे होणे स्वाभाविक असणे !
दोन भिन्न मतांची माणसे जेव्हा एकत्र रहात असतात, तेव्हा त्यांच्यामध्ये मतभेद होणे स्वाभाविक असते. पती-पत्नीचे नातेही असेच असते. त्यामुळेच त्यांच्यामध्ये वाद, रुसवे-फुगवे, भांडणे होणे स्वाभाविक असते.
२. भांडा; पण प्रेमाने, त्यामुळे सुखी रहाल !
सुखी जीवनासाठी तर्क करावा; पण तर्क करण्याची पद्धत संयमित राखावी. तर्क का केला ? यापेक्षा तर्क कसा केला ? हे महत्त्वाचे असते. यासाठी भांडा; पण प्रेमाने !
३. भांडणे विकोपाला जाणार नाहीत, यासाठी कोणती दक्षता घ्यावी ?
या संदर्भात खालील नियम पाळावेत.
अ. मोठ्याने बोलू नका. सावकाश आणि हळू बोला, प्रेमाने बोला, गोड बोला.
आ. लक्षात ठेवा, बर्याचदा आपल्याला आपले शब्द आतल्या आत गिळावेही लागू शकतात.
इ. पती-पत्नीने एकमेकांच्या मित्रांविषयीचे स्वतःचे मत एकमेकांवर लादू नये. ती अत्यंत खासगी वैयक्तिक गोष्ट म्हणून गप्प बसावे. जी जोडपी परस्परांच्या मित्र-मैत्रिणींच्या संदर्भात आपापली मते मांडून भांडत रहातात, ती नेहमी दुःखी रहातात.
ई. एकमेकांच्या नातलगांचा आदर करा.
उ. वारंवार आपले प्रेम व्यक्त करावे. प्रेमाने बोलावे, एकमेकांचे छंद, आवडी-निवडी इत्यादींकडे लक्ष द्यावे.
ऊ. ‘एकमेकांना मान द्या. मान घ्या’, या नीतीचा अवलंब करावा. एकमेकांच्या भावनांची कदर करावी. एकमेकांच्या आवडी-निवडीत रूची घ्यावी.’
(साभार : ‘श्री पूर्णानंद वैभव’, माघी गणेशोत्सव २०१४)