संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयातील अतीविशेष उपचार विभागात कोरोनाचेच रुग्ण भरती !

अतीविशेष उपचार रखडले !

संभाजीनगर येथील घाटी रुग्णालय

संभाजीनगर – येथील घाटी रुग्णालयातील अतीविशेष उपचार (सुपरस्पेशालिटी) विभागात सध्या कोरोनाच्या रुग्णांवरच उपचार चालू आहेत. त्यामुळे ज्या मूळ उद्देशाने अतीविशेष उपचार विभाग चालू करण्यात आला, त्याचा वापर २ वर्षांनंतरही चालू झालेला नाही. कोरोनाचे केवळ ३० सक्रीय रुग्ण असूनही अतीविशेष उपचार विभाग कार्यान्वित झाला नाही. त्यातच अतीविशेष उपचार विभागाच्या खासगीकरणाची चर्चा चालू होती; मात्र सध्यातरी ते शक्य नाही. त्यामुळे १५० कोटी रुपये व्यय करून उभारलेला रुग्णालयातील अतीविशेष उपचार विभाग केव्हा चालू होईल ? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

मार्च २०२० मध्ये अतीविशेष उपचार विभागाची इमारत बांधून पूर्ण झाली होती. १० कोटी रुपये व्यय करून अद्ययावत् यंत्रसामग्री आणली; मात्र कोरोनाचा संसर्ग वाढल्याने या इमारतीचा वापर कोरोनाच्या रुग्णांसाठी चालू झाला. आजतागायत याच रुग्णांवर उपचार चालू आहेत. वैद्यकीय सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले यांच्यासह ४ जणांच्या समितीने गेल्या आठवड्यात घाटी रुग्णालयातील अतीविशेष उपचार विभागासह लातूर, परभणी आणि जालना वैद्यकीय महाविद्यालयांची पहाणी केली. समितीच्या प्रमुखांनी कोणत्याही विभागाचे खासगीकरण करणार नाही, असे सांगितले. उलट हे विभाग चालू करण्यावर भर दिला जाईल.