समाजवाद्यांचा (अपना) बाजार आणि त्यामुळे त्यांची झालेली हानी !

१. व्यवहाराच्या कसोटीवर सिद्ध न होणारे समाजवादी तत्त्वज्ञान

‘वर्ष २००४ मध्ये समाजवादी नेते एस्.एम्. जोशी यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने समाजवादी विचार मानणार्‍या ७६ संघटनांचा मेळावा मुंबईच्या शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आला होता. ७६ संघटनांच्या ७६ नेत्यांची ही शक्ती समाजवादी चळवळीच्या दुर्दशेचे प्रदर्शन मांडणारी आहे. तथापि समाजवादी एकत्र आले की, नेहमीच एकजुटीची भाषा करतात आणि या वेळीही तसेच झाले. या मेळाव्यानंतर झालेल्या बैठकीत समाजवादी चळवळ पुनरुज्जीवित करण्याचा विचार मांडण्यात आला. तथापि समाजवादी तत्त्वज्ञान आणि ती विचारसरणी मांडणारे नेते, संघटना यांचा इतिहास अन् वर्तमानातील वकुब पाहिल्यास ‘समाजवादी चळवळ पुनरुज्जीवित करण्याच्या विचाराला काही भविष्य आहे’, असे वाटत नाही; कारण समाजवादी विचार कितीही आदर्श (?) आणि सर्वव्यापी (?) असले, तरी त्यातून निर्माण होणारी चळवळ सर्व समाजाची होऊ शकत नाही अन् तशी झालेलीही नाही. त्याच्या कारणांचा इतिहासही मोठा आहे. मुळात समाजवादी तत्त्वज्ञान आचार-विचार आणि व्यवहार यांच्या कसोटीवर सिद्ध होणारे नाही.

२. समाजवाद्यांचा पहिला पक्ष ३ वर्षांतच संपुष्टात येणे

साम्यवादी तत्त्वज्ञान जसे भारतभूमीवरचे नाही, तसेच समाजवादी तत्त्वज्ञानाचे आहे. समाजवादीही साम्यवाद मानतात; परंतु त्यांची मानून घेण्याची पद्धत वेगळी आहे. समाजवादी लोकशाही क्रांतीशी बांधील आहेत. समाजवादाची मांडणी करणारे जयप्रकाश नारायण भारतीय समाजवादी चळवळीचे उद्गाते आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच त्यांच्याच पुढाकाराने ‘समाजवादी पक्षा’ची स्थापना झाली. त्या वेळी डॉ. राममनोहर लोहिया, अशोक मेहता, नानासाहेब गोरे आणि अरुणा असफअली आदी जयप्रकाश यांचे सहकारी होते. ‘समाजवादी क्रांतीऐवजी लोकशाही क्रांतीतून पालट घडवून आणायचा’, या प्रेरणेने हा पक्ष कार्यरत झाला; परंतु पक्षनेतृत्वात व्यापक तत्त्वज्ञानापेक्षा हटवादीपणाच अधिक भिनला. त्यामुळे समाजवाद्यांचा पहिलावहिला पक्षावतार अवघ्या ३ वर्षांत भंगला.

३. सातत्याने फुटलेला समाजवादी पक्ष

वर्ष १९५५ मध्ये या पक्षाचे ‘प्रजा समाजवादी’ आणि ‘संयुक्त समाजवादी’ असे दोन तुकडे झाले. तेव्हापासून समाजवादी चळवळीत फाटाफूट चालूच आहे. वर्ष १९६५ मध्ये समाजवाद्यांचे दोन्ही पक्ष एकत्र आणण्याचे प्रयत्न झाले. त्यासाठी वाराणसीला अधिवेशन आयोजित करण्यात आले हो; परंतु सकाळी एकत्रीकरण झाले आणि संध्याकाळी पुन्हा फूट पडली. वर्ष १९७२ मध्ये पुन्हा एकत्रीकरण पुन्हा फूट. वर्ष १९७७ मध्ये जनता पक्षाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आणि वर्ष १९८० मध्ये पुन्हा फूट. वर्ष १९८७ मध्ये जनता दल म्हणून एकत्र आणि वर्ष १९९० नंतर फुटवेच फुटवे ! आता तर जनता दल ‘ए टू झेड’ अशी ओळख सांगणारे असंख्य समाजवादी पक्ष आहेत.

४. समाजवाद्यांचे अवगुण आणि नेतृत्व टिकवण्यासाठीचा लोभ

डॉ. लोहिया यांनी समाजवाद्यांना ‘सुधरो नही तो टुटो ।’, असा मंत्र दिला होता. हा मंत्र समाजवादी चळवळीत व्यवस्थितपणे अवलंबला गेला. समाजवादी चळवळीचे आणि ती चालवणार्‍यांचे अनेक गुण चांगले आहेत. यातील काही व्यक्तींचे सार्वजनिक जीवन आदर्श असेच आहे; मात्र त्यांचे संघटनात्मक वर्तन आणि नेतृत्व यांत दोषही तेवढेच आहेत. बर्‍याचदा यातील दोषच इतके प्रकटतात की, गुणांचे अस्तित्वच दडपून जाते. काही मोजके नेते आणि कार्यकर्ते यांचा अपवाद सोडला, तर दोषांचेच प्रदर्शन मांडण्याचा रोग समाजवादी साथीत संसर्गजन्य असावा. तसेच जख्ख म्हातारपण आले, तरी समाजवादी नेत्याच्या नेतृत्वाची हौस काही भागत नाही. चळवळीवर प्रेम असणे वेगळे आणि तिचे नेतृत्व आपल्या हातून जाऊ नये; म्हणून लोभ असणे वेगळे !

मेधा पाटकर म्हणतात, ‘‘एस्.एम्. जोशींच्या काळातील प्रामाणिकपणा आणि विचारांवरील निष्ठा आजच्या समाजवाद्यांत दिसत नाही.’’

५. कार्यनाशी समाजवादी-साम्यवादी

‘वसाहतवाद आणि वर्णद्वेष यांना ठाम विरोध अन् समाजातील तळाच्या माणसाचा उद्धार’, हा समाजवादाचा आत्मा आहे. हा विचार भारतीय राजकारणात नेहमीच आघाडीवर राहिलेला आहे. काँग्रेसी आणि कथित हिंदुत्वनिष्ठ यांनी स्वार्थी सत्ता-राजकारणासाठी समाजवादाच्या मूळ विचाराची कार्यवाही केली नसली, तरी त्यांनी या विचाराचा अव्हेरही केला नाही. म्हटले, तर हा मूर्खपणा आहे आणि तो स्वयंभू समाजवाद्यांनीही केला आहे. साधनशुचितेच्या ढोंगाखाली समाजवाद्यांनी केलेल्या राजकीय व्यभिचाराला तोड नाही.

जॉर्ज फर्नांडिस, लालूप्रसाद, मुलायमसिंह, शरद यादव, रामविलास पासवान हा त्या संदर्भातील ताजा साक्षात्कार आहे. या व्यवहारापासून महाराष्ट्रातील समाजवादीही शुद्ध राहिले, असे नाही. स्वतःला जातीवंत समाजवादी म्हणवणार्‍या अनेकांना पूर्वी काँग्रेसने आणि अलीकडच्या काळातील पक्षांनी सत्तेचा पाव खायला घालून बाटवले आहे. विठ्ठलराव गाडगीळ, मोहन धारिया, मधुकरराव चौधरी, राम महाडिक, अरुण मेहता ते अलीकडचे हुसेन दलवाई, शैला सातपुते अशी नावांची मोठी सूची आहे. वर्ष १९७८ मध्ये शरद पवारांना पुरोगामी लोकशाही आघाडीचा मुख्यमंत्री बनवून सत्तेचा पाळणा गाण्याचे काम समाजवाद्यांनीच केले. २५ वर्षांपूर्वीपर्यंत समाजवाद्यांच्या राजकीय पक्षांचे देशात आणि महाराष्ट्रात दखलपात्र स्थान होते. आता ते संसदीय आणि सामाजिक पटलावर शोधावे लागते; परंतु समाजवाद्यांचा ‘अपना बाजार’ जोरात आहे. त्याची साक्ष ७६ संघटनांतून देण्यात आलीच आहे. या नोंदणीकृत संघटना असून नोंदणी नसलेल्या संघटना त्याच्या शंभरपटींनी आहेत.

६. समाजवादी चळवळ पुढे चालवणार कोण ?

‘माणसे म्हातारी झाली, तरी चालतील; पण विचार ‘म्हातारे होऊ नयेत’, असे सांगणार्‍या मानवेंद्रनाथ रॉय यांच्या नवमत्वादाची जिथे दुर्दशा झाली, तिथे विचारच विसरलेल्या म्हातार्‍यांकडून काय होणार ? सामाजिक आणि नैसर्गिक शास्त्रात सतत सुधारणा अन् पुनरुज्जीवन होत असते. ‘आपला विचार त्याला अपवाद आहे’, असा समाजवाद्यांना अपसमज असावा. त्यामुळेच समाजवादी चळवळीला मुले झाली; परंतु चळवळीला पुढे नेणारी नातवंडे मात्र झाली नाहीत.

(संदर्भ : चित्रलेखा, ६.१२.२००४ )