‘सेल्फी पॉईंट’ नको !

सातारा येथील ‘राजधानी सातारा’ सेल्फी पॉईंट

सातारा येथील शिवतीर्थावर (पोवईनाक्यावर) ‘राजधानी सातारा’ या नावाने ‘सेल्फी पॉईंट’ (स्वतःच स्वतःचे छायाचित्र काढण्यासाठी नेमलेले ठिकाण) उभारण्यात आला आहे. नुकतेच याचे उद्घाटन झाले. यापूर्वीही जिल्ह्यातील खंबाटकी घाटानजीक, कराड शहरात अशा विविध ठिकाणी ‘सेल्फी पॉईंट’ उभारण्यात आले आहेत. ‘आय लव्ह कराड’, ‘आय लव्ह सातारा’, अशी ‘सेल्फी पॉईंट’ची नावे आहेत.

आपल्या देशाच्या इतिहासाचा अभ्यास केला, तर भारतमातेला स्वतंत्र करण्यासाठी असंख्य क्रांतीकारकांनी स्वत:च्या प्राणांची आहुती दिली. आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, चाफेकर बंधू अशी किती नावे घ्यावीत ? देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताला एकसंघ बनवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले आणि एकसंघ भारताचा नकाशा सिद्ध झाला; मात्र पाश्चिमात्यांचे अंधानुकरण आणि शासनकर्त्यांची ‘फोडा आणि राज्य करा’ ही नीती यांमुळे राष्ट्रप्रेमी नागरिक संघटित होण्याऐवजी विभागले जाऊ लागले आहेत. यामुळे ‘मी सातारा येथील’, ‘मी कराडचा’, ‘मी अमुक ठिकाणचा’ अशी संकुचित मानसिकता आजच्या युवा वर्गाची निर्माण होऊ लागली आहे. यामुळे ‘आपले क्रांतीकारक अन् राष्ट्रपुरुष यांनी पाहिलेले संघटित शक्तीचे स्वप्न धुळीला मिळते कि काय ?’, अशी शंका वाटत आहे.

आतापर्यंत भारतावर मोगल आणि ब्रिटीश यांनी राज्य केले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी नागरिकांना जातीयवाद, भाषावाद, प्रांतवाद, आरक्षण आदी गोष्टींमध्ये विभागले आहे. त्यामुळे प्रत्येकात आम्ही भारतीय नाही, तर ‘मी या जातीचा’, ‘मी त्या जातीचा’, अशी भावना वाढीस लागली. आता शासनकर्त्यांनी सेल्फी पॉईंट उभारण्याचे ‘फॅड’ चालू केले. ‘याचा युवावर्गाला काय लाभ होणार आहे ?’, असा विचारही कुणाच्या मनात कसा येत नाही ?

‘सेल्फी पॉईंट’वर ‘सेल्फी’ काढल्यामुळे केवळ मौजमजा एवढेच साध्य होणार आहे. याऐवजी मुलांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत होईल, यादृष्टीने कृती होणे आवश्यक होते. यासाठी शाळा आणि महाविद्यालये यांतून राष्ट्रप्रेम अन् राष्ट्रपुरुष, त्यांचे कार्यकर्तृत्व यांचे धडे, त्याचे बाळकडू विद्यार्थ्यांना देणे आवश्यक आहे. स्वत:ची वैचारिक शक्ती गमावलेल्या युवकांना निराश आणि हतबल मानसिकतेतून बाहेर काढायचे असेल, तर ‘सेल्फी पॉईंट’ नको !

– श्री. राहुल देवीदास कोल्हापुरे, सातारा