छत्रपती शिवाजी महाराज यांचे उदाहरण डोळ्यांसमोर ठेवून समष्टी साधना करा ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

कोल्हापूर – छत्रपती शिवाजी महाराज यांनी लहानवयातच समष्टी धर्मकार्याला प्रारंभ केला. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे समष्टी सेवा करणारे आदर्श उदाहरण आपल्यासमोर आहे. गेल्या आठवड्यात ठिकठिकाणी झालेल्या घटनांवरून, तसेच उसळलेल्या दंगलीवरून राष्ट्र आणि धर्म संकटात आहे, असे लक्षात येते. त्यामुळे आपल्यालाही छत्रपती शिवाजी महाराज यांचे उदाहरण डोळ्यांसमोर ठेवून हिंदूंनाही धर्मशिक्षण द्यावे लागेल, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले. १४ नोव्हेंबर या दिवशी कोल्हापूर, सातारा जिल्हा आणि गोवा राज्यातील जिज्ञासूंसाठी ‘ऑनलाईन’ सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात त्या बोलत होत्या. सोहळ्यात १८२ धर्मप्रेमी आणि जिज्ञासू सहभागी झाले होते.

सोहळ्याचे सूत्रसंचालन सनातन संस्थेच्या साधिका सौ. मेघमाला जोशी यांनी केले, तर सत्संग सोहळ्याचा उद्देश कु. संगीता प्रभाकर नाईक यांनी सांगितला.

या प्रसंगी मार्गदर्शन करतांना सद्गुरु (कु.) स्वाती खाडये म्हणाल्या,

१. आपण धर्मकार्य केले, तर आपले कुटुंब भगवंत चालवतो आणि त्याचसमवेत आपले प्रारब्धही नष्ट होते. याची अनुभूती आपण प्रत्येकानेच घेतली आहे.

२. समाजात आज व्यक्तीमत्त्व विकासासाठी सहस्रो रुपये व्यय करावे लागतात. एवढे होऊन ते सगळे मानसिक स्तरावरचे असते. याउलट साधनेत आपण व्यष्टी साधना आणि समष्टी साधना असे दोन्ही शिकतो. त्यात आपला संपूर्ण व्यक्तीमत्त्व विकास होतो.

३. सनातन संस्थेने प्रकाशित केलेले ग्रंथ म्हणजे कलियुगातील ‘गीता’ आहे. यातील एका ग्रंथामुळे एकेक कुटुंब धर्मशिक्षित होणार आहे. त्यामुळे सनातनच्या ज्ञानशक्ती प्रसार अभियानात सहभागी व्हा !

क्षणचित्रे

१. सोहळ्यात सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी साधनेविषयी केलेल्या मार्गदर्शनाची ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली. मार्गदर्शन ऐकून अनेक धर्मप्रेमींनी ‘भाव जागृत झाला, तसेच मार्गदर्शन ऐकून नेमके काय करायला हवे ? याची दिशा मिळाली’, असे सांगितले.

२. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या मार्गदर्शनानंतर अनेकांनी ‘चॅट बॉक्स’मध्ये ‘जय श्रीराम ।’ असे पाठवून ‘धर्मकार्यात सहभागी होऊ’, असे सांगितले.

• धर्मप्रेमींनी केलेले अनुभवकथन ऐकून मार्गदर्शनाच्या प्रारंभी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये म्हणाल्या, ‘‘अनुभवकथन ऐकतांना हा सत्संग दैवी लोकात चालू आहे’, असे जाणवत होते. आपण जेव्हा भगवतांची सेवा करतो, तेव्हा प्रत्येक टप्प्यावर आपल्याला तो साहाय्य करतो. व्यवहारात आपण अपेक्षा ठेवून कृती करतो, याउलट अध्यात्मात आपण निरपेक्षतेने कृती करतो. साधना चालू केल्यावर आपल्याला जो आनंद मिळाला, तो आपण इतरांना कसा देऊ शकतो ? हे ही सर्वांना शिकायला मिळाले.’’

• अनुभवकथनात प्रा. वर्षा प्रशांत म्हणाल्या, ‘‘कोरोनाच्या संसर्गाच्या काळात मी सनातन संस्थेशी जोडले गेले. परात्पर गुरु (डॉ.) जयंत आठवले यांच्या कृपाशीर्वादाने आता घरातील वातावरण आनंदी आणि सात्त्विक झाल्याचे जाणवते; अन्यथा पूर्वी संताप, राग, धुसफूस, त्रागा, भांडण असे असायचे. स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेचाही लाभ झाला. मला मिळालेले हिंदु धर्मातील ज्ञान मी विद्यार्थ्यांना देते. माझ्या मुलांवरही साधनेचे संस्कार झाल्याने आणि योग्य वयात धर्मशिक्षण मिळाल्याने मी समाधानी आहे.’’

सत्संग सोहळ्यात काही धर्मप्रेमींनी व्यक्त केलेले मनोगत

१. गीता कवळेकर, गोवा – मला संधीवाताचा त्रास आहे. सत्संगात सांगितल्याप्रमाणे कुलदेवी आणि दत्त यांचा जप केल्याने त्रास अल्प झाला. गुरुपौर्णिमेच्या कालावधीत संधीवाताचा तीव्र त्रास होत असतांनाही फलक लिखाण करण्याची संधी मिळाली. स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया राबवल्याने कुटुंबियांविषयी येणार्‍या प्रतिक्रिया अत्यल्प झाल्या. माझ्यातील हा पालट माझे यजमान आणि मुलगा यांनीही सांगितला.

२. कु. अरुणा कुरणे, कोल्हापूर – साधना सत्संगाला जोडल्यानंतर २ मासांतच सेवेला प्रारंभ केला. ‘ऑनलाईन’च्या माध्यमातून जिज्ञासूंना जोडणे यांसह अन्य सेवेत सहभागी आहे. सत्सेवा चालू केल्यावर स्वत:मध्ये आणि कुटुंबामध्ये पुष्कळ पालट झाले आहेत.

३. सौ. वृंदा फरांदे, वाई, सातारा – हिंदु धर्मात असणार्‍या प्रत्येक सणाचे महत्त्व समजल्याने ते सण भावपूर्ण साजरे करू लागले. सेवा करतांना परात्पर गुरु (डॉ.) जयंत आठवले यांचे अस्तित्व जाणवते.

४. सौ. सुधा प्रभुदेसाई, गोवा – साधनेमुळे ‘भित्रेपणा’ हा दोष जाऊन आता मी कुणासमवेतही चांगला संपर्क करू शकते. फलक लिखाण, ग्रंथ वितरण या सेवा देवाने करवून घेतल्या. त्यामुळे गुणवृद्धी झाली.

केवळ वर्ष ते दोन वर्षे इतक्या अल्प कालावधीचाच सनातन संस्थेशी संपर्क आल्यानंतर अनेक धर्मप्रेमींनी समष्टी साधनेस प्रारंभ केला आणि अनेकांना आलेले अनुभव-आलेल्या अनुभूती या वैशिष्ट्यपूर्णच आहेत. – संकलक

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक