वारीच्या कालावधीत एस्.टी.ला दीड कोटी रुपयांचा तोटा
सोलापूर – कोरोनाचा संसर्ग न्यून झाल्याने प्रशासनाने कार्तिकी यात्रा भरवण्यास अनुमती दिल्यामुळे वारकरी उत्साही होते; पण त्याच काळात एस्.टी. कर्मचार्यांच्या संपामुळे अनेक वारकर्यांना कर्तिकीच्या यात्रेला पोचण्यास अडचणी आल्या. विविध वारींच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये येण्यासाठी वारकरी मोठ्या प्रमाणात एस्.टी.ने प्रवास करतात. मागील वर्षीची कार्तिकी यात्रा आणि दिवाळी या काळात एस्.टी.ला दीड कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते; पण यंदा कर्मचार्यांच्या संपामुळे हे उत्पन्न मिळाले नसल्याने एस्.टी.ला दीड कोटी रुपयांचा तोटा झाला आहे, अशी माहिती अधिकार्यांनी दिली.
देशभरातील कानाकोपर्यांतून श्री विठ्ठलाचे भक्त कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे येतात. एस्.टी. कर्मचार्यांच्या संपामुळे अनेक वारकर्यांना कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपूर येथे येता आले नाही; मात्र ‘पुढे येणारी आळंदीची वारी चुकू नये यासाठी वारीपर्यंत प्रशासनाने एस्.टी. कर्मचार्यांचे प्रश्न मार्गी लागावेत’, अशी मागणी भाविकांतून व्यक्त केली जात आहे.