प्रसिद्धीपराङ्मुख, गुरूंविषयी अपार भाव असलेले आणि संगीत साधना म्हणून जगणारे नाशिक येथील संवादिनीवादक (कै.) पं. प्रभाकर दसककर (वय ९४ वर्षे) !

१९ नोव्हेंबर २०२१ या दिवशी पं. प्रभाकर दसककर यांच्या निधनानंतरचा १० वा दिवस आहे. त्यानिमित्ताने…

(कै.) पं. प्रभाकर दसककर

‘पं. प्रभाकर दसककर उपाख्य दादा (वय ९४ वर्षे) हे नाशिक येथील उत्तम संवादिनीवादक आणि गायक होते. त्यांनी अनेक वर्षे कीर्तनकारांना संवादिनीची साथ केली. ते अभंगही उत्तम गायचे. आयुष्यभर त्यांनी संगीताच्या माध्यमातून साधना केली. वयाच्या ९४ व्या वर्षीही दादांचा आवाज खणखणीत होता. त्यांनी त्यांच्या मुलांमध्ये अध्यात्म आणि संगीत यांचे बीज रोवले. त्यामुळे त्यांची मुलेसुद्धा सुसंस्कारित आहेत. ‘पं. प्रभाकर दसककर यांचे संपूर्ण घराणेच संगीतक्षेत्रातील आहे’, हे त्यांच्या घराण्याचे वैशिष्ट्य म्हणता येईल. १०.११.२०२१ या दिवशी पं. प्रभाकर दसककर यांचे निधन झाले.

कु. तेजल पात्रीकर

ऑक्टोबर २०१९ मध्ये संगीताचा आध्यात्मिक स्तरावर अभ्यास करण्याच्या दृष्टीने आम्ही महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या माध्यमातून नाशिक येथे गेलो होतो. त्या वेळी पं. प्रभाकर दसककर (दादा) यांच्या भेटीचा योग आला. त्यांच्या सहवासात आम्हाला पुष्कळ शिकता आले. त्या वेळी दादांचे वय ९२ वर्षे होते. वयोमानामुळे ते अंथरुणाला खिळूनच होते. असे असतांनाही ‘संगीताच्या माध्यमातून साधना करणारे साधक आले आहेत’, हे कळल्यावर दादांना पुष्कळ आनंद झाला. त्या वेळी मी त्यांची ‘संगीतातून साधना’ या विषयावर मुलाखत घेतली. त्या वेळी त्यांनी उलगडलेला त्यांच्या संगीत-साधनेचा प्रवास, या कालावधीत त्यांना आलेल्या अनुभूती आणि त्यांनी संगीताविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन पुढे दिले आहे.’

– कु. तेजल पात्रीकर (संगीत विशारद, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१२.६.२०२१) 

(कै.) पं. प्रभाकर दसककर यांच्या संगीत-साधनेचा प्रवास

१. घरात कीर्तन आणि संगीत यांचे संस्कार झाल्याने लहानपणापासूनच कीर्तन अन् संगीत यांविषयीची आवड निर्माण होणे

संवादिनीवादन करत भावपूर्णरित्या अभंग गातांना पं. प्रभाकर दसककर

‘माझ्या आईला संगीताची आवड असल्याने तिने मला भिक्षुकी करू न देता संगीत शिकायला पाठवले. वयाच्या नवव्या वर्षापासून माझे संगीताचे शिक्षण चालू झाले. तेव्हापासूनच मला संगीताच्या अनेक स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळू लागली. कीर्तनाला साथ करता करता मी संगीत शिकलो. माझे काका संगीत शिकवायला जायचे. त्या वेळी मीसुद्धा त्यांच्यासह जायचो. माझे वडील वैद्य असूनही राष्ट्रीय कीर्तनकार होते. ते आध्यात्मिक प्रवचनेही करायचे. घरात कीर्तन आणि संगीत यांचे संस्कार झाल्याने माझ्यात लहानपणापासूनच संगीत अन् कीर्तन यांविषयी आवड निर्माण झाली.

२. घरी संवादिनी नसल्याने कीर्तनात साथ करण्यासाठी ओळखीच्यांनी संवादिनी देणे आणि पुढे वडिलांनी संवादिनी घेऊन दिल्यावर संगीताचे वर्ग घेणे

कु. तेजल पात्रीकर यांना संगीताविषयी मार्गदर्शन करतांना पंडित प्रभाकर दसककर

आमच्या घरी संवादिनी नसल्याने मी दुसर्‍यांची संवादिनी घेऊन कीर्तनाला साथ करत असे. मला माझी संवादिनी मिळेपर्यंत एका ओळखीच्या काकांनी त्यांची स्वतःची संवादिनी मला वाजवायला दिली होती. त्या वेळी त्यांच्या माध्यमातून देवानेच मला साहाय्य केले होते. कालांतराने माझ्या वडिलांनी मला संवादिनी घेऊन दिली. कीर्तनाच्या वेळी मी संवादिनीवर साथ करत असे. त्या वेळी मी संगीताचे वर्ग घेत असे आणि महिलांचे अभंगांचे शिकवणीवर्गही घेत असे.

कीर्तनाच्या साथीसाठी मी रामकुंडावर (नाशिक येथील पवित्र स्थानावर) संवादिनी घेऊन जायचो. ‘तेथून हुंडी बालाजी मंदिरात जाणे आणि नंतर संध्या करून घरी परतणे’, अशी माझी कीर्तन सेवा नित्य चालत असे. भगवंताच्या कृपेने हरिपाठ करतांना मला रागदारीही (विविध राग) आपोआप सुचत गेल्या. कीर्तनाच्या मध्यंतरात कीर्तनकार मला गायन करायला सांगायचे. तेव्हा मी गवळणीही म्हटल्या आहेत.

३. गुरुभेट, गुरुसेवा आणि गुरूंनी दिलेला आशीर्वाद

३अ. फुलांच्या एका व्यापार्‍याने त्याचे गुरु श्री. रोजेकर महाराज यांची भेट घालून देण्याविषयी आश्वस्त करणे आणि नंतर रामकुंडावर त्यांची भेट होणे : श्री. कमलाकर शेंद्रे नावाचे माळी होते. त्यांचा फुलांचा व्यापार होता. ते प्रत्येक कीर्तनकारांना मोठा हार घालायचे. त्यांची आणि माझी कीर्तनाच्या माध्यमातूनच ओळख झाली होती. एकदा मी गोदावरी नदीवर (रामकुंडावर) गेलो असता तेथे माझी त्यांच्याशी भेट झाली. त्या वेळी त्यांनी त्यांचे गुरु श्री. रोजेकर महाराज यांच्याशी माझी भेट घालून देण्याविषयी मला आश्वस्त केले.

एके दिवशी श्री. रोजेकर महाराज यांना भेटण्याच्या वेळेत मी त्यांना भेटण्यासाठी रामकुंडावर गेलो; परंतु ते मला कुठेच दिसले नाहीत. मला गुरुभेटीची ओढ लागली होती. गुरूंच्या घरी गेल्यावर त्यांच्या पत्नी मला म्हणाल्या, ‘‘ते रामकुंडावरच गेले आहेत.’’ मी पुन्हा रामकुंडावर गेलो. तेथे ते आणि त्यांचे अन्य शिष्य ध्यानस्थ बसले होते. काही वेळाने महाराजांनी गोदावरी नदीला नमस्कार केला. मी त्यांच्या पाया पडलो. त्यानंतर ते कपालेश्वराच्या मंदिरात गेले आणि तेथे डोळे मिटून बसले. ते माझ्याशी काहीच बोलले नाहीत.

३ आ. गुरूंच्या प्रथम भेटीच्या वेळी त्यांच्याभोवती तेजोवलय दिसणे आणि त्या वेळी पुष्कळ भावजागृती होणे : श्री. रोजेकर महाराज यांची ध्यान-धारणा झाल्यावर त्यांच्या एका शिष्याने ‘यांना संगीत आणि कीर्तन येते’, अशी माझी त्यांच्याशी ओळख करून दिली. तेव्हा महाराजांना पुष्कळ आनंद झाला. त्यानंतर ते पुन्हा रामकुंडावर गेले. जातांना मी त्यांच्या चरणी पुन्हा नमस्कार केला. त्या वेळी मला त्यांच्याभोवती तेजोवलय दिसले. त्यांच्या तेजःपुंज मुखाकडे पाहून माझ्या डोळ्यांतून घळाघळा भावाश्रू वाहू लागले. तो कपिलाषष्ठीचा योग होता. या पावन योगावर मला सद्गुरूंची प्राप्ती झाली.

३ इ. गुरुसेवा करत असतांना गुरूंनी विड्याचे पान खाण्यास देणे आणि त्यानंतर त्यांना नित्य विडा बनवून देणे : सद्गुरु रोजेकर महाराज माझ्या जीवनात आले आणि माझी नित्य गुरुसेवा चालू झाली. त्यांची सेवा करत असतांना एक दिवस त्यांनी मला त्यांच्याजवळ प्रेमाने बसवून विड्याचे पान खाण्यास दिले. कालांतराने मीसुद्धा त्यांना नित्य विडा बनवून देत असे आणि ते तो विडा आनंदाने खात असत. ते अधिक बोलत नसत. जे काही होते, ते आंतरिक चालत असे.

३ ई. गुरूंनी दिलेला आशीर्वाद ! : गुरुकृपेने मला कीर्तनासाठी रागदारीतील (विविध रागांतील) चांगल्या चाली सुचल्या. तेव्हा गुरूंनी मला ‘आगे आगे देखो क्या होता है ?’, असा आशीर्वाद दिला.

४. गुरुसेवा करतांना आलेल्या अनुभूती

अ. दोन मास मी गुरुसेवेसाठी गुरूंकडे होतो. त्या कालावधीत मी संगीत शिकवण्यासाठी शाळेत गेलो नव्हतो; परंतु तेथील लोकांनी मला मी गेले २ मास तेथे उपस्थित असल्याचे सांगून उपस्थितीच्या नोंदींमध्ये स्वाक्षरी करण्यास सांगितले आणि माझे त्या काळातील वेतनही दिले.

आ. मी गुरूंना नित्य विडा बनवून द्यायचो. एकदा विडा बनवत असतांना चुकून मी पानाला चुना न लावता चंदन लावले. गुरूंनी ते आनंदाने खाल्ले. त्या वेळी त्यांना त्याचा काही त्रास झाला नाही, ही त्यांचीच कृपा आहे.

५. अभंगांना लावलेल्या चाली ऐकून संतांनी काढलेले गौरवोद्गार !

संत निवृत्तीनाथ यांच्या गादीवर बसलेले प्रा. मामासाहेब दांडेकर आणि वारकरी संप्रदायाचे श्री. धुंडी महाराज यांनी मी चाल लावलेले अभंग गात असतांना ऐकले. ते ऐकून श्री. धुंडी महाराज मला म्हणाले, ‘‘दसककर, माझे जिथे जिथे कीर्तन असेल, तिथे तुम्ही मला भेटत जा’’, तसेच प्रा. मामासाहेब दांडेकर मला म्हणाले, ‘‘दसककर, या अभंगांतील एकही स्वर अल्प-अधिक करू नकोस. त्या (ओळी) प्रासािदक झाल्या आहेत. हे हरिपाठ स्वच्छ आणि पवित्र आहेत.’’ त्या सगळ्या चाली माझ्याकडून भगवंताच्या कृपेमुळेच लावल्या गेल्या होत्या.

– पं. प्रभाकर दसककर, नाशिक (४.१०.२०१९)

(‘ही सूत्रे पं. प्रभाकर दसककर यांच्या निधनापूर्वीची आहेत.’ – संकलक)

(कै.) पं. प्रभाकर दसककर (दादा) यांची श्री. सुभाष दसककर (पं. दसककर यांचा धाकटा मुलगा) यांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये

श्री. सुभाष दसककर

१. ‘दादांचे गाणे ऐकल्यावर सद्गुरूंनी (श्री. रोजेकर महाराज यांनी) त्यांना ‘तानसेन’ ही पदवी दिली.

२. त्यांनी २८ अभंगांना रागदारीत (विविध रागांत) चाली लावल्या आहेत.

. सद्गुरु श्री. रोजेकर महाराज यांना दादांची गाणी पुष्कळ आवडायची. दादा म्हणतात, ‘‘गुरुकृपेविना माझे गाणे उत्तीर्ण झाले नाही.’’

४. ‘डोळे मिटून मनाने गायन करणे’, ही दादांच्या उपासनेची पुढची पायरी आहे आणि त्या स्थितीपर्यंत सद्गुरु त्यांना घेऊन गेले आहेत.

५. दादांच्या आवाजाचे वैशिष्ट्य म्हणजे या वयातही त्यांचा आवाज खणखणीत असून चढा लागतो.

६. सभोवतालच्या विविध आवाजांवरून स्वरांचा अभ्यास करवून घेणे : दादा नेहमी सांगतात, ‘‘कान हे संगीताचे डोळे असतात.’’ संगीत ही श्रवण विद्या आहे. गाड्यांचे आवाज (हॉर्न) ऐकून दादा आम्हाला ‘हा कुठला स्वर आहे ?’, हे विचारायचे. ‘एखाद्या हॉर्नवरूनही एखादा राग बनतो. निसर्गाने सर्व दिले आहे. केवळ तुमची दृष्टी तशी असणे आवश्यक आहे’, असे त्यांनी आम्हाला सांगितले. सभोवतालच्या विविध आवाजांवरूनही त्यांनी आमच्याकडून अशा प्रकारे स्वरांचा अभ्यास करवून घेतला.

७. दादांची प्रवृत्ती सगळ्यांना देण्याची आहे; परंतु ‘मला काही शिकायचे आहे’, अशी तळमळ असणार्‍यालाच देण्यात अर्थ आहे, नाहीतर अर्थ नाही’, असे ते म्हणतात.’

– श्री. सुभाष दसककर (धाकटा मुलगा), नाशिक (४.१०.२०१९)

(कै.) पं. दसककर यांनी संगीतसाधनेविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन

१. संगीत-साधनेविषयी

१ अ. अध्यात्म म्हणजे ‘षड्ज’ असून तो अचूक म्हटल्यास सगळे ज्ञान प्राप्त होते ! : अध्यात्म म्हणजे ‘षड्ज’ (सा). तो आतून म्हटला पाहिजे. ज्याचा षड्ज (सा) अचूक लागला, जो षड्जामध्ये स्थिर झाला. त्याचे सातही स्वर लागतात. त्याला सगळे ज्ञान प्राप्त होते; परंतु तो स्थिर होणेच कठीण असते. षड्जाची अनुभूती घ्यायला तो पक्का झाला पाहिजे. त्याच्याविना दुसरे काही नाही. षड्ज (सा) प्रसन्न झाला पाहिजे.

१ आ. संगीत-साधना करून प्राप्त झालेल्या सिद्धींकडे दुर्लक्ष करून सतत साधनारत रहाणे आवश्यक आहे ! : साधना करून संगीताचा माल घ्यायचा; पण त्याचा उपभोग घ्यायचा नाही. त्या मालात शक्ती असते. त्यातून जे हवे ते मिळेल. मनात विचार आला की, ते समोर प्रकट होईल; पण त्याचा उपभोग घ्यायचा नाही, तरच त्या मालाला तेज येते. येथे माल म्हणजे संगीत-साधनेने व्यक्तीला मिळणारी सिद्धि आणि शक्ती. संगीत-साधना करतांना मनुष्याला सिद्धीही प्राप्त होऊ लागते. त्या सिद्धीचा उपभोग साधकाने घेऊ नये.

सिद्धीच्या प्रलोभनाच्या मागे लागल्यास कलाकाराची हानीच होते. साधना करता करता सिद्धी प्राप्त होतात. सिद्धी हात जोडून पुढे उभ्या असतात; परंतु त्यांकडे लक्ष न देता आपण साधनारत रहावे.

१ इ. संगीत-साधनेत ‘मला काहीच येत नाही’, हा विचार मनात असणे अपेक्षित आहे ! : मी प्रसिद्धीच्या मागे कधीच धावलो नाही. प्रसिद्धीच्या मागे जाण्याने अपायच होतात. उलट ‘मला काही येत नाही’, हाच विचार असणे अपेक्षित आहे. स्वतःला सतत झाकत रहायचे, म्हणजे ‘मी’पणाला नेहमी दूर ठेवायचे. एखादाच हरीचा (देवाचा) लाल असतो आणि तोच हे ज्ञान उचलू शकतो; कारण त्यासाठी कलाकाराची तेवढी पात्रता हवी.

१ ई. जो प्रसिद्धीच्या मागे लागला, त्याला हे ज्ञान होणे कठीण आहे. त्यामुळे मी जन्मभर पैसे मिळवले नाही, तर (सतत साधनेतील) आनंद लुटला.

१ उ. स्थुलातून ओठांनी गाणे म्हणण्यापेक्षा ओठ बंद करून संगीत अनुभवल्यास एक दिव्य अनुभूती येते ! : स्थुलातून म्हणजे ओठांनी संगीत म्हणण्यापेक्षा ओठ बंद करून केवळ संगीत ऐकतांना ‘तुम्ही गंगेच्या किनारी बसून अभंग म्हणत आहात आणि साथीला वाद्ये वाजत आहेत’, असे मनाने अनुभवण्याचा प्रयत्न केल्यास एक दैवी अनुभूती येते; कारण सांगणारा परमेश्वर असतो, ऐकणाराही तोच असतो आणि गाणार्‍याच्या आत बसणाराही तोच असतो.

१ ऊ. संगीत-साधना करतांना अहंकाराचा अडथळा पार करण्यासाठी अन्यत्र लक्ष न देता मनातील विचारांचे अंतर्निरीक्षण करावे ! : अहंकार हा संगीत-साधनेतील मोठा अडथळा असतो. त्यासाठी एक घंटा ध्यानाला बसावे. मनातील विचारांचे अंतर्निरीक्षण करावे. इतरत्र लक्ष न देता आपण जे म्हणत आहोत, त्याकडेच लक्ष हवे. तेव्हाच हळूहळू बाह्य जगाची जाणीव न्यून होऊन मनुष्य एका ठिकाणी स्थिर होतो. हे करत असतांना विघ्ने येणारच. ती पार केल्यावर जेव्हा आपण ध्यानाला बसतो, तेव्हा देवाशी एकरूप होणारच ! मनातील विचार हळूहळू बंद होतात. त्यानंतर आपण स्थिर होतो.

१ ए. ‘संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर यांसारख्या विविध संतांनी संगीताचे शिक्षण न घेताही सुंदर अभंग रचले आणि गायले’, हेच संतांचे वैशिष्ट्य आहे.

२. अध्यात्माविषयी : सगळ्यांना एकाच ठिकाणी जायचे आहे. एकालाच (भगवंताला) ओळखायचे आहे आणि एकच (भगवंतच) सर्व आहे. मग आनंदच आनंद आहे.’

– पं. प्रभाकर दसककर, नाशिक (४.१०.२०१९)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक