संभाजीनगर येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या जागी बनावट रुग्ण, ६ जणांवर गुन्हा नोंद ! 

प्रतिकात्मक छायाचित्र

संभाजीनगर – येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या ऐवजी दुसरेच बनावट रुग्ण उपचारासाठी भरती झाल्याचा धक्कादायक प्रकार येथील महापालिका रुग्णालयात घडला आहे. महानगरपालिकेच्या तक्रारीनंतर ६ जणांच्या विरोधात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेले २ रुग्ण, त्यांच्या जागी उपचार घेण्यासाठी आलेले २ तरुण आणि या प्रकरणी मध्यस्थी करणारे २, असे एकूण ६ जणांच्या विरोधात १७ नोव्हेंबर या दिवशी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

‘१० दिवसांचे १० सहस्र मिळणार, तसेच खाणे-पिणे आणि मजा करा’, अशी मध्यस्थाने रुग्णाची जागा घेणार्‍याला आमीष दाखवले होते. यासाठी जालना येथील २ तरुण सिद्ध झाले. ते तरुण जालना येथून संभाजीनगर येथे पोचले आणि थेट कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णांसमवेत उपचार घेऊ लागले; पण नंतर ही गोष्ट आरोग्य अधिकार्‍यांच्या लक्षात आली. पोलिसांनी रुग्णालयाच्या तक्रारीनंतर बनावट रुग्णांना कह्यात घेतले असून  त्यांची चौकशी चालू आहे. जे बनावट रुग्ण उपचारासाठी आले होते, त्यांच्याकडे एका खासगी रुग्णालयाचे ‘रेफर सर्टिफिकेट’ होते. त्यामुळे विमा मिळवण्यासाठी हा सर्व प्रकार चालू होता का ? याचेही पोलीस अन्वेषण करत आहेत.

खरेच ते रुग्ण पॉझिटिव्ह होते का ?

‘सिद्धार्थ गार्डनमध्ये पडताळणी करतांना पॉझिटिव्ह असलेले रुग्ण खरेच पॉझिटिव्ह होते का ?, याचीही महापालिका पडताळणी करत आहे. त्यासाठी तज्ञांची समिती नेमली आहे’, असे ‘मेल्ट्रॉन’ रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. दीपाली मूगदळकर यांनी सांगितले.