अनिल देशमुख यांचा प्रत्येक दिवस आणि घंटा यांची किंमत आज ना उद्या नक्कीच वसूल होईल ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

कारागृहातील अनिल देशमुख यांना शरद पवार यांचे समर्थन !

ज्या लोकप्रतिनिधींनी पारदर्शी कारभार केला असेल, त्यांना कशाची तमा ? परंतु त्यांच्या विरोधात पुरावे मिळत असल्यानेच ईडी, सीबीआय अथवा अन्य यंत्रणा यांनी त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला आहे. त्यामुळे अन्वेषण करणार्‍या यंत्रणांवर राग काढण्यापेक्षा स्वतःच्या पक्षातील लोकप्रतिनिधी पारदर्शी कारभार करतात कि भ्रष्टाचार करतात ?, हे पहायला हवे ! – संपादक 

अनिल देशमुख  आणि  शरद पवार

नागपूर – राष्ट्रवादी काँग्रेस असो, काँग्रेस असो कि शिवसेना विविध सरकारी यंत्रणांचा अपवापर करून आमच्या मित्रपक्षांना त्रास दिला जात आहे. तुम्ही कितीही धाडी घालून अटक केली, तरी सामान्यांना समवेत घेऊन तुम्ही (भाजप) महाराष्ट्रात कधीच जिंकणार नाही. तुम्हाला १०० टक्के पराभवाला सामोरे जावे लागेल. तुम्ही अनिल देशमुख यांना कारागृहात टाकले, त्यांच्या प्रत्येक दिवसाची आणि प्रत्येक घंट्याची किंमत आज ना उद्या नक्कीच वसूल होईल, अशी चेतावणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी १७ नोव्हेंबर या दिवशी येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात दिली. या वेळी पवार यांनी कारागृहात असणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे समर्थन करून त्यांना पाठिंबा दिला.

शरद पवार पुढे म्हणाले की, देशात सूडाचे राजकारण केले जात आहे. सत्तेचा वापर सन्मानासह करावा लागतो; मात्र या लोकांचे पाय भूमीवर नाहीत आणि सत्ता डोक्यात गेली आहे. हे जे काही होत आहे त्याचा परिणाम आहे. ज्या पोलीस अधिकार्‍याने अनिल देशमुख यांच्यावर आरोप लावले होते, त्याला पसार घोषित करण्यात आले. ते कुठे गायब आहेत ? ठाऊक नाही. कोणत्या देशात आहेत माहिती नाही. समन्स आहे; पण ते उपस्थित होत नाहीत. अनिल देशमुख आज कारागृहात आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे केंद्र सरकारच्या सत्तेचा दुरुपयोग हे आहे. काही लोकांनी याला धंदा बनवले आहे.