शहरातील ४ जणांना अटक
असुरक्षित अल्पवयीन मुली आणि महिला ! ही आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील महिलांची दुर्दैवी स्थिती ! पोलीसच असे करत असतील, तर कायद्याचे राज्य कधीतरी येईल का ? अशा पोलिसांना कठोर शिक्षा त्वरित होणे आवश्यक आहे.
अंबाजोगाई (जिल्हा बीड) – शहरातील अल्पवयीन पीडितेवर मागील ६ मासांमध्ये २ पोलिसांसह शेकडो जणांनी विविध ठिकाणी अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. या प्रकरणात अंबाजोगाई पोलिसांनी १४ नोव्हेंबर या दिवशी पुरवणी जबाब नोंदवला. त्यानंतर शहरातील ४ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती तपास अधिकारी अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी दिली. अटक केलेल्या चारही जणांना १५ नोव्हेंबर या दिवशी अंबाजोगाई न्यायालयात उपस्थित करण्यात आले. त्यांना न्यायालयाने १९ नोव्हेंंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.(अत्याचार करणार्या नराधमांमध्ये पोलिसांचाही सहभाग असणे लज्जास्पद ! महिलांवरील अत्याचाराविषयी कठोर कायदा नसल्याने नराधमांना धाक राहिलेला नाही. त्यामुळे कठोर कायदा करणे आणि त्याची कठोर कार्यवाही करणे आवश्यक आहे. – संपादक)
१. अंबाजोगाई तालुक्यातील एका गावातील १७ वर्षीय पीडित मुलीच्या आईचे ८ वर्षांपूर्वी निधन झाले. त्यामुळे तिचा १३ व्या वर्षीच विवाह झाला. पतीकडूनही छळ होत असल्याने ती वडिलांकडे आली होती; मात्र वडिलांकडूनही छेडछाड होत असल्याने जून २०२१ मध्ये मुलीने घरातून पळून जाऊन अंबाजोगाई शहर गाठले.
२. तेथेच ती बसस्थानकावर वास्तव्य करून भीक मागून जगत होती. या कालावधीत जेवण देण्याच्या आमीषाने तिच्यावर २ जणांनी बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला होता; मात्र या प्रकरणात पीडितेने बालकल्याण समितीसमोर दिलेल्या जबाबात शेकडो जणांनी तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती दिली.
प्रकरणाचे सखोल अन्वेषण करण्यात येईल ! – कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक, अंबाजोगाई
पीडितेच्या माहितीनुसार लॉज आणि शहरातील विविध ठिकाणांच्या ‘सीसीटीव्ही फुटेज’ची पहाणी करून आरोपींची ओळख पटवली जात आहे. त्यासाठी विविध पथकेही सिद्ध करण्यात आली आहेत. या प्रकरणाचे सखोल अन्वेषण करण्यात येईल.