सांगली, १५ नोव्हेंबर (वार्ता.) – ज्या ज्या वेळी महाराष्ट्रात ‘रझा अकादमी’च्या गुंडांनी दंगल केली त्या त्या वेळी महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार होते आणि आहे. त्याचसमवेत दंगली झालेल्या प्रत्येक वेळी गृहखाते हे राष्ट्रवादी काँग्रेसकडेच होते आणि आहे. त्यामुळे यामागे काही राजकीय षड्यंत्र आहे का ? याचे अन्वेषण केंद्रीय गृहखात्याने करावे. ‘रझा अकादमी’ची पाळेमुळे सांगली जिल्ह्यात आहेत का ? याचे अन्वेषणही व्हावे, अशी मागणी माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
या पत्रकात पुढे म्हटले आहे की, रझा अकादमीने आझाद मैदान येथे मोर्चा काढून केलेल्या दंगलीनंतर त्यांच्यावर काय कारवाई झाली हे अद्याप महाराष्ट्राला समजलेले नाही. २ दिवसांपूर्वी अमरावती येथे झालेल्या दंगलीत ‘रझा अकादमतीचा पुढाकार होता, असे वृत्त समोर येत आहेत. त्यामुळे ‘रझा अकादमी’वर सरकारने बंदी घालण्याचे धाडस दाखवावे.