‘वन्दे मातरम्’ म्हणणे म्हणजे भारतमातेला नमन ! – प.पू. स्वामी गोविंददेवगिरी महाराज, ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे कोषाध्यक्ष

प.पू. स्वामी गोविंददेवगिरी महाराज

पुणे – देश म्हणजे केवळ भूमीचा तुकडा नाही. देशाला मातेचा दर्जा असून ‘वन्दे मातरम्’ म्हणजे तिला नमन आहे. ‘वन्दे मातरम्’ या काव्यात भविष्य घडवण्याचे तेज आहे. केंद्रातील सत्तेपाशी साम्यवादी लोक होते; म्हणून रामसेतू कुणी बांधला नाही, असे बिंबवले जात होते, असे प्रतिपादन ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेवगिरी महाराज (किशोर व्यास) यांनी केले. विवेक समूहाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त मिलिंद आणि शिल्पा सबनीस लिखित ‘समग्र वन्दे मातरम्’ या हिंदीत अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन प.पू. स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांच्या हस्ते पुणे येथे झाले. त्या वेळी ते बोलत होते. ‘गेली ७० वर्षे झोळी पसरणारा देश आता जगाला लस देत आहे. ७० वर्षे हळहळणार्‍या भारतमातेच्या तोंडवळ्यावर वर्ष २०१४ पासून हास्य फुलले आहे’, असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, ‘‘देशातील निवडणुका कांदा, बटाटा, पेट्रोल, डिझेल यांच्या भाववाढीवरून होतात. भाववाढीवरून ओरडणार्‍या लोकांना लाज वाटायला पाहिजे. आंतरराष्ट्र्रीय स्तरावर देश प्रगती करत असतांना लोकांनी ‘महागाई’ सहन केली पाहिजे.’’