आपत्काळासाठीची पूर्वसिद्धता म्हणून कार्तिकी एकादशी (१५.११.२०२१) पासून चालू होणार्‍या सनातनच्या ‘घरोघरी लागवड’ मोहिमेत सहभागी व्हा !

साधकांना सूचना

काळाची गती लक्षात घेऊन साधकांनी घरच्या घरी फळे, भाजीपाला आणि औषधी वनस्पती यांची लागवड करण्यास लगेच आरंभ करणे आवश्यक ! – संपादक

वैद्य मेघराज पराडकर

१. घरोघरी भाजीपाला, फळझाडे आणि औषधी वनस्पती यांची लागवड करण्याची आवश्यकता

कोरोनाच्या काळात आपण भीषण आपत्काळाची झलक अनुभवली. आपत्काळात अन्नधान्य, तयार औषधे यांचा तुटवडा असणार आहे. त्यामुळे आतापासूनच आपल्याला त्यासाठी सिद्धता करणे आवश्यक आहे.

आजकाल बाजारात मिळणारा भाजीपाला, फळे इत्यादींवर हानीकारक रसायनांची फवारणी केलेली असते. अशा भाज्या आणि फळे खाल्ल्याने प्रतिदिन विषारी पदार्थ आपल्या पोटात जात असतात. यामुळे रोग होतात. साधनेसाठी शरीर निरोगी रहाणे आवश्यक असते. हानीकारक रसायनांपासून मुक्त, म्हणजेच विषमुक्त अन्न खाण्यासाठीही सध्याच्या काळात घरच्या घरी थोडातरी भाजीपाला पिकवणे आवश्यक झाले आहे.

२. लागवडीमध्ये समस्या असल्या, तरी त्यांच्यावर उपाययोजना काढून घरोघरी लागवड करणे आवश्यक !

घराच्या बाजूला लागवड करण्यासाठी जागा उपलब्ध नसणे, लागवड करण्यासाठी वेळ नसणे, ‘लागवड कशी करतात ?’, हे ठाऊक नसणे, ‘बियाणे, खते इत्यादी कुठून आणायची ?’, हे ठाऊक नसणे अशा अनेक समस्यांमुळे घरच्या घरी भाजीपाला पिकवणे बहुतेकांना अशक्यच वाटते; परंतु या सर्वांवर उपाययोजना काढून आपण घरच्या घरी भाजीपाला, फळे आणि औषधी वनस्पती यांची लागवड निश्चितच करू शकतो किंबहुना भावी भीषण आपत्काळासाठीची पूर्वसिद्धता म्हणून प्रत्येकाला हे करावेच लागणार आहे.

३. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपाशीर्वादाने कार्तिकी एकादशीपासून सनातनच्या ‘घरोघरी लागवड’ मोहिमेला आरंभ !

सर्वत्रच्या साधकांना वरील समस्यांवर मात करून घरच्या घरी थोडीतरी भाजीपाला, फळझाडे आणि औषधी वनस्पती यांची लागवड करता यावी, यासाठी कार्तिकी एकादशी (१५.११.२०२१) पासून परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपाशीर्वादाने सनातन संस्था ‘घरोघरी लागवड’ मोहीम चालू करत आहे. या मोहिमेच्या अंतर्गत पूर्णतः नैसर्गिक पद्धतीने लागवड करणे शिकवले जाणार असून साधकांकडून ती करवूनही घेतली जाणार आहे.

४. साधकांनो, लागवडीसंबंधीच्या सर्व समस्यांवर मात करून स्वतःच्या घरी लागवड करण्यास लगेचच आरंभ करा !

ज्यांच्याकडे घराच्या आजूबाजूला जागा असेल, ते तेथे लागवड करू शकतात; परंतु जे सदनिकांमध्ये किंवा चाळीत रहातात, ज्यांच्याकडे लागवडीसाठी जागा नाही, तेही घराच्या आगाशीमध्ये, सज्जामध्ये किंवा खिडकीतही लागवड करू शकतात. या लागवडीसाठी वेगळ्या मातीचीही आवश्यकता नसते. केवळ काही विटा बाजूबाजूला लावून मध्ये होणार्‍या जागेमध्ये पालापाचोळा, तसेच स्वयंपाकघरातील टाकाऊ पदार्थ विशिष्ट पद्धतीने पसरल्याने काही दिवसांतच अत्यंत सुपीक माती बनते. या मातीमध्ये कोणतेही बाहेरचे खत मिसळण्याची आवश्यकता रहात नाही. या सुपीक मातीमुळे लागवडीतून निर्माण होणारी झाडे रसरशीत होऊन भरपूर उत्पन्न देतात. अशा प्रकारच्या लागवडीमुळे घरातील कचर्‍याची योग्य विल्हेवाट लागते आणि कचर्‍याची समस्याही सुटते. थोडक्यात या लागवडीसाठी लागणारी साधनसामुग्री नगण्य असल्याने अत्यंत अल्प खर्चात लागवड शक्य होते. यासाठी फार वेळ देण्याचीही आवश्यकता नसते. नेहमीच्या दिनचर्येत या लागवडीचा समावेश करून आपण अत्यंत अल्प वेळ देऊनही ही लागवड करू शकतो. काळ कुणासाठी थांबत नाही, हे लक्षात घेऊन साधकांनी स्वतःच्या वेळेचे योग्य नियोजन करून स्वतःच्या क्षमतेनुसार लागवडीला लगेचच आरंभ करावा.

५. साधकांनो, ‘घरोघरी लागवड मोहिमे’त पुढीलप्रमाणे सहभागी व्हा !

सर्वत्रच्या साधकांनी पुढे दिलेल्या समयमर्यादेमध्ये या मोहिमेसंबंधी दिलेल्या कृती कराव्यात. ज्यांच्याकडे या सेवा लवकर होऊ शकतात, त्यांनी त्या समयमर्यादेपूर्वी केल्या तरी चालू शकते. येथे दिलेल्या पद्धतीनुसार लागवड केल्याने साधकांना लागवडीचा थोडाफार अनुभव येईल, तसेच आत्मविश्वास वाढेल. हा पहिला टप्पा पूर्ण झाल्यावर पुढे काय करायचे ? याचे मार्गदर्शन दैनिक ‘सनातन प्रभात’मधून करण्यात येईल.

टीप – संकेतस्थळावर प्रश्न विचारण्याची पद्धत

१. पानाच्या शेवटी ‘Leave a Comment’ असे लिहिलेल्या जागी ‘क्लिक’ करावे.

२. येथे आपला प्रश्न, आपले नाव आणि ई-मेल पत्ता लिहावा.

३. Save my name… हा पर्याय निवडावा. असे केल्याने पुढच्या वेळी नाव आणि ई-मेल पत्ता पुन्हा घालावा लागणार नाही.

४. ‘Post Comment’ असे लिहिलेल्या जागी क्लिक करावे.

असे केल्यावर हा प्रश्न संकेतस्थळाच्या प्रशासकाकडे (ॲडमिनकडे) जाईल आणि त्याने स्वीकृती दिल्यावर हा प्रश्न संकेतस्थळाच्या पानावर दिसेल.

६. शंकानिरसनाची कार्यपद्धत

या मोहिमेमध्ये साधकांचे शंकानिरसन करण्यासाठी ऑनलाईन अभ्यासवर्ग घेतले जातील. या अभ्यासवर्गांमध्ये संकेतस्थळावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यात येतील. सर्वांसाठी उपयुक्त असलेल्या प्रश्नांची उत्तरे सनातन प्रभातमधूनही देण्यात येतील.

७. या मोहिमेत श्रद्धा आणि भाव पूर्वक सहभागी व्हा !

श्रीगुरुचरित्राच्या चाळीसाव्या अध्यायात एक प्रसंग आहे. नरहरि नावाच्या ब्राह्मणाला कोड (एक त्वचाविकार) झालेले असते. श्रीगुरु नृसिंहसरस्वती त्याला ४ वर्षे वाळलेली एक औदुंबराची काठी देऊन दिवसातून ३ वेळा त्या काठीला पाणी घालायला सांगतात. लोक चेष्टामस्करी करत असूनसुद्धा भक्त नरहरि आज्ञापालन म्हणून ७ दिवस मनात कोणताही विकल्प न आणता त्या वाळलेल्या काठीला श्रद्धेने पाणी घालतो. श्रीगुरु त्याच्यावर प्रसन्न होऊन स्वतःच्या कमंडलूतील तीर्थ त्या काठीवर शिंपडतात. याबरोबर त्या वाळलेल्या फांदीला पालवी फुटते आणि नरहरीचे कोडही बरे होते. भक्त नरहरीप्रमाणे आपणही श्रद्धा आणि भाव पूर्वक या मोहिमेत सहभागी होऊया. ‘श्रीगुरुच आपल्याकडून ही सेवा करवून घेत आहेत’, असा भाव ठेवूया !

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.११.२०२१)

३० वर्षांपासून घराच्या आगाशीमध्ये कोणत्याही रासायनिक खतांविना विषमुक्त अन्न पिकवणार्‍या पुणे येथील सौ. ज्योती शहा !

सौ. ज्योती शहा यांनी आगाशीत लावलेल्या झाडांची छायाचित्रे

केळीच्या झाडाला लागलेला केळ्यांचा घड
जुन्या कार्पेटपासून बनवलेल्या पिशवीत लावलेली ढोबळी मिरची
भरपूर फळे आलेले पपईचे झाड
कुंडीतील झाडाला लागलेले पेरू
आगाशीत केवळ एका विटेच्या रुंदीएवढ्या (साधारण ४ इंच) मातीत लावलेले शेवग्याचे झाड

पुणे येथील सौ. ज्योती शहा गेल्या ३० वर्षांपासून त्यांच्या घराच्या आगाशीमध्ये नैसर्गिक पद्धतीने भाजीपाला, फळझाडे आणि औषधी वनस्पती यांची लागवड करत आहेत. थोड्याशा जागेमध्ये त्यांनी १८० हून अधिक प्रकारची झाडे लावली आहेत. केवळ एका विटेच्या जाडीच्या कप्प्यांमध्ये पालापाचोळा, स्वयंपाकघरातील कचरा (सौ. शहा याला ‘कचरा’ असे न म्हणता ‘झाडांचा खाऊ’ असे संबोधतात), तसेच देशी गायीचे शेण आणि गोमूत्र यांच्यापासून बनवलेला ‘जीवामृत’ नावाचा विशिष्ट पदार्थ यांचा वापर करून त्यांनी ‘मातीविना शेती’ केली आहे. जीवामृत सोडून अन्य कोणत्याही खताचा वापर न करता त्यांच्या घराच्या आगाशीत त्या विषमुक्त अन्न पिकवत आहेत. यासाठी त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच ! त्यांनी केलेल्या लागवडीची छायाचित्रे प्रत्येकाच्या मनात ‘शहरातील जागेच्या समस्येवर मात करून कोणत्याही खताविना लागवड करणे शक्य आहे’, असा आत्मविश्वास निर्माण करतात. सौ. ज्योती शहा केवळ स्वतःच्या घरी लागवड करून थांबल्या नाहीत, तर त्यांनी आतापर्यंत असंख्य जणांना ही लागवडीची पद्धत शिकवली आहे.

कृतज्ञता

गेल्या ३० वर्षांचा ‘शहर शेती’चा अनुभव असलेल्या पुणे येथील सौ. ज्योती शहा यांनी ‘यूट्यूब’वर स्वतःच्या घरी केलेल्या लागवडीचे, तसेच ही लागवड कशी करावी, यांविषयी मार्गदर्शनपर व्हिडिओ ठेवले आहेत. सनातनच्या साधकांनी त्यांना संपर्क केला असता त्यांनी सनातनच्या ‘घरोघरी लागवड’ मोहिमेसाठी केव्हाही विनामूल्य मार्गदर्शन करण्याची सिद्धता दर्शवली. यासाठी सौ. ज्योती शहा यांच्याप्रती आम्ही कृतज्ञ आहोत !

– वैद्य मेघराज माधव पराडकर (१०.११.२०२१)


‘स्वयंपाकघरातील कचर्‍याला ‘झाडांचा खाऊ’ संबोधले, तर त्या कचर्‍याकडे पहाण्याचा आपला दृष्टीकोन पालटतो. केवळ शब्द पालटण्याने आपल्या कृतीतही पालट होतो आणि आपण हा ‘खाऊ’ फेकून न देता ‘झाडाला भरवतो’.

– सौ. ज्योती शहा, पुणे (२४.१०.२०२१)

घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने लागवड कशी करावी, यासंदर्भात सविस्तर जाणून घेण्यासाठी पुढील मार्गिका (लिंक) पहा !

https://www.sanatan.org/mr/a/82985.html

(या मार्गिकेवर थेट जाण्यासाठी ‘QR कोड’(टीप) ‘स्कॅन’ करा !)

क्यू आर् कोड (QR Code) म्हणजे काय ?

‘QR कोड’ म्हणजे ‘Quick Response कोड’. आजकाल सर्वच ‘स्मार्ट फोन्स’मध्ये ‘QR कोड स्कॅनर’ ही प्रणाली (ॲप) उपलब्ध असते. (नसल्यास ती ‘डाऊनलोड’ करता येते.) ही प्रणाली चालू करून ‘QR कोड’वर ‘स्मार्ट फोन’चा छायाचित्रक (कॅमेरा) धरावा, म्हणजे ‘कोड’ ‘स्कॅन’ होतो आणि ‘स्मार्ट फोन’मध्ये संकेतस्थळाची मार्गिका आपोआप उघडते. तिचे टंकलेखन करावे लागत नाही.