पुणे – दिवाळीची सुटी संपल्यानंतर पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळांमधील इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग ‘ऑफलाईन’ चालू झाले आहेत. राज्य सरकारने २ दिवसांच्या खंडानंतर पुन्हा दिलेली दिवाळीची वाढीव सुटी जिल्हा परिषद शाळांना नसणार आहे. हा निर्णय पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि शिक्षण सभापती रणजित शिवतरे यांनी सांगितले की, पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मिळून २३४ शाळांची ‘राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणा’साठी (नॅस) निवड करण्यात आली आहे. या शाळांमधील एकूण २६८ वर्गांमधील ७ सहस्र ७९९ विद्यार्थ्यांची गणित, इंग्रजी, सामाजिक शास्त्र, विज्ञान आणि भाषा या विषयांची किमान ९० मिनिटे आणि कमाल १२० मिनिटांची प्रश्नावली उत्तरांसह भरून घेतली जाणार आहे. यासाठी तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावीच्या वर्गांतील विद्यार्थ्यांची निवड केली आहे.