श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी दैवी बालकांच्या उदाहरणांतून साधकांना केलेले अनमोल मार्गदर्शन !

‘गेल्या अनेक वर्षांपासून परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करत आहेत. ते साधकांना विविध बारकावे शिकवून घडवत आहेत. गुरुदेवांच्या कार्यातील एक वैशिष्ट्यपूर्ण भाग म्हणजे दैवी बालके ! गुरुदेवांच्या अवतारी कार्यात सहभागी होण्यासाठी दैवी बालके उच्च लोकांतून पृथ्वीतलावर जन्माला आलेली आहेत. गुरुदेवांनी उलगडले नसते, तर या बालकांचे दैवीपण कुणालाही कळले नसते. ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी साधकांशी बोलतांना ‘या दैवी बालकांची उदाहरणे देऊन आपणही साधनेसाठी कसे प्रयत्न करू शकतो ?’, याविषयी साधकांना दिशादर्शन केले. श्रीसत्‌शक्ति(सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे सहज बोलणे, ‘त्यांच्या ओघवत्या वाणीतून साधकांच्या उद्धारासाठी अन् साधकांनी पुढे जावे’, या तळमळीमुळे बाहेर पडलेले शब्द, त्यांचे दिव्य मार्गदर्शन शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांनी चैतन्यमय वाणीतून केलेले मार्गदर्शन येथे दिले आहे.

१२.११.२०२१ या दिवशीच्या ‘सनातन प्रभात’च्या अंकात आपण या लेखातील काही सूत्रे पाहिली. आजच्या अंकात त्यापुढील सूत्रे पाहूया.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा ः https://sanatanprabhat.org/marathi/526462.html


२. श्रीसत्‌शक्ति(सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी साधकांना केलेले अमूल्य मार्गदर्शन

२ ऊ. परात्पर गुरु डॉक्टर यांच्यातील मोठ्या प्रमाणात कार्यरत झालेले दैवी तत्त्व ग्रहण होण्यासाठी साधकांनी अंतरातील भाव आणि तळमळ वाढवणे आवश्यक ! : परात्पर गुरु डॉक्टरांमधील दैवी तत्त्व आता पुष्कळ मोठ्या प्रमाणात कार्यरत झाले आहे. ते आता प्रगट होऊन सर्वत्र प्रवाहित होत आहे. गुरूंचे ते तत्त्व सर्वत्रच्या साधकांसाठीच कार्यरत झाले आहे; परंतु जो साधक भावपूर्ण, तळमळीने आणि झोकून देऊन प्रयत्न करतो, त्या जिवाला ते लवकर ग्रहण करता येऊ शकते. यासाठी साधकांनी आपल्या अंतरातील भाव आणि तळमळ वाढवायला हवी.

२ ए. साधकांनी तळमळ वाढवून गांभीर्याने प्रयत्न केल्यास ते अडथळ्यांवर मात करून ६० ते ७० टक्के आध्यात्मिक पातळी लवकर गाठू शकणार असणे : बर्‍याच वेळा साधक एखाद दुसर्‍या लहान अडथळ्यात अडकलेले असतात. ते अडथळे पार केले की, ते लवकरात लवकर ६० ते ७० टक्के आध्यात्मिक पातळी गाठू शकतात. प्रत्येक साधकात ही क्षमता आहे. साधकांच्या संदर्भात लक्षात येते की, अडथळे जरी लहान स्वरूपाचे असले, तरी त्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी जे प्रयत्न करणे अपेक्षित आहेत, ते साधक करत   नाहीत. त्यासाठी साधकांची तळमळ न्यून पडते. त्यावर साधकांनी आता गांभीर्याने प्रयत्न करायला हवेत.

कु. वैष्णवी वेसणेकर

२ ऐ. साधकांनी आध्यात्मिक प्रगतीच्या केवळ टक्केवारीत न अडकता अडथळ्यांवर मात करून देवाच्या जवळ जाण्यातील आनंद घेऊन लवकर पुढे जायला हवे ! : प्रगती म्हणजे केवळ आध्यात्मिक पातळी आणि तिची टक्केवारी नाही. साधकांनी टक्केवारीत अडकू नये. ‘आपण देवाच्या जवळ जात आहोत’, याचा आनंद घ्यायला हवा. ‘आपण देवाच्या राजसभेत (दरबारातच) आहोत’, असे म्हटल्यावर आपल्याला किती आनंद होईल ना ! ‘आपण देवाच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहोत’, या विचारानेही आनंद होतो, तर देवाच्या जवळ जाण्यात किती आनंद असेल ! सर्व साधकांनी स्वतःचे सर्व जीवन साधनेसाठी आणि गुरुचरणांच्या प्राप्तीसाठी समर्पित केले आहे. आता थोडेच अडथळे राहिले आहेत. त्या अडथळ्यांवर मात करून आपण सर्वांनी लवकर पुढे जायला हवे.

२ ओ. परात्पर गुरुदेवांनी शिकवल्याप्रमाणे स्वयंसूचना घेऊनही साधनेतील अडथळ्यांवर मात करता येत नसेल, तर साधकांनी स्वत:साठी योग्य शिक्षापद्धतीचा अवलंब करावा ! : परात्पर गुरुदेवांनी आपल्याला शिकवण दिली आहे, ‘साधनेत येणार्‍या अडथळ्यांवर अनेक प्रयत्न करूनही मात करता येत नसेल, तर स्वतःला शिक्षा करा; कारण आपले मन साधनेसाठी कठोरतेने प्रयत्न करत नाही. आपण शिक्षा म्हणून एखाद्या वेळी जेवलो नाही किंवा अल्पाहार केला नाही, तर आपल्याला भूक लागते आणि त्यामुळे मनाला जाणीव रहाते.’ गुरुदेवांच्या या शिकवणीचे आचरण करा. स्वभावदोष आणि अहं यांवर मात करण्यासाठी, मनाला स्वभावदोषांची जाणीव होण्यासाठी गुरूंनी शिकवल्याप्रमाणे स्वयंसूचना घ्याव्यात; पण स्वयंसूचना घेऊनही मात करता येत नसेल, तर स्वत:ला शिक्षा करावी. शिक्षा भावनिक स्तरावर न घेता आध्यात्मिक स्तरावरील, म्हणजे आपल्या व्यष्टी आणि समष्टी साधनेला पूरक असायला हवी. साधकांनी अडथळ्यांवर मात करून लवकर प्रगती करायला हवी.

२ औ. परात्पर गुरुदेवांना साधकांच्या प्रगतीविषयी पुष्कळ तळमळ असणे : साधकांची लवकरात लवकर प्रगती व्हावी, यासाठी परात्पर गुरुदेवांची पुष्कळ तळमळ आहे. गुरुदेव सतत प्रत्येक साधकाच्या प्रगतीविषयी विचार करत असतात. ‘साधक साधनेत पुढे जात आहे का ? त्याची प्रगती होण्यात कोणता अडथळा आहे ? संबंधित साधकाला त्याची प्रगती न होण्यातील अडथळा ठाऊक आहे का ? त्याला त्यासाठी कोण साहाय्य करते ? दायित्व असणारा साधक त्या साधकाचा आढावा घेत आहे का ? दायित्व असणारा साधक संबंधित साधकाचा आढावा घेत असतांना त्या साधकात पालट का होत नाही ?’, असे ते विचारत असतात. साधकांच्या प्रगतीविषयी त्यांची एवढी तळमळ आहे !

२ अं. हिंदु राष्ट्राच्या व्यापक समष्टी ध्येयापेक्षा गुरुदेवांना साधकांची प्रगती होण्याचा अधिक ध्यास लागलेला असणे; कारण साधकांची प्रगती झाल्यावर देव हिंदु राष्ट्र आणणारच आहे ! : हिंदु राष्ट्राच्या व्यापक समष्टी ध्येयापेक्षा गुरुदेवांना साधकांच्या प्रगतीचा अधिक ध्यास लागलेला आहे. साधकांची प्रगती होण्यातच गुरुदेवांना खरा आनंद आहे. साधकांची प्रगती झाल्यावर देव आपल्याला हिंदु राष्ट्र देणारच आहे. हिंदु राष्ट्र सूक्ष्मातून भूतलावर अवतरत आहेच. साधकांनी साधनेचे प्रयत्न करून प्रगती केली की, ईश्वर आपल्याला स्वतःहून हिंदु राष्ट्र देणार आहे. त्यामुळे सर्वांनी लवकर प्रगती करावी. श्री गुरूंचे स्वप्न लवकरात लवकर साकार होण्यासाठी आपण सर्वांनी तळमळीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. गुरुदेवांनी आपल्या सर्वांच्या प्रगतीसाठी संकल्प केलेलाच आहे. त्यांच्याच संकल्पाने आपली प्रगती शक्य आहे; परंतु आपणही हे ध्येय साकार होण्यासाठी आपली तळमळ वाढवूया. आपण एकेकट्याने प्रयत्न न करता एकमेकांना साहाय्य करूया. आपल्या संपर्कात येणार्‍या साधकांनाही साहाय्य करूया.’’

सौ. कीर्ती जाधव

३. श्रीसत्‌शक्ति(सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना ‘प्रत्येक दिवशीच गुरुपौर्णिमा आणि प्रत्येक क्षणी दिवाळी आहे’, असे वाटत असल्याने वाढदिवसाविषयी काहीच न वाटणे

श्रीसत्‌शक्ति(सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ म्हणाल्या, ‘‘मी आज पहाटे एस्.एस्.आर्.एफ् च्या समष्टी संत पू. (सौ.) भावना शिंदे आणि पू. (सौ.) शिल्पा कुडतरकर यांच्याशी बोलत होते. तेव्हा त्यांनी मला विचारले, ‘‘आज तुमचा वाढदिवस आहे ना ?’’ तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘‘वाढदिवसाविषयीचा विचार मनातून कधी पुसला गेला’, हे माझे मलाही कळले नाही, याचे कारण वर्षातील ३६५ दिवस आणि २४ घंटे, प्रत्येक क्षणी आपल्यासाठी गुरुपौर्णिमाच आहे. प्रत्येक क्षण दिवाळीच आहे. त्यामुळे वेगळा वाढदिवस नाहीच. ‘प्रतिदिन वाढदिवस असतो’, असेच वाटते.’’

४. श्रीसत्‌शक्ति(सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी विश्वमन आणि विश्वबुद्धी यांतून विचार ग्रहण करून साधकांसाठी आवश्यक असलेले मार्गदर्शन करणे

त्या पुढे म्हणाल्या, ‘‘दैवी बालक प्रगल्भतेने बोलतात. ते विचार त्यांचे नसून ते विश्वमन आणि विश्वबुद्धी यांतील असतात. त्यांचे मन निर्मळ असल्याने त्यांना विश्वमन आणि विश्वबुद्धी यांतील विचार ग्रहण होतात. आताही मी तुमच्याशी बोलत आहे, तर हे तुमच्या सर्वांसाठी आवश्यक असलेले विचार विश्वमन आणि विश्वबुद्धी यांतून ग्रहण होऊन माझ्याकडून तेच बोलले जात आहे.’’

५. श्रीसत्‌शक्ति(सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या अल्प वेळ लाभलेल्या सत्संगातून साधकांना साधनेसाठी पुष्कळ ऊर्जा आणि उत्साह मिळणे

श्रीसत्‌शक्ति(सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ साधकांना मार्गदर्शन करत असतांना वातावरणात एक वेगळाच गारवा जाणवत होता. त्यांनी ही भावाची शीतलता असल्याचे सांगितले. साधकांनी श्रीसत्‌शक्ति(सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना वाढदिवसानिमित्त कृतज्ञतापत्र दिल्यावर त्या उभ्या राहून साधकांशी बोलत होत्या. त्यांनी साधकांची साधनेत जलद प्रगती होण्यासाठी अनेक पैलू उलगडले. साधकांशी बोलून झाल्यावर श्रीसत्‌शक्ति(सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी सद्गुरूंचा श्लोक म्हणायला सांगितला. त्यामुळे साधकांची मने श्री गुरुचरणी लीन होऊन ती गुरूंकडून प्राप्त होणारी ऊर्जा ग्रहण करू लागली. श्रीसत्‌शक्ति(सौ.) बिंदाताईंशी अल्प वेळ बोलणेही दिव्य सत्संगच असतो. त्यातून साधकांना प्रयत्न करण्यासाठी पुष्कळ ऊर्जा आणि उत्साह मिळतो.

६. कृतज्ञता आणि प्रार्थना

‘हे महालक्ष्मीस्वरूप बिंदाई, तुझ्या या दिव्य मार्गदर्शनाने आम्हाला साधनेचे प्रयत्न करण्यासाठी पुष्कळ ऊर्जा आणि उत्साह प्राप्त झाला आहे. तुझ्या या वात्सल्यमय प्रीतीने आम्ही कृतार्थ झालो आहोत. ‘तू आम्हाला असेच तुझ्या छत्रछायेत ठेव आणि गुरुदेवांना अपेक्षित असे घडण्यासाठी आमच्याकडून क्षणोक्षणी प्रयत्न करवून घे’, अशी तुझ्या चरणी भावपूर्ण प्र्रार्थना आहे.’

– कु. वैष्णवी वेसणेकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) आणि सौ. कीर्ती जाधव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.१०.२०२१)

(समाप्त)