‘गेल्या अनेक वर्षांपासून परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करत आहेत. ते साधकांना विविध बारकावे शिकवून घडवत आहेत. गुरुदेवांच्या कार्यातील एक वैशिष्ट्यपूर्ण भाग म्हणजे दैवी बालके ! गुरुदेवांच्या अवतारी कार्यात सहभागी होण्यासाठी दैवी बालके उच्च लोकांतून पृथ्वीतलावर जन्माला आलेली आहेत. गुरुदेवांनी उलगडले नसते, तर या बालकांचे दैवीपण कुणालाही कळले नसते. ‘श्रीसत्शक्ति(सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी साधकांशी बोलतांना ‘या दैवी बालकांची उदाहरणे देऊन आपणही साधनेसाठी कसे प्रयत्न करू शकतो ?’, याविषयी साधकांना दिशादर्शन केले. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे सहज बोलणे, ‘त्यांच्या ओघवत्या वाणीतून साधकांच्या उद्धारासाठी अन् साधकांनी पुढे जावे’, या तळमळीमुळे बाहेर पडलेले शब्द, त्यांचे दिव्य मार्गदर्शन शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांनी चैतन्यमय वाणीतून केलेले मार्गदर्शन येथे दिले आहे.
१. दैवी बालकांची प्रगल्भता दर्शवणारे प्रसंग
१ अ. सत्संगात शिकलेले सूत्र लगेच कृतीत आणणारी कु. आराधना धाटकर (वय ९ वर्षे, आध्यात्मिक पातळी ५९ टक्के) ! : ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी सांगितले, ‘‘एकदा परात्पर गुरुदेवांच्या सत्संगात दैवी बालिका कु. प्रार्थना पाठक (वय १० वर्षे, आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) हिने परात्पर गुरुदेवांना तिला आलेली एक अनुभूती सांगितली. ती ‘प.पू. डॉक्टर, प.पू. डॉक्टर’ असा नामजप करत पाणी प्यायल्यावर तिला पाण्याची चव गोड लागते. प्रार्थनाने ही अनुभूती तिच्या आई-वडिलांनाही सांगितली. त्यांनीही हा प्रयोग केला असता त्यांनाही तशीच अनुभूती आली. सत्संगात ही अनुभूती ऐकल्यानंतर दुसर्या दिवशीच्या सत्संगात दैवी बालिका कु. आराधना धाटकर हिने सत्संगात सांगितले, ‘‘काल प्रार्थनाने सांगितलेल्या अनुभूतीनुसार मीही तसे करून पाहिले असता मलाही पाणी गोड लागले.’’
१ अ १. दैवी बालसाधक एकमेकांशी तुलना न करता एकमेकांकडून शिकून लगेच कृतीतही आणतात, तसे सर्वांनी शिकायला हवे ! : त्या वेळी ‘आदल्या दिवशी सत्संगात उपस्थित असलेल्या साधकांपैकी कुणीच असा प्रयत्न करून पाहिला नव्हता’, असे लक्षात आले. बालकांपैकी केवळ आराधनाने तसे करून पाहिले आणि त्याची अनुभूतीही घेतली. दैवी बालसाधक एकमेकांशी तुलना करत नाहीत. ते ‘एखाद्या बालसाधकाला ते येते, मला ते येत नाही’, असे दुःख करत नाहीत. ते एकमेकांकडून शिकलेले लिहून घेतात आणि लगेच कृतीतही आणतात. आपणही हे शिकायला हवे.
१ आ. परात्पर गुरुदेवांच्या प्रश्नाला प्रगल्भतेने उत्तरे देणारी कु. प्रार्थना पाठक (वय १० वर्षे, आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) ! : एका सत्संगात परात्पर गुरुदेवांनी कु. प्रार्थना पाठक (वय १० वर्षे, आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) हिला विचारले, ‘‘तुम्ही (दैवी बालक) मोक्षाला का जात नाही ? पुनःपुन्हा पृथ्वीवर जन्माला का येता ?’’ तेव्हा प्रार्थनाने लगेच उत्तर दिले, ‘‘तुम्ही पुनःपुन्हा येता ना; म्हणून आम्हीही तुमची सेवा करण्यासाठी येतो.’’ अशा प्रकारे मुळातच दैवी गुणवैशिष्ट्ये असलेल्या बालकांना गुरुदेवच ‘हिंदु राष्ट्रा’साठी घडवत आहेत.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी साधकांना केलेले अमूल्य मार्गदर्शन
२ अ. परात्पर गुरु डॉक्टरांचा संकल्प केवळ दैवी बालकांसाठीच नसून तो सर्वांसाठीच असल्याने सर्वांनी साधनेत प्रगती करावी ! : परात्पर गुरु डॉक्टरांचा संकल्प केवळ दैवी बालकांसाठीच नसून तो सर्वांसाठीच आहे. अनेक वर्षे साधना करत असणार्या प्रत्येक साधकाकडे त्यांचे लक्ष आहे. ‘जे साधक १० ते १५ वर्षांपासून साधना करत आहेत, त्यांची आता प्रगती व्हायला हवी’, असे परात्पर गुरु डॉक्टरांना पुष्कळ वाटते. त्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर प्रगती करायला हवी.
२ आ. साधकांनी दैवी बालकांकडून शिकून स्वतःची प्रगती लवकरात लवकर करून घ्यावी ! ः दैवी बालके आध्यात्मिक स्तरावर रहातात. त्यांचे विश्वच निराळे असते. ते उच्च लोकांतून आल्याने त्यांची पूर्वजन्मीची साधनाही आहे. त्यामुळे ते लवकर पुढच्या टप्प्यालाही जात आहेत. साधकांनी दैवी बालकांकडून शिकायला हवे आणि लवकरात लवकर स्वतःचीही प्रगती करून घ्यायला हवी.
२ इ. बालसाधकांप्रमाणे सर्वांनी आध्यात्मिक स्तरावर आणि आनंदी रहावे ! : दैवी बालके सतत आनंदी असतात. त्यांचे साधनेचे प्रयत्न चालू असतात. त्यामुळे त्यांच्याकडे पहाणार्यालाही आनंद होतो आणि पहाणारे त्यांच्याकडे आकर्षित होतात. साधकांच्या मनात काहीतरी विचार चालू असतात. साधक मानसिक स्तरावर असतात. दैवी बालकांप्रमाणे आपणही आनंदी रहायला हवे. आपले तोंडवळे सतत आनंदी असले पाहिजेत. ‘एखाद्या साधकाकडे पाहूनच सनातनचे आश्रम, म्हणजे भूवैकुंठ आहे.’, असे इतरांना जाणवले पाहिजे. आता अधिकाधिक आध्यात्मिक स्तरावर राहूया. आपण वैकुंठासमान रामनाथी आश्रमात पोचलो आहोत. आता विष्णुचरणांशी पोचण्याची धडपड वाढवायला हवी.
२ ई. दैवी बालकांची मने निर्मळ असणे आणि त्यांचे बोलणे आध्यात्मिक स्तरावर असल्याने ती पुष्कळ सुंदर अन् माधुर्यपूर्ण असणे : प्रत्येकाच्या मनात त्यांच्या आधीच्या कित्येक जन्मांतील संस्कारानुसार विचार येत असतात. संचित आणि प्रारब्ध यांमुळे मनात विचारचक्र चालूच असते. जसे वय वाढत जाईल, तसे संस्कारांमुळे विचार वाढतात. त्या विचारांमध्ये साधना व्यय होऊ लागते. याउलट दैवी बालकांचे गुणवैशिष्ट्य, म्हणजे त्यांचे मन निर्मळ असते. यांच्या मनात काहीच नसते. देव जे विचार देतो, ते त्यांना ग्रहण करता येतात आणि दैवी बालके ते विचार मोकळेपणाने सांगतात. दैवी बालकांचे बोलणेही पुष्कळ सुंदर आणि माधुर्यपूर्ण असते. त्यांचे बोलणे ‘ऐकत रहावे’, असे वाटते आणि त्यातून पुष्कळ शिकायला मिळते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांचे बोलणे आध्यात्मिक स्तरावरचे असते. त्यांना तसे बोलायला कुणी शिकवलेले नाही. साधक अनेक वर्षे साधना करून साधनेचे दृष्टीकोन आत्मसात करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यानुसारही आपण दैवी बालकांना शिकवले नाही. उलट आपण त्यांना घडवण्यात न्यून पडलो. आपण त्यांना घडवूही शकत नाही; कारण साधनेत ते आपल्यापेक्षा पुष्कळ पुढे आहेत. त्यांचे आध्यात्मिक स्तरावरील विश्व दैवी असते.
२ उ. परात्पर गुरुदेवांच्या सूक्ष्म अस्तित्वामुळे दैवी बालकांमधील देवत्व प्रगट होणे : आपण बुद्धीने शिकतो आणि बोलतो; पण दैवी बालकांचे तसे नाही. आपणही पुष्कळ भाग्यवान आहोत, ‘देवाने अशा बालकांचा आपल्याला सत्संग दिला आहे. परात्पर गुरुदेवांच्या कृपेने या बालकांतील देवत्व सर्वांसमोर प्रगट होत आहे. सूर्य उगवला की, फुले आपोआप उमलतात, तसे परात्पर गुरुदेवांच्या सूक्ष्म अस्तित्वामुळे या दैवी बालकांमधील देवत्व प्रगट होत आहे.
(क्रमश:)
– कु. वैष्णवी वेसणेकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) आणि सौ. कीर्ती जाधव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.१०.२०२१)
पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा ः https://sanatanprabhat.org/marathi/526773.html