वडिलांचे निधन झाल्यावर ‘श्रीकृष्णाने पुष्कळ सावरले’, याची अनुभूती घेणारी कु. सायली देशपांडे !

सायलीच्या घरातील तिघेजण कोरोनाने बाधित झाले होते आणि त्यात तिच्या वडिलांचे निधन झाले. ‘या दुःखद प्रसंगात सायलीने (वय १२ वर्षे) श्रीकृष्णाशी बोलून स्वतःला कसे सावरले ?’, हे फारच कौतुकास्पद आहे. ‘तिची श्रीकृष्णावरील श्रद्धाच तिला मानसिक बळ देऊन गेली’, हेच यातून शिकायला मिळते.

कु. सायली देशपांडे

१. घरात आई-बाबा आणि आजी कोरोनामुळे रुग्णाईत होणे; पण श्रीकृष्णाच्या कृपेने सायली अन् तिच्या भावाला कोरोना न होणे

‘एप्रिल २०२१ मध्ये माझी आई कोरोनामुळे रुग्णाईत होती आणि माझ्या बाबांना रुग्णालयात भरती केले होते. त्यामुळे मला घरी एकटे वाटत होते. तेव्हा श्रीकृष्णाशी बोलल्यावर मला जरा बरे वाटायचे. घरात आई-बाबा आणि आजी तिघेही कोरोनाने रुग्णाईत असतांना आम्हाला दोघांना (मी अन् माझा लहान भाऊ) कोरोना झाला नाही. (आम्ही दोघेही ‘निगेटिव्ह’ होतो.) श्रीकृष्णानेच त्या प्रसंगातून आम्हाला बाहेर काढले. ‘कृष्ण आपल्या समवेत आहे’, या भावामुळे मला आनंदी वाटायचे.

२. पू. अशोक पात्रीकरकाका आणि अन्य साधक यांनी ‘बाबा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांपाशी आहेत’, असे समजावल्यामुळे मन स्थिर होणे

बाबांचे निधन झाले, त्या दिवशी माझे मन थोडे अस्थिर झाले होते. त्या वेळी पू. पात्रीकरकाका यांचे चैतन्यमय मार्गदर्शन मिळाले. ‘विविध साधकांनी सांगितलेल्या अनुभूतींतून बाबा गुरुमाऊलीपाशीच (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यापाशीच) आहेत’, हे देवाने माझ्या लक्षात आणून देऊन माझे मन स्थिर केले. देवाने मला या मोठ्या दुःखद प्रसंगातूनही फुलासारखे बाहेर काढले.

३. भावसत्संगात सांगितलेले ‘गुरुमाऊली’ (परात्पर गुरु डॉ. आठवले) हेच जगातील परम सत्य असून बाकी सर्व नाती माया आहेत’, हे वाक्य आठवून श्रीकृष्णाशी बोलणे आणि त्यामुळे मन मोकळे होऊन स्थिर राहू शकणे

माझ्या मनात एकदाही ‘आता पुढे काय होईल ? आम्ही बाबांविना कसे राहू ?’, असा विचार आला नाही; कारण ‘माझा कृष्ण माझ्या समवेत आहे’, हे माझ्या मनात होते. बाबांच्या निधनाच्या आधी देवाने सत्संगातून सांगितले होते, ‘पृथ्वीतलावरील सर्व नाती, म्हणजे माया आहे. जगातील परम सत्य म्हणजे गुरुमाऊलीच (परात्पर गुरु डॉ. आठवले हेच) आहे !’ ही गोष्ट माझ्या मनावर कोरली गेली होती. ती वाक्ये आठवून माझ्या मनाला आधार मिळत होता. मला वाटत होते, ‘या दुःखातून आपण कधीही बाहेर पडू शकणार नाही किंवा ते फार अवघड असेल’; पण देवाने मला या प्रसंगातून अगदी सहजपणे बाहेर काढले. ‘मी एकटी आहे, मी कुणाशी बोलू ?’, असे मला वाटायचे. तेव्हा मी श्रीकृष्णाच्या चित्रासमोर जाऊन श्रीकृष्णाशी बोलून मन मोकळे करायचे. त्यामुळे मला फार बरे वाटायचे.

श्रीकृष्णाने या प्रसंगातून मला अगदी सहजतेने बाहेर काढले आणि परात्पर गुरुमाऊलींनी मला या प्रसंगाशी लढायचे बळ दिले. त्यासाठी जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण आणि सच्चिदानंदस्वरूप परात्पर गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले) यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– कु. सायली रवींद्र देशपांडे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) (वय १२ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.९.२०२१)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक