मये – मये ग्रामस्थांच्या वतीने दीपावलीच्या पूर्वसंध्येला ३ नोव्हेंबरच्या रात्री ९ वाजता भगवान श्रीकृष्ण विजयोत्सव फेरीचे आयोजन करण्यात आले. या फेरीला गावकरवाडा येथील श्री महामाया प्रांगणातून सामूहिक प्रार्थना केल्यानंतर प्रारंभ झाला. यानंतर फेरी केळबायवाडा-कुंभारवाडा-वायंगिणी-हळदणवाडी या मार्गाने जाऊन ती श्री महामाया मंदिराच्या प्रांगणात पोचल्यावर जयघोष करून फेरीची सांगता करण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धर्माभिमानी सर्वश्री शांबा पेडणेकर, शिवानंद गडेकर, समीर प्रभुगावकर, श्रीधर मणेरीकर, सखाराम पेडणेकर, श्रीमती भोवर आदींनी ध्वनीक्षेपक यंत्रणा आणि ‘जनरेटर’ यंत्रणा विनामूल्य पुरवली. सिकेरी गोशाळेने श्रीकृष्णाची मूर्ती आणि श्रीधर मणेरीकर यांनी वाहन उपलब्ध करून सहकार्य केले. कार्यक्रमात श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन श्री. लाडको किनळकर, सौ. पार्वती गावकर आणि श्री. कृष्णा चोडणकर यांनी केले.