दीपावलीच्या काळातील ‘वसुबारस’ या सणाच्या निमित्ताने महाराष्ट्रात ठिकठिकाणी गोवत्सपूजन करण्यात आले. वसुबारस हा गोमातेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस ! सत्त्वगुणी, आपल्या सान्निध्यात सर्वांना पावन करणारी, आपल्या दुधाने समाजाला पुष्ट करणारी, आपले अंग-प्रत्यंग समाजाला अर्पित करणारी, आपल्या मल-मूत्राने शेतीची ऊर्जाशक्ती वाढवणारी अशी गोमाता सर्वत्र पूजनीय आहे. अशा गोमातेचे रक्षण करणे ही काळाची आवश्यकता आहे. त्यासाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनाही प्रयत्नरत असतात. वसुबारसेनिमित्त करण्यात आलेल्या गोपूजनाचा वृत्तांत येथे देत आहोत.
सोलापूर येथे सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या हस्ते गोपूजन !
सोलापूर, २ नोव्हेंबर (वार्ता.) – येथील श्री द्वारकाधीश मंदिरात सनातन संस्थेच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आणि पू. (कु.) दीपाली मतकर यांच्यासह सौ. पारुल (भाभी) पटेल, सौ. लता पाठक, सौ. वैशाली वळसणकर यांच्या हस्ते गोपूजन करण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनोद रसाळ, श्री. बालराज दोंतुल यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
द्वारकाधीश मंदिराचे व्यवस्थापक श्री. दत्तात्रय पाठक यांच्या विनंतीनुसार सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी गोपूजन केले. या वेळी मंदिराचे विश्वस्त विपीनभाई पटेल, जयेशभाई पटेल, विजयभाई पटेल यांचे कुटुंबीय या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या वेळी मंदिरामध्ये द्वारकेतील दीपावलीचे प्रतिरूप साकारण्यात आले होते. गोपूजनानंतर सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आणि पू. (कु.) दीपाली मतकर यांच्यासह सनातनच्या साधकांनी श्रीकृष्ण मंदिरात श्रीकृष्णाचे आणि द्वारकेतील प्रतिरूपाचे भावपूर्ण दर्शन घेऊन श्रीकृष्णाची आरती म्हटली.
वलसाड (उमरगाव) येथे गोपूजन !
वलसाड (उमरगाव) येथील भाजपचे महामंत्री श्री. मनोज झा यांच्या घरी गोपूजन झाले. त्यांचे वडील श्री. मणिकांत झा यांनी गोमाता आणि वासरू यांचे पूजन करून त्यांना प्रसाद खाऊ घातला. त्यानंतर उपस्थित सर्वांनी गोमातेचे दर्शन घेतले.
या वेळी हिंदु युवा मंचचे अध्यक्ष श्री. लक्ष्मण गोमतीवाल, तसेच कार्यकर्ते भूपेश भानुशाली, संजय महाजन, राजेंद्र झोपे, नितीन चौधरी, उमंग दर्जी आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. निखिल दर्जी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. निखिल दर्जी यांनी प्रार्थना करून कार्यक्रमाची सांगता केली.
नागपूर येथे हिंदुत्वनिष्ठांचे एकत्रित गोवत्सपूजन !
सनातन संस्थेच्या ‘धर्मशिक्षण व्हिडिओ’मुळे शास्त्रानुसार गोवत्सपूजन करण्याची प्रेरणा मिळाल्याचे प्रतिपादन !
नागपूर – येथे गोधाम मस्कासाथ आणि गोरक्षण सभा, वर्धा रोड येथे गोवत्सपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यात सामूहिक गोवत्सपूजन करून आरती करण्यात आली. या वेळी पू. आसाराम बापू संप्रदाय, योग वेदांत सेवा समिती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती यांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी, तसेच अनेक हिंदुत्वनिष्ठ नागरिक उपस्थित होते.
नागपूर येथील हिंदुत्वनिष्ठ आणि गोरक्षण सभा संचालक श्री. प्रदीप कश्यप यांनी त्यांच्या घरी गोवत्सपूजन केले. सनातन संस्थेद्वारे सांगितल्यानुसार त्यांनी सर्व कृती केल्या. त्यासाठी त्यांनी परिसरातील अन्य हिंदुत्वनिष्ठांनाही सहभागी करून घेतले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. अतुल अर्वेन्ला, श्री. स्वप्नील निमजे या वेळी उपस्थित होते. ‘सनातन संस्थेद्वारे प्रसारित ‘धर्मशिक्षण व्हिडिओ’ पाहून शास्त्रानुसार गोवत्सपूजन करावे, याची प्रेरणा मिळाली. हे सर्व करतांना पुष्कळ आनंद झाला’, असे श्री. कश्यप यांनी सांगितले.
वसुबारसेनिमित्त पेण आणि तळोजा येथे हिंदूंकडून गोपूजन !
पेण (रायगड) – येथील गोरक्षक मंगल पाटील, सामाजिक गोपालन संस्था येथे वसुबारसेनिमित्त १ नोव्हेंबर या दिवशी गोपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ‘मशाल फेरी’ काढण्यात आली. तिची सांगता गोशाळेत झाली. त्यानंतर तेथील गाय-वासरे यांची पूजा करण्यात आली. या वेळी स्थानिकांसह गोशाळेचे प्रमुख श्री. मंगल पाटील आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. दिलदास म्हात्रे उपस्थित होते.
तळोजा येथील स्वराज्य मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. गुरुनाथ मुंबईकर यांनीही गोपूजन केले.
नागेवाडी (सातारा) येथील श्री वीर गणेशोत्सव मंडळ यांच्या ‘श्री वीर गोशाळे’चे उद्घाटन !
गोसंवर्धन हे हिंदु राष्ट्राच्या दिशेने टाकलेले पाऊल असल्याचे प्रतिपादन !
‘श्री गिरिधर गोशाळा बावडा’ (तालुका खंडाळा) येथील व्यवस्थापक कु. पूनम राऊत यांच्या हस्ते श्री वीर गणेशोत्सव मंडळ यांच्या ‘श्री वीर गोशाळे’चे उद्घाटन करण्यात आले. या वेळी कु. पूनम यांनी ‘गोसंवर्धन आणि गायीचे मानवी जीवनातील महत्त्व’, या विषयावर व्याख्यान दिले. या वेळी समितीच्या वतीने गोपूजन करण्यात आले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत सोनवणे म्हणाले, ‘‘वर्ष २०२३ च्या गुढीपाडव्याला हिंदु राष्ट्र येणारच आहे. गोसंवर्धन हे हिंदु राष्ट्राच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. कु. पूनम यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार सर्वांनीच सेंद्रिय शेतीकडे वळावे.’’