‘गोवा फॉरवर्ड’च्या आमदारांनी घेतली मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट
त्या ‘हिंदुद्वेषाचे प्रतीक’ म्हणूनही प्रसिद्ध आहेत. त्यामुळे हिंदूंनी त्यांच्या भूलथापांना बळी न पडणे, हेच योग्य !
पणजी – ‘गोवा फॉरवर्ड’ पक्ष हा तृणमूल काँग्रेसमध्ये विलीन केला जाणार नाही. लोकांना असे झालेले नको; मात्र निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी समविचारी पक्षांना संघटित करणे आवश्यक आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या प्रादेशिक पक्षांच्या अभिमानाचे प्रतीक आहेत, असे मत ‘गोवा फॉरवर्ड’चे आमदार विजय सरदेसाई यांनी व्यक्त केले. आमदार विजय सरदेसाई यांनी पक्षाचे नेते किरण कांदोळकर, आमदार विनय पालयेकर आणि आमदार जयेश साळगावकर यांच्यासमवेत ३० ऑक्टोबर या दिवशी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली.
भेटीनंतर आमदार विजय सरदेसाई पुढे म्हणाले, ‘‘ऑयपॅक’ या संस्थेचे राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या मते प्रत्येक ३ व्यक्तींमधील १ व्यक्ती भाजपला मतदान करते आणि उर्वरित दोघे भाजपला मतदान करत नाहीत. भाजपला मतदान न करणारे मतदार ओळखून त्यांना संघटित करणे, हे आपले ध्येय आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमवेत झालेली चर्चा या सूत्रावर आधारित होती. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी सर्वांनी संघटित होण्याचे आवाहन केल्याने आम्ही त्यांना भेटण्यासाठी आलो. ‘गोवा फॉरवर्ड’ हाही एक प्रादेशिक पक्ष आहे. चर्चेमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांचे मत मांडले आहे आणि त्यावर पक्ष चर्चा करून निर्णय घेणार आहे. केंद्रातील सत्ता संपादनाच्या प्रक्रियेला गोव्यातून प्रारंभ होणार आहे.’’