कु. अनास्तासिया वाले हिची गुणवैशिष्ट्ये सांगून तिने व्यष्टी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित !

कु. अनास्तासिया वाले हिचा सत्कार करतांना पू. देयान ग्लेश्चिच

या सत्संगात पू. देयान ग्लेश्चिच यांनी प्रारंभी भावप्रयोग घेतला आणि नंतर अन्य साधकांना विदेशात जाणार्‍या ५ साधकांची गुणवैशिष्ट्ये सांगण्यास सांगितली. या ५ साधकांमध्ये सौ. योया सिरियाक वाले आणि कु. अनास्तासिया सिरियाक वाले याही होत्या. सत्संगात अन्य साधकांनी या ५ साधकांची गुणवैशिष्ट्ये सांगण्यासह ‘त्यांच्याकडून काय शिकायला मिळाले ?’ तेही सांगितले. या वेळी पू. देयान ग्लेश्चिच यांनीही कु. अनास्तासिया हिची गुणवैशिष्ट्ये सांगितली आणि त्याच वेळी तिने व्यष्टी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली असल्याचे घोषित केले. या घोषणेनंतर सत्संगातील वातावरणात सकारात्मक पालट होऊन सर्वांचीच भावजागृती झाली.

त्यानंतर कु. अनास्तासिया हिने मनोगत व्यक्त केले आणि उपस्थित साधकांनीही तिची गुणवैशिष्ट्ये सांगितली. त्याचप्रमाणे ऑनलाईन माध्यमातून विदेशातून कु. अनास्तासिया हिचे वडील सद्गुरु सिरियाक वाले, तिची आजी (आईची आई) श्रीमती ड्रगाना किस्लोव्हस्की, एस्.एस्.आर्.एफ्.च्या संत पू. (सौ.) शिल्पा कुडतरकर आणि पू. (सौ.) भावना शिंदे यांनी कु. अनास्तासिया हिची गुणवैशिष्ट्ये सांगितली.


कु. अनास्तासिया हिची कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

  • पू. देयान ग्लेश्चिच (कु. अनास्तासिया हिचे मामा) – कु. अनास्तासिया हिच्या बोलण्यात स्पष्टता आहे. तिच्याकडे प्रसाराच्या अनुषंगाने चांगली सूत्रे असतात. सध्या ती बालसाधकांचा सत्संग घेते. तिच्यात नेतृत्वगुण आहे.
  •  पू. (सौ.) योया वाले (कु. अनास्तासिया हिची आई) – मला कु. अनास्तासियाकडून आध्यात्मिक स्तरावरील दृष्टीकोन मिळतात.
  • श्रीमती द्रगाना किस्लोव्हस्की (कु. अनास्तासिया हिची आजी (आईची आई) – कु. अनास्तासियामध्ये पुष्कळ प्रेमभाव असून तिच्यात स्वीकारण्याची वृत्ती आहे. ती इतरांचा विचार करते. तिच्यात प्रगल्भता आहे.

कु. अनास्तासिया वाले हिची व्यष्टी आध्यात्मिक पातळी ६१ टक्के होण्याच्या संदर्भातील सूत्र

कु. अनास्तासिया उच्च स्वर्गलोकांतून पृथ्वीवर जन्माला आली असून तिची व्यष्टी आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली आहे. अनास्तासियामध्ये भाव, अंतर्मुखता आणि साधनेची तळमळही आहे. या गुणांमुळे तिची व्यष्टी आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली आहे. तिच्यातील समष्टी गुण वाढत राहिल्यास, तसेच समष्टी साधनेमध्येही ती नेतृत्व आदी गुणांनी कार्यरत राहिल्यास समष्टी गुण वृद्धींगत होऊन तिची समष्टी आध्यात्मिक पातळीही ६१ टक्के होऊ शकेल.


स्वप्नात बालसाधिकेला गुरुदेवांच्या सत्संगाच्या संदर्भात एक दृश्य दिसणे, प्रत्यक्षातही तसेच घडणे आणि ‘हे आध्यात्मिक प्रगतीचे लक्षण आहे’, असे गुरुदेवांनी सांगणे

‘पूर्वी मी युरोप येथून भारतातील रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आले होते. त्या वेळी एकदा रात्री मला एक स्वप्न पडले.

तेव्हा मला स्वप्नात ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात एक साधिका ‘सात्त्विक कपडे कसे असायला हवेत ?’, याविषयी सांगत आहे’, असे दिसले.

त्यानंतर ५ दिवसांनी परात्पर गुरुदेवांच्या प्रत्यक्ष सत्संगात जयपूर (राजस्थान) येथील श्रीमती अर्चना खेमका (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांनी गुरुदेवांशी बोलतांना ‘सात्त्विक कपडे कसे असायला हवेत ?’, याविषयी सांगितले. तेव्हा मला ५ दिवसांपूर्वी पडलेल्या स्वप्नाची आठवण झाली. गुरुदेवांनी ‘भविष्यात काय होणार आहे ?’, हे मला ५ दिवसांपूर्वीच स्वप्नाच्या माध्यमातून दाखवले. मी गुरुदेवांना याविषयी सांगितले. तेव्हा त्यांनी मला सांगितले, ‘‘हे आध्यात्मिक प्रगतीचे लक्षण आहे.’’ त्यांनी दिलेल्या या अनुभूतीसाठी मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– कु. अनास्तासिया वाले, युरोप (९.१०.२०२१)


कु. अनास्तासिया सिरियाक वाले हिने व्यक्त केलेले मनोगत !

पू. मामा (पू. देयान) आणि पू. आई यांनी मला साधनेत साहाय्य केले ! – कु. अनास्तासिया सिरियाक वाले

मी काहीच केलेले नाही. माझ्या आध्यात्मिक प्रगतीचे श्रेय मी माझी आई पू.(सौ.) योया वाले आणि पू. मामा (पू. देयान ग्लेश्चिच) यांना देते. त्यांनी मला साधनेत पुष्कळ साहाय्य केले आहे.