‘मी १६ वर्षे सतारवादनाचे शिक्षण घेतले आहे. साधनेत येण्यापूर्वी केवळ आवड म्हणून सतारवादन करण्याकडे माझा कल असायचा. ‘साधनेत आल्यावर महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या अंतर्गत साधना म्हणून सतारवादन करतांना अन् ऐकतांना माझ्या विचारसरणीत पालट झाला’, असे माझ्या लक्षात आले. साधनेमुळे माझ्यात झालेले पालट आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने साधना म्हणून सतारवादन करतांना मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. साधनेत येण्यापूर्वीची स्थिती
१ अ. एका नामांकित सतारवादकांची वादनशैली आवडणे आणि त्यांनी केलेले वादन सतत ऐकणे : साधनेत येण्यापूर्वी मला एका नामांकित सतारवादकांच्या वादनातील वैविध्य आणि त्यांची वादनशैली पुष्कळ आवडायची, उदा. अतीद्रुत (जलद) लयीतील त्यांचे वादन, कुठल्याही मात्रेवरून तिहाई (तिहाई म्हणजे स्वरांचा एकच समूह एकसारखा ३ वेळा वाजवून शेवटी समेवर (पहिल्या मात्रेवर) येणे) घेऊन समेवर (पहिल्या मात्रेवर) येणे इत्यादी मला पुष्कळ आवडायचे. त्यामुळे मी त्यांनी केलेले वादन सतत ऐकायचो. मला ‘त्यांच्यासारखे चांगले सतारवादन करणारे दुसरे कुणीही नाही’, असे वाटत असे.
१ आ. कलेला साधनेची जोड नसल्यामुळे अन्य कलाकारांच्या ‘पुष्कळ ताना घेणे, हातवारे करणे’ इत्यादी बाह्य गोष्टींमध्ये रममाण होणे : जेव्हा गायकाच्या कलेला साधनेची जोड नसते किंवा गायक केवळ कला म्हणून त्याकडे बघत असतो, तेव्हा त्याचा भर संगीतातील बाह्य गोष्टींवर अधिक असतो, उदा. पुष्कळ ताना घेणे, गाण्यात पुष्कळ वैविध्य आणणे, भरपूर हातवारे अथवा हावभाव करणे इत्यादी. तो या बाह्य गोष्टींमध्ये रममाण होतो. ‘हे म्हणजेच ‘संगीत’, अशी त्याची धारणा असते. त्यामुळे मीही साधनेत येण्यापूर्वी गायक आणि वादक यांच्या या बाह्य गोष्टींमध्ये रममाण होत असे.
२. साधनेत आल्यावर साधना म्हणून सतारवादन करतांना स्वतःत जाणवलेले पालट
२ अ. बाह्य वादनापेक्षा संगीताच्या आत नेणारे वादन करणे आवडू लागणे आणि त्यामुळे वादनातील खरा आनंद मिळणे : कालांतराने मी साधनेत आलो. मी माझ्या सतारवादनाला साधनेची जोड दिली, म्हणजे मी साधना म्हणून सतारवादन करू लागलो. तेव्हा ‘कुठल्याही मात्रेवरून तिहाई घेणे’, हा गणितीय भाग आहे. त्यामुळे केवळ ‘तिहाई घेणे आणि वादनात वैविध्य आणणे’, हे बाह्य वादन आहे’, असे माझ्या लक्षात आले. त्यानंतर मला ‘संगीताच्या आत नेणारे वादन करणे आणि ऐकणे’ आवडायला लागले आणि त्यातून अंतर्मुखता अनुभवायला मिळाली. त्यामुळे देवाच्या कृपेने सतारवादन करतांना मला विविध अनुभूती आल्या. आता गुरुकृपेने मला सतारवादनातील खरा आनंद मिळत आहे.
२ आ. ‘कलेला साधनेची जोड दिल्याने बाह्य जगताची द्वारे बंद होऊन आंतरिक द्वारे उघडतात’, हे अनुभवता येणे : मी साधनेत नसतो, तर संगीताचा आंतरिक अनुभव घेऊ शकलो नसतो. कलेला साधनेची जोड दिल्यावरच कलाकाराला कलेतील खरा आनंद गवसतो आणि त्या वेळी बाह्य जग विसरून तो ईश्वराच्या अनुसंधानात रममाण होतो. कलेला साधनेची जोड दिल्याने बाह्य जगाची द्वारे बंद होऊन आंतरिक द्वारे उघडतात.
‘परात्पर गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने मला सतारवादनाच्या माध्यमातून साधना करण्याची संधी मिळाली’, याकरता मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.
(‘कलेला साधनेची जोड देणे किती आवश्यक आहे’, हे श्री. मनोज सहस्रबुद्धे यांच्या विचारप्रक्रियेत झालेल्या पालटांवरून लक्षात येते. जेव्हा संगीत कलाकार आपल्या संगीत कलेला साधनेची जोड देतो, तेव्हाच त्याला संगीतातील खरा आनंद अनुभवता येतो. परात्पर गुरु डॉ. आठवले महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयातील संगीत क्षेत्रातील साधकांना संगीत-साधनेविषयी मार्गदर्शन करत असल्याने त्यांच्या कृपेने साधक त्यातून विविध अनुभूती घेत आहेत.’ – संकलक)
३. साधना म्हणून सतारवादन करतांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती
३ अ. श्रीकृष्णाच्या संदर्भातील चाल आणि त्यावरील काव्यपंक्ती आपोआप सुचणे अन् ती सतारीवर वाजवल्यावर भावावस्था अनुभवणे : ३०.४.२०२१ या दिवशी दुपारी मी विश्रांती घेत असतांना मला एक चाल (धून) सुचली. त्यानंतर मला काही शब्द स्फुरले. ती धृपदातील पहिली ओळ होती. त्यानंतर माझ्या मनात आपोआप ती चाल आणि शब्द यांची आवर्तने चालू झाली. त्या वेळी मी लगेच उठून खोलीत असलेल्या श्रीकृष्णाच्या मूर्तीला प्रार्थना करून सतार वाजवायला आरंभ केला. मला सुचलेल्या चालीतील दुसरी ओळ वाजवतांना ‘बासुरीयां शाम की दिवानी…’ हे शब्द मला आतून ऐकू येऊ लागले. ही ओळ सतारीवर वाजवतांना माझी भावजागृती झाली. ती पुनःपुन्हा वाजवतांना मी अखंड भावावस्था अनुभवत होतो. त्यानंतर मला अवघ्या ४-५ मिनिटांतच पहिल्या ओळीतील उरलेले शब्द स्फुरले. हे शब्द सतारीवर वाजवतांना मला पुष्कळ आनंद झाला. त्या वेळी मी श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्या चरणी नतमस्तक झालो.
‘देवाच्या कृपेने मला अशाच स्वरूपाच्या आणखी काही चाली स्फुरत आहेत’, यासाठी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञ आहे.
३ आ. सराव करतांना सतारीच्या भोपळ्यावर ‘ॐ’ उमटणे : १७.७.२०२१ दिवशी मी सकाळी घरी सतारवादनाचा सराव करत होतो. माझा धाकटा मुलगा श्री. अनिकेत (वय १९ वर्षे) माझा सराव ऐकत बसला होता. माझा सराव झाल्यावर मी सतार खाली ठेवतांना त्याला सतारीच्या भोपळ्यावर (सतारीच्या खालच्या फुगीर भागाला ‘भोपळा’ (साऊंड बॉक्स) म्हणतात. यामुळे आवाज घुमायला साहाय्य होते.) ‘ॐ’ हे शुभ चिन्ह उमटलेले दिसले. त्याने ते आम्हा सर्वांना दाखवले.
३ आ १. पूर्वी नवीन सतार बनवायला दिल्यावर सरस्वतीदेवीने स्वप्नात सांगितल्याप्रमाणे सतारीवर ‘स्वस्तिक’ आणि मोर यांची नक्षी बनवून घेणे अन् त्याच सतारीच्या भोपळ्यावर ‘ॐ’ उमटलेला पाहून भावजागृती होणे : काही वर्षांपूर्वी मी एका कारागिराला एक नवीन सतार बनवायला सांगितली होती. सोलापूरला आमचे सरस्वतीदेवीचे मंदिर होते. मी बरीच वर्षे तेथील सरस्वतीदेवीची पूजा करत होतो. सतार बनवायला दिल्यावर मी पूजा करत असलेल्या श्री सरस्वतीदेवीने मला स्वप्नात दर्शन दिले अन् ‘सतारीवर ‘स्वस्तिक’ हे शुभ चिन्ह आणि पिसारा फुलवलेला मोर’, या दोन नक्षी हव्यात’, असे सांगितले होते. त्याप्रमाणे कारागिरांना सूचना देऊन मी सतारीवर ‘स्वस्तिक’ आणि पिसारा फुलवलेला मोर यांची नक्षी बनवून घेतली होती. आता त्याच सतारीच्या भोपळ्यावर आपोआप उमटलेला ‘ॐ’ पाहून घरातील सर्वांचाच भगवंत आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा कृतज्ञताभाव जागृत झाला.’
– श्री. मनोज सहस्रबुद्धे (सतारवादक, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२९.९.२०२१)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |